एलियन गॉड.. Dipti Methe द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

एलियन गॉड..

देव, सभ्यता आणि अध्यात्म

भारताच्या सभ्यतेला प्राचीन सभ्यता म्हटले जाते. वेद, पुराणे, ज्योतिष शास्त्र, बुद्धिमान गणितज्ञ, राजकारणातील पंडित आणि जोडीला असीम शक्तिशाली देवी-देवता जे उत्पत्ती व विनाश दोन्ही आणू शकतात. अशी आपली प्राचीन संस्कृती वा इतिहास आहे. आजचे पुरातत्व शास्त्रज्ञ देखील प्राचीन काळात बनलेल्या वस्तूंना, लेण्यांना वा पिरॅमिड्सना, उंच दगडी मंदिरांना आजच्या विज्ञानाच्या निकषांपासून भिन्न मानतात. परंतु कैक लेखक व वैज्ञानिक या गोष्टीचा दावा करतात की हे देवी-देवता कुणी दुसरे तिसरे नसून परग्रही असावेत. 'एरीक वोन डॅनकीन' या लेखकाने 1969 साली 'चॅरीएट ऑफ द गॉडस्' या आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, परग्रह वासी प्राचीन काळापासून पृथ्वीवर येत आहेत. 'गॉडस् फ्रॉम द आऊटर स्पेस' हे त्याचं लेखकाचे दुसरे पुस्तक 1972 साली आले आणि त्याच्या या विचारांमुळे वैज्ञानिकांमध्ये वादविवाद सुरू झाले. या पुस्तकांमते सांगायचे झाल्यास समजा आपल्या वैज्ञानिकांनी एक शहरा एवढी मोठी प्रकाशाच्या गतीने धावणारी स्पेसशीप बनवली व आपल्या सारखाच जीवन असलेला दुसरा ग्रह शोधून तिथे जर ते उतरले तर तिथे रहाणारे आदिवासी लोक जे शिकार करून पोट भरत आहेत व केवळ सूर्य, चंद्र यांना देव मानत आले आहेत कारण दिवसाच्या उजेडात त्यांना शिकार मिळते तर रात्री देखील शिकारीसाठी पर्याप्त योजना आखण्यात येते. अशा आदिवासी लोकांनी आपल्या स्पेसशीप मधून उतरणाऱ्या अंतराळ वीरांना पाहिले त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांचे कपडे व रात्र झाल्यावर होणारी विद्युत रोषणाई पाहिली आणि देव समजून त्यांना उपहार अर्पण करू लागले. अंतराळवीरांनी हळुहळू त्यांची भाषा जाणली, त्यांच्यात ते राहू लागले, तेथील स्त्रियांशी संबंध जोडले कारण पुढील पिढी प्रगत व्हावी, विद्वान व्हावी. या आदिवासी लोकांना आपल्या अॅस्ट्रोनॉटसनी जीवनशैली समजावली, प्रगत केले, रहाण्याची,जगण्याची, खाण्याची रीत शिकवली आणि त्यांचा त्या ग्रहावरचा अभ्यास पूर्ण होताच ते निघून गेले. जाताना ते वचन देऊन गेले की आम्ही पुन्हा येऊ. त्यानंतर त्यांच्या आठवणींत त्या लोकांनी त्यांच्या प्रतिकांची लेणी कोरली, लिहिता येणाऱ्यांनी अंतराळवीरांना देव मानून झालेल्या सर्व घडामोडी लिहिल्या ज्यात सारेच त्यांच्यासाठी चमत्कारिक होते. आता या आदिवासींच्या जागी स्वतःला ठेऊन बघा. आपल्यासाठी ते अंतराळवीर एलियन्स झाले नाही का? असे एलियन्स जे आदिवासींपेक्षा प्रगत विज्ञान जाणत होते आणि कैक लाखो वर्षांपूर्वी ते आपल्या पृथ्वीवर आले असावेत. ज्यांचे अस्त्र सुदर्शन चक्रासारखे असावे किंवा तेजाची अत्युच्च सीमा गाठणारी ऊर्जा फेकणारे बाण असावेत. ते आकाशातून आले, त्यांचे दिसणे, त्यांची शस्त्रास्त्रे सारेच नवखे असल्याने त्याकाळातील आपल्या पृथ्वीवर रहाणाऱ्या आदिवासींनी त्यांच्या चमत्कारिक अवतारावरून त्यांना देवाचे स्थान दिले असावे. ते एलियन्स काही काळ पृथ्वीवर राहून त्यांनी लोकांना मदत केली, प्रगत टेक्नॉलॉजी शिकवली असावी म्हणून त्यांना लोक पुजायला लागले असावेत. पृथ्वी आपला इतिहास रिपीट करीत आहे. असे 'एरीक वोन डॅनकीन' या लेखकाने आपले विचार पुस्तकातून मांडले परंतु त्याने वेद व पुराणांचा अभ्यास केला नव्हता, आपल्याकडील संत वाङ्मयाचा देखील मागोवा घेतला नव्हता. असे बरेच संभाव्य तर्क कुतर्क मनुष्य आजपर्यंत करत आला आहे. केवळ देवाबद्दलच्या चिकित्सेपोटी. प्राचीन काळात कदाचित असे झाले असावे कारण मोहेंजोदडो सारख्या प्रगत संस्कृती मधील जागेत आजही रेडिएशनचे अंश सापडत आहेत. व तेव्हाचे लोक टेक्नीकली आपल्याहून पुढे होते याचे पुरावे आजही उत्खनन शास्त्रज्ञांना मिळत आहेत. कारण इजिप्तच्या लेण्यांमध्ये आजचे विमान, हेलिकॉप्टर, पाणबुडी यांची शिल्पे कोरलेली दिसत आहेत.

परंतु, खरंतर देव ही कोणी व्यक्ती नाही तो विश्वास आहे. स्वतःच्या अस्तित्वावर जितका विश्वास असला पाहिजे तितकाच देव आहे या संकल्पनेवर आज मॉडर्न युगात भारत असो वा फॉरेन कंट्रीज..! साऱ्यांची मते एक होताना दिसत आहेत. खरेतर आपल्या वेदांमध्ये सांगितले गेले आहे की या थ्री डायमेंशन तीन आयामी विश्वामध्ये कैक ग्रह आहेत. या ग्रहांवर जीवन देखील असावे. परंतु परमेश्वर कोणत्याही दुसऱ्या ग्रहावरून नव्हे तर दुसऱ्या डायमेंशन मधून येतो. वैज्ञानिकांचे देखील यावर एकमत आहे की, ब्रह्मांड तीन आयामी आहे. आणि वेळ-काळ हा चौथा आयाम (dimension) आहे. परंतु याही पुढे कैक आयाम आहेत. जे विज्ञानाच्या शोधा पलीकडचे आहेत. पण आपल्या वेदांमध्ये चौसष्ट परिमाणांचे, आयामांचे वर्णन केले आहे. आणि या चौसष्ट डायमेंशनचे स्तरीय विभाजन केल्यास अनंत डायमेंशन निर्माण होतात. अशाप्रकारे या तीन आयामी ब्रह्मांडातून देव आपल्याला योग्य जीवन मार्ग शिकविण्यासाठी येतो. सोप्या भाषेत समाजावयाचे झाल्यास एका कम्प्युटर मध्ये कैक अॅप्लिकेशन्स घालून त्याकडून आपण कैक कामे करून घेतो. कम्प्युटरच्या आत अॅप्लिकेशन्स चे वेगळे डायमेंशन आहे. आपण त्यांच्याकडून काहीही करवून घेऊ शकतो, काहीही बनवू शकतो, व मिटवू देखील शकतो. त्या कम्प्युटरसाठी आपण परमेश्वर आहोत. अशाप्रकारे देव देखील आपल्याकडून कोणतेही काम करवून घेऊ शकतो. तो कुठला परग्रही नसून परआयामी आहे. आपण त्याच्या पर्यंत नाही पोहोचू शकत पण तो वाटेल तेव्हा आपल्या पर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यापर्यंत पोहोचायचे कसे याचेच धडे अध्यात्मातील अनुभव आपल्याला शिकवितात. देवालादेखील आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या तीन डायमेंशनचे नियम पाळावे लागतात. हे तीन आयामी विश्व तीन स्तरात आखले गेले आहे. ज्यात स्वर्गलोक, पृथ्वीलोक, व नरकलोक समाविष्ट आहेत. आपला आत्मा केवळ या स्तरांमध्ये प्रवास करू शकतो किंवा केवळ अध्यात्मिक जाण असलेले साधुजन सुक्ष्मातून या पुढील लोकांत देखील भ्रमण करू शकतात त्यांच्यातील कुंडलिनी शक्तीद्वारे. सत्यलोक, तपोलोक, जनलोक जे सप्तर्षी ऋषींचे स्थान आहे, भुवरलोक जिथे राक्षसी-पिशाच्च राहतात असे कैक लोक आहेत. जेंव्हा श्रीकृष्णांनी पृथ्वीवर जन्म घेतला तेंव्हा त्यांना मानवी रूप घेऊन यावे लागले या तिन्ही डायमेंशनचे नियम पाळावे लागले. परग्रही लोक पृथ्वीवर जन्म घेऊ शकत नाहीत केवळ परआयामी सत्कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेऊ शकतात. पुरातत्व शास्त्रियांनी हे कबुल केले आहे व अमेरिकेत यावर अभ्यास केला जात आहे. 'थ्रू द वर्महोल विथ मॉर्गन फ्रिमन' सारख्या अमेरिकी कार्यक्रमाद्वारे ब्रह्मांड आणि देव ह्या संकल्पनेचा गहन अभ्यास करताना काही शास्त्रज्ञांच्या मते देव ही उर्जाशक्ती म्हणजे आपल्यातीलच प्रबळ इच्छाशक्तीचे दुसरे रूप असू शकते. असे मानले जाताना दिसून येते आहे. तर 'अॅनशन्ट एलियन्स' ही मालिका ब्रम्हांड अस्तित्वात आल्यापासून ते आपल्या निदर्शनास आलेल्या प्राचीन काळापर्यंत वैज्ञानिकांनी, गणितज्ञांनी जो शोध लावला आहे, जो अभ्यास केला आहे, अशा मानवी बुद्धीचा कस लावणारी व ब्रम्हांडाच्या रहस्याची उत्सुकता शिगेला पोहोचवणारी आहे.

झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून नक्कीच दूर होत चाललो आहोत. आपले पूर्वज सूर्याच्या ऊर्जेत आणि निसर्गाच्या सानिध्यात जीवनाचा खरा आस्वाद घेत होते. कदाचित ते देवाच्या अस्तित्वाचा शोध घेत असावेत वाहणाऱ्या हवेत, सूर्याच्या किरणांमध्ये, रंगेबिरंगी फुलांमध्ये, रसदार फळांमध्ये, हिरव्यागार डोंगर-दऱ्यांमध्ये.पण सध्या कम्प्युटर आणि मोबाईलच्या काळात मनुष्याला वेळच कुठाय या सगळ्यासाठी म्हणा किंवा निसर्गाचा विचार करायला म्हणा. तरी एक गोष्ट, एक विचार मात्र आपण आपल्या पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्या घेतला आहे तो म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा सतत शोध घेण्याचा. तो आहे की नाही? आहे तर तो कुठे रहातो? तो दिसत का नाही? का तो ठराविक वेळेला, ठराविक काळासाठी, ठराविक व्यक्तींसमोरच प्रकट होतो का? या विश्वात कैक लोकांना हे जाणविले आहे की त्यांचा जीव देवाने वाचवला, तर काही मृत्यू लोकात जाऊन परतले आहेत आणि त्यांना तिथून पुन्हा परतीची वाट दाखविणारा एक दैदिप्यमान, चैतन्यमय असा प्रकाश होता ज्याला आपण देव म्हणतो. बऱ्याच लोकांनी त्याच्या असण्याचा अनुभव घेतला आहे. अध्यात्माच्या किंवा मनःशांती मिळविण्याच्या मार्गावर मानव सजगतेने अभ्यास करू लागला आहे. ध्यानाचे, योगाचे महत्व जगभरातील बुद्धिजीवींनी जाणले आहे. या विषयात सर्वांची रुची वाढत जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु हे चेतनेचे रहस्य केवळ योग्य अध्यात्मिक मार्गावर स्वतःला योग्य दिशेने नेत आपणच पटवून घेऊ शकतो, अनुभवू शकतो. कारण देवाचे असणे किंवा नसणे हा एक अनुभव आहे. जो कुणीच कुणालाही पटवून वा समजावून सांगू शकत नाही. ही अनुभूती ज्याने त्याने स्वतःच घ्यावी. आणि स्वतःच्या शोधतच देवाचे अस्तित्व लपलेले आहे हे प्रत्येकाला जाणवेल. परंतु सावधानतेने जाणत्याच्या मार्गदर्शनाने या वाटेवर पाऊल टाकावे.

अध्यात्म या विषयावर विवेचन देताना सुरुवातीलाच बुद्धिवादी जीवांच्या शंकेचे निरसन करीत पुराणे एकेक उकल करीत जातात तेंव्हा या विश्वाचे गूढ हळूहळू ज्ञात होऊ लागते. आणि बुद्धीवरचे अज्ञानाचे सावट दूर होत जाते. या आधुनिक काळातील आधुनिक, तरुण पिढीला विज्ञानाच्या भाषेत किंवा विज्ञानातील उदाहरणे देऊन एखादी गोष्ट पटवल्या शिवाय ती पटत नाही. पण तुम्ही कितीही मॉडर्न वागलात तरी तुमच्या आतली चेतना ही या सृष्टीची निर्मिती झाली त्या काळापासूनची ईतकी जुनी आहे कारण हा आत्म्याचा प्रवास आहे देहाचा नाही. असो, तर तो ज्याचा त्याचा विश्वास. जो मानवता हा धर्म पाळतो तो स्वतः कितीजरी म्हणाला मी देव मानत नाही तरी तो आस्तिकच झाला आणि जो दिवस रात्र पूजा अर्चा करीत असेल पण माणुसकीची भाषा जाणला नाही तर तो स्वतःला आस्तिक जरी मानत असला तरी तो नास्तिकच झाला. ईतक्या भिन्न स्वभावाचे, भिन्न अंगकाठीचे, काळे-गोरे लोक, सारे वरकरणी निराळे भासले तरी आपण सगळेच खरंतर एकाच बिंदूतून जन्मलो आहोत. तेजमहाभूत म्हणजे फोटॉन्स , प्रकाशाची ऊर्जा आहे. आपल्या सभोवार कणाकणात आहे. कोणत्याही देवतेची उपासना करणे म्हणजेच तेजाची उपासना करणे होय. ब्रम्हा, विष्णू, महेश ही प्रतीकं आहेत क्रमवार निर्माता (क्रिएशन), प्रतिपालक (मेंटेनन्स), आणि कायापालट (मेटामॉर्फोसिस)याची... हि तीन निरनिराळी तत्त्वं सतत सर्वत्र दरक्षणाला अस्तित्वात असतात. मग ते बाहेरील वातावरण असो वा आपला देह असो. क्षणाक्षणाला आपल्या देहात हजारो पेशी जन्माला येत आहेत, काही काळ रहात आहेत आणि मग हजारोंच्या संख्येत मरत आहेत. त्यांचे जन्म घेणे हे काम ब्रम्हाचे तर काही काळ टिकणे हे कार्य विष्णूचे आणि त्यांचा मृत्यू होऊन पुन्हा कायापालट होणे हे महेशाचे, रुद्राचे कार्य आहे. म्हणजे मरत काहीच नाही तर केवळ रिसायकलिंग होत असते. या तीन घटनांचा क्रम सृष्टीत अनंत काळापासून चालत आलेला आहे. तसे पाहता आपण सारे साधारणपणे साठ ते सत्तर पर्यंत आयुष्य जगतो. परंतु विचार करा की, आपल्या देहातील पाच हजार पेशी मेल्या आणि केवळ चार हजारच पेशी जन्मल्या तर..? आपले आयुर्मान नक्कीच कमी होईल आपला मृत्यू होईल. पण सुदैवाने तसे होत नाही कारण आपल्या देहात वरील तिन्ही तत्व कार्यरत आहेत. म्हणूनच हे अखंड सत्र न थांबता चालू आहे. त्यांच्यामुळेच आपण जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो आहोत.

'द कोहरन्ट एनर्जी' म्हणजे अवकाशातील तरंग लहरींची ऊर्जा किंवा चैतन्य म्हणू. देव, देवालये सारे समोर दिसत जरी असले तरी आपण वर आकाशाकडे पहात देवाला गाऱ्हाणे घालतो. ते तसे पहाता फारसे चूक देखील नाहीय कारण अवकाशातील फोटो पहाता असे दिसून येते की आपल्या मेंदू मधील शंभर बिलियनहुन अधिक प्रमाणात असलेले न्यूरॉन्स मधून होणाऱ्या विद्युत लहरींचा आवेग ज्याला न्यूरॉन फायरिंग म्हणतात त्याचे फोटो घेतल्यास अगदी सारखेच आहेत. एकार्थी संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मेंदूशी जोडलेले आहे. जे बाहेर आहे तेच आत देहात आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने नर ते नारायण प्रवास नक्कीच आहे. कारण वर मेंदू च्या भागाला आपण सहस्रार चक्र म्हणतो त्यामुळे मूलाधार ते स्वाधिष्ठान, मग मणिपूर ते अनाहत, मग विशुद्ध ते आज्ञा चक्र आणि मग सहस्रार चक्र. अशी ही देहातील सात चक्रे शुद्ध करण्याचे कार्य सद्गुरू करत असतात. हा जीव ते शिव प्रवास करण्यासाठी मध्ये मैलाचे दगड पार करावे लागतात. सत्व, रज आणि तम हे गुण. पुन्हा त्रिगुणाशी गाठ येतेच. यांना जिंकायचे कसे ते सांगते गुरुचरित्र. कणाकणात जर परमेश्वरी शक्ती आहे तर माझे कौतुक करणाराही मीच आहे, आणि मला नावे ठेवणारा देखील परमेश्वराचेच रूप आहे. हा भाव आत्मसात करता आला तर आपण आस्तिक आहोत.

मुळात विश्व निर्माण झालं ते क्वांटम फिल्ड मधनं. एक बिग बँग झाला काही नाही मध्ये एक स्पंदन उमटलं. आणि ब्रम्हाचे कार्य सुरू झाले निर्मिती घडली. दत्तगुरूंमध्ये एक तोंड ब्रम्हदेवाचे आहे. निर्माण कर्त्याचे आहे. हे जर प्रतिकात्मक असेल तर या देहात देखील तो ब्रम्हा आहे म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही तुम्हाला वाटेल तसे तुमच्या आयुष्यात घडवू शकता. हे देखिल विज्ञानाने आज सिध्द केले आहे. प्रकाशाचे बिंदू म्हणजे फोटॉन्स, तेजमहाभूत यांना परीक्षा नळीत टाकले असता ते वेडेवाकडे कसेही फिरत रहातात परंतु त्यात जर मानवी डीएनए सोडला तर मात्र ते त्या डीएनएचा आकार घेतात म्हणजेच काय की जसे आपण तसा आपला देव. या क्वांटम फिल्डमध्ये आपल्याला जे हवंय ते साकार करण्याची क्षमता आहे. हे यावरून सिद्ध होते. कारण आपल्या देवाने आपल्या भाव भावनांचा आकार घेतला आहे. आयुष्यात ज्या चुकीच्या घटना घडताहेत ते आपल्याच चुकीच्या डीएनए पॅटर्न मुळे ज्याने चुकीच्या विचारांचा आकार घेऊन जीवनात हे प्रश्न उपस्थित केले आहेत. जेव्हा मेंदूमध्ये भाव भावना सुरू होतात तेंव्हा तिथे वेगळ्या तऱ्हेच्या विद्युत तरंग लहरी (इलेक्ट्रो एनसफेलोग्राम) निर्माण होतात. व वेगळं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. ज्यामुळे आपल्या आतल्या या मॅग्नेटिक फिल्डने बाहेरच्या फोटॉन्सना हवे तसे वळवता येते. ते फोटॉन्स म्हणजे तुमचा देव आहे असे समजले तर ते तुमच्याकडे आकर्षिले जातात. केंव्हा? जेंव्हा आपल्यात भावना उत्पन्न होतात. आपण फील करू लागतो तेंव्हा. जे आपण म्हणू देवा उद्या मला नोकरी मिळु देत...तर देव म्हणेल याला कधीच दयायला नको, असे का? कारण उद्याचा दिवस उगवला की आपण म्हणतो उद्या मिळु देत. देव म्हणतो उद्या. म्हणून देवाकडून कधी अपेक्षित उत्तर मिळत नाही. फिजिक्स मध्ये टाईम ही गोष्ट नाहीय. चालू वर्तमान काळ हा एकच काळ आहे. उद्या मिळू दे नाही, लवकरात लवकर मिळू दे नाही कारण ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपली पन्नास वर्षे मग लवकरात लवकर मिळू दे म्हणजे देव म्हणेल,"दहा हजार वर्षांनी देतो तुला काय हवं ते." तर आपल्याला ते चालेल??? आपली दहा हजार वर्षें देवासाठी दहा मिनिटे पण नाहीत. हे सद्गुरूंनी सांगितले तेव्हा काळजात थोडेसे धस्स झाले की, आपण आजपर्यंत ज्या काही प्रार्थना देवाला केल्या त्या किती चुकीच्या होत्या. या क्वांटम फिल्डमध्ये आपण आपल्याला जे हवंय ते जाणीवपूर्वक योग्य संदेशाद्वारे पोहोचविले तर अनंत पटीने आपली झोळी सुखद क्षणांनी भरून जाते. त्यासाठी आपल्याला जे हवंय ते आधी वर्तमान काळात देवाकडे मागायला शिकायचे. जे घडायला हवे ते झाले आहे असे बोलत सतत या क्वांटम फिल्डला संदेश देत रहायचा. मनासारखं घडलं तर उत्तम अन्यथा तक्रार करत बसू नये आणि आपले प्रयत्न थांबवू नयेत. आपण हवे ते निर्माण करू शकतो ह्याचे ज्ञान जरी झाले असले तरी आपला विवेक जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत आपण त्या क्वांटम फिल्ड पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तसे या वैश्विक उर्जेशी जोडून देण्याचे ज्ञान याचा अभ्यास म्हणजे अध्यात्म जे केवळ योग्य अधिकारी व्यक्तीच आपल्याला देऊ शकतात अन्यथा कुणीही नाही. अध्यात्म वेगळं काही नाही जीवन जगताना एका वेगळ्या नजरेने स्वतःकडे पाहणं म्हणजेच अध्यात्म आहे. असे 'आय एम दॅट' ह्या निसर्गदत्त महाराजांच्या पुस्तकात स्पष्ट केला गेलेला उल्लेख वाचला तेव्हा हे सारे ज्ञान या छोट्याशा मेंदूत साठवताना अक्षरशः विचारांची कोंडी झाली. पण ती सोडविण्यासाठी लक्षपूर्वक अवती भवती पाहिल्यास साऱ्या सृष्टीचे गूढ विज्ञानाच्या आधारे सोपे होते. शेवटी आपल्या तार्किक मेंदूचे तर्क-कुतर्क जिथे संपतात तिथूनच पुढे अध्यात्म सुरू होते.

देवाविषयी एक तक्रार मला लहानपणापासून स्वस्थ बसू देत नव्हती ती म्हणजे आपण कितीही चांगले वागले तरी देव आपलीच परीक्षा घेतो आणि जो त्रास जी संकटे यायची आहेत ती आपल्यावरच का? समोरच्या काही व्यक्ती ईतक्या वाईट वागताना दिसत आहेत त्यांना मात्र कधीच देव शिक्षा करत नाही. असे का? खरंतर कधी कधी वाटतं हा का? घेऊनच आपण जन्माला आलो. मी ईथे का? हवा अदृश्य का? नंबर्स न संपणारे का? डोंगर नेहमी टोकदार का? असे बरेचसे का..? का..? का...? या 'का' मूळेच कदाचित आपल्या मृत्यूनंतर कावळ्याला पिंडदान करत असावेत. काकाका....???? करत बसा...यावर देखील उत्तर सापडले जेंव्हा माझ्या पहाण्यात 'द शॅक' नावाचा संवेदनशील सिनेमा आला. यातील नायक आपल्या पाच सहा वर्षांवरील मुलीवर बलात्कार करून तिला ठार करणाऱ्या नराधमाच्या शोधात मनात बदल्याची भावना घेऊन आहे परंतु त्याचा अपघात होतो आणि स्वर्गात त्याची गाठ 'Wisdom God' - बुद्धीच्या देवतेशी पडते. ती त्याला सांगते की, "मनातून ही बदल्याची भावना काढून टाक आणि त्या पापी व्यक्तीस मनापासून क्षमा कर." पण तो क्रोधीत होतो व "ईतके निर्घृण पाप करणाऱ्यास मी क्षमा नाही करू शकत". असे राग अनावर होत बोलतो. त्यावेळी त्याच्या समोर त्याच्या दोन्ही तरुण मुलांना ती देवता उभे करते व सांगते की, "ही तुझी मुलगी जी तुला पिता मानत नाही. आपल्या धाकट्या बहिणीच्या मृत्यूस ती तुला जबाबदार ठरवतेय. आणि हा तुझा मुलगा जो तुझ्यामागे घरातून बाहेर पार्ट्या करतो, तुझ्याशी खोटे बोलतो, चैन करतो. माझ्या नजरेने तुझी दोन्ही मुले अपराधी आहेत. बोल यापैकी मी कोणास जीवदान देऊ? निवड कर."...नायक हे ऐकताच कोसळतो गयावया करतो की, "कशीही असली तरी ती माझी मुलं आहेत त्यांना क्षमा कर आणि त्यांच्या जागी माझा जीव घे." त्यावेळी 'Wisdom God' च्या डोळ्यांत पाणी तरळते ती म्हणते, "जशी ती तुझी मुलं आहेत तसा तो अपराधी काय किंवा तू काय तुम्ही देखील माझी मुलं अहात मी तुमच्या मध्ये निवड कशी करू? तू माझा लाडका पुत्र आहेस म्हणून मी तुला क्षमा करण्यास सांगत आहे कारण तसे केल्याने तुलाच मनःशांती लाभणार आहे. तो वाईट मार्गावर जात आहे त्याला सन्मार्ग दाखविण्यासाठी मला त्याच्यावर जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे."......या दृश्याने मला जाणविले की वाईट वागणाऱ्या सोबत देव का असतो? कारण ती आपल्या सर्वांची आई आहे. जे चांगले गुणी मूल आहे ते तिने दाखविलेल्या मार्गावर चालणारच आहे तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत जे मुल सन्मार्ग सोडून भरकटत असेल तर ती त्याकडे संपूर्ण लक्ष देणारच. जे उशिरा का होईना मी फील केलं तेंव्हा मला पटलं. देव, सभ्यता आणि अध्यात्म असे एकमेकांना जोडलेले आहेत. परंतु ह्या गुंत्यात अडकून न पडता दृष्टीवरील अज्ञानाचे मोहोळ दूर करण्यासाठी सतत शोधक बनावे. कारण जिज्ञासूला देव आपले खरे रूप कधी ना कधी दाखवितोच.

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

naresh farle

naresh farle 3 वर्ष पूर्वी

Ramesh Muge

Ramesh Muge 3 वर्ष पूर्वी

Prem JOGADAND

Prem JOGADAND 3 वर्ष पूर्वी

From Turkey

From Turkey 3 वर्ष पूर्वी

नक्कीच विचार करायला लावते पुरातन शिल्पाचे पुरावे. देवाचा शोध वेगळ्या तऱ्हेने...खूपच रोचक

Shobha Tikam

Shobha Tikam 3 वर्ष पूर्वी

खूप छान.पुराण आणि विज्ञान यांची सांगड घालून देवाचे अस्तित्व सुंदररित्या समजावले आहे.