लग जा गले.. १

लग जा गले.. १

"लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो, शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो ना हो.." शांत समुद्र किनाऱ्यावर नेहा अमोलच्या खांद्यावर डोक ठेऊन गाण गुणगुणत होती. गाण म्हणता म्हणता तिच्या डोळ्यात टचकन पाणीच आल. आणि तिचे अश्रू अमोलच्या खांद्यावर पडले..

"आपली साथ इथपर्यंतच होती नेहा.. रडू नकोस तू....मला नाही आवडत तुला रडतांना पाहायला.." नेहाचे अश्रू पुसत अमोल बोलला..

"हो पण अस का झाल अमोल? मला तुझ्याबरोबर आयुष्य घालवायच आहे रे..."

"ते मला माहिती आहे.. पण आपण रडायला भेटतो आहोत का आज? मला तुझ्या बरोबर प्रत्येक क्षण घालवू दे नेहा.. आजची रात्र मी पूर्ण जगून घेणार की मला त्या आठवणी पूर्ण आयुष्यभर पुरतील. त्यामुळे आता रडण थांबव आणि समुद्र कसा दिसतोय बघ.. रात्रीच्या वेळी समुद्र किती सुंदर दिसतो ना?"

"हो रे अमोल.. समुद्र..किती सुंदर दिसतो आहे!! अथांग काहींही अंत नसलेला...आपल्या नात्यासारखा? पण आपल नात पूर्ण का होऊ शकल नाही रे अमोल?"

"नेहा.." अमोल नेहा कडे पाहून मोठ्या आवाजात बोलला,"मी सांगितलं ना... आत्ता मला तुझा सहवास हवा आहे.. तुझ रडण नाही.. सो प्लीज ग नेहा.. आणि मला त्रास होत नाही अस वाटतंय का? पण..."

"काय पण..?"

"काही नाही अग.. तू समुद्र बघ...आणि तुझा हात माझ्या हातात दे...मला समुद्रकिनारी तुझ्या बरोबर एकरूप होऊन जाऊन दे...मला आता ह्याच क्षणात नेहमीच राहायचं आहे. हा क्षण मला पुन्हा मिळणार नाही त्यामुळे आता जरा वेळ काहीच बोलू नकोस.."

"ठीके... मी सुद्धा हा क्षण मनात साठवून ठेवते.."

जरा वेळ दोघ शांत बसून राहिले.. समुद्रकिनारी कोणीच नव्हत. फक्त आवाज होता तो समुद्राच्या लाटांचा.. समुद्राची गाज खर तर नेहाला नेहमीच आवडायची.. पण त्या दिवशी मात्र तिला समुद्राच्या लाटांचा आवाज घाबरवत होता. अमोल काहीच बोलत नव्हता त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज सोडला तर कोणतेच आवाज नव्हते. नेहाला शांतता नकोशी वाटायला लागली. आणि तिने शेवटी शांतता भंग केलीच. आणि नेहा बोलायला लागली,

"नको रे अमोल ही शांतता.. आता शांतता नको वाटते.. ह्या पुढील आयुष्य असाच शांत असणारे माझ्यासाठी.. पण आज नको शांतता.. तू बोलत राहा माझ्याशी..."

"ह.." अमोल इतक बोलला आणि पुहा शांत बसला..

"ह काय फक्त... मी म्हणाले तू बोलत राहा अमोल.. मला समुद्राच्या लाटांच्या आवाजाची भीती वाटते आहे आता..म्हणून म्हणाले बोल तर नुसत ह म्हणून तू गप्प झालास.."

"हो हो नेहा.. मला तर ह्या लाटांच्या आवाजात मिसळून गेल्यासारखं वाटतय.. काहीच नको आता.. तू माझ्या जवळ आहेस आणि आता कश्याचीच ओढ नाही राहिली आहे. पण तुला अशीच माझ्याजवळ राहा हे म्हणण देखील चुकीच आहे..उद्या.."अमोल इतक बोलला आणि एकदमच गप्प झाला.

"का थांबलास.. तू बोलत राहा अमोल! तुझ बोलण थांबवू नकोस! आणि हो रे अमोल... मला पण तुझ्याशिवाय काहीच नको.. म्हणूनच तर तुला म्हणाले तू बोलत राहा फक्त... मला आता समुद्राची गाज सुद्धा नको.. मला तुझ्या श्वासात समरूप व्हायचं आहे आता." नेहा इतक बोलली आणि तिने अमोल ला घट्ट मिठी मारली...तिच्या डोळ्यातून परत अश्रू आले आणि ते अमोलच्या गालावर पडले..

"उद्या..आपली लग्न आहेत.. आयुष्य किती परीक्षा घेत ना? जर आपण एकत्र राहूच शकणार नव्हतो तर आपण भेटलो तरी का?" अमोल बोलला

"हो..गम्मत आहे ना.. आयुष्य वेगवेगळ्या रुपात परीक्षा घेत असत! उद्या दोघांची लग्न..पण वेगळ्या लोकांबरोबर.. हाहा!! कस असत ना आयुष्य!! काय अर्थ असेल अश्या नात्याला ज्यात प्रेमच नसेल? आपल प्रेम आहे पण आपण एक होऊ शकत नाही. अश्या आयुष्याला हो म्हणून पुढे कस जात राहायचं रे अमोल? आपण भेटलो कारण माझं आयुष्य जगायला मला आयुष्यभर तुझ्या आठवणींची साथ असेल.. पण माझ्या आयुष्याला दिशा मिळाली आणि आता तू माझ्यापासून दूर जातो आहेस!"

"असंच असत आयुष्य नेहा.. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. पण असो.. आपण घालवलेले क्षण किती सुंदर होते आणि ते क्षण मला पूर्ण आयुष्य जगण्यासाठी पुरेसे आहेत नेहा.."

दोघ भावूक होऊन एकमेकांशी बोलत होते आणि तितक्यात पाउस पडायला लागला,

"उठ नेहा.. इथे नको बसायला... उगाच तू आजारी पडशील.. आणि ते मला अजिबात चालणार नाही."

"तू वेडा आहेस का रे अमोल? इतका सुंदर पाउस आणि मी तुझ्या मिठीत..ह्यापेक्षा अजून काय हव मला? आणि तू मला इथून उठायला सांगतो आहेस? आणि मी तुझ्या मिठीच्या उबेत असतांना पाऊस मला आजारी कसा पाडेल?"

"हो? तू माझ्यावर इतक प्रेम नको करूस नेहा.. आपण दुरावलो की तुला नंतर खूप त्रास होईल ग.." अमोल नेहाचा हात घट्ट पकडत म्हणाला..

"प्रेम ठरवून करता येत नाही अमोल.. ते तुलाही चांगलच माहिती आहे...आणि तू मला लेक्चर देतो आहेस, तुझं माझ्यावरच प्रेम कधी कमी होणार आहे? हो तर म्हणूच नकोस.. मी तुला खूप चांगल ओळखते. अखेरच्या श्वासापर्यंत तू फक्त माझ्यावरच प्रेम करत राहणार.."

"हो हो नेहा... आय लव यु सो मच!!! पण परिस्थिती आपल्याला एक होऊन देत नाहीये.. ए, नको हा विषय आता नेहा.. प्लीज!! आज नंतर परत कधी आपली भेट होईल माहिती नाही. मला तुझ्याबरोबरचा वेळ मनात साठवून ठेवायचा आहे."

"सॉरी.. मी आपली शेवटची भेट नकारात्मक करते आहे ना? नको सारखा तोच विषय.. अमोल, तुला आठवत आहे आपण कसे भेटलो होतो?"

"कसा विसरेन नेहा आपली पहिली भेट..? म्हणजे मी तुला पहिल्यांदी पाहिलं होत तो क्षण.. तू तेव्हा मला पाहिलं का ते नाही माहिती.. मुसळधार पाऊस होता.. पाऊस चिंब भिजवून टाकत होता..आणि तेव्हा समोर तू रिक्षाला हाक मारतांना दिसलीस मला.. तू सुद्धा ओली चिंब झाली होतीस.. आणि तुला पाहता क्षणी माझ मन ओलं चिंब भिऊन गेला.. जणू पाऊस माझ्या मनाला भिडत होता.. त्या आधी पाऊसाने किती वेळा ओलं केल होत पण तुला पाहिलं आणि भिजण म्हणजे काय हे मला जाणवलं. तुला पाहिलं आणि नकळत मी पाऊसात रमलो..गाणी गुणगुणायला लागलो.. तू समोरून निघून गेलीस पण तरीही तू माझ्या मनात मात्र पक्की बसली होतीस!!"

"मी पण तुला पाहिलं होतं अमोल... तू माझ्याकडे वेड्यासारखा पाहत होतास..मला कसल ऑकवर्ड झाल होत तेव्हा!! मी निघून गेले पण तुझा चेहरा माझ्या नजरेसमोरून जात नव्हता. मग नंतर आपण पुन्हा भेटलो आणि पहिल्यांदी बोललो..मला तुला वर्षानुवर्ष ओळखते आहे असा भास होत होता."

"पण आता आपला सहवास संपणार.. आपला इतकाच सहवास प्लॅन्ड होता. कोई नही नेहा.. पुढच्या जन्मी मात्र मी तुला सोडणार नाही कुठेच.."

"पण पुढच्या जन्माची वाट का पहायची? ह्या जन्मी का नाही होऊ शकत आपण एक अमोल?" केविलवाणी होऊन नेहा बोलत होती. पण तिला अंदाज होता, आता काहीही होऊ शकणार नव्हत. दोघांची लग्न वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर होणार होती हेच सत्य होत. नेहाच्या मनात अमोल पासून दूर जाण्याचा विचार आला आणि ती एकदम रडवेलीच झाली. तिने अमोल ला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून परत अश्रू बाहेर आले..

"आता परत नेहा? नको ना ग रडूस.. मला आनंदानी सी ऑफ कर,, मग मला आयुष्य जगता येईल. नाहीतर मात्र माझा आयुष्य संपून जाईल.." नेहा अमोल च बोलण ऐकत होती आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता आपले हात अमोल च्या तोंडावर ठेवले..

"वेडा आहेस का अमोल? तू आयुष्य संपून जायची भाषा केलीस तर बघच..मी कुठेही जाणार नाही तुला एकट्याला सोडून.."

"अस कस करून चालेल नेहा.. उद्या तुझ लग्न आहे. आणि जे येईल ते आनंदानी करण्याच वचन दिल आहेस तू.."

"मग तू का काहीही बडबड करतो आहेस अमोल? आणि मी रडत नव्हते रे... पाऊसचे थेंब कपाळावरून खाली आले.. आणि तुला वाटल मी रडत आहे.. नाही नाही.. तस काहीच नाही.." डोळे पुसत नेहा म्हणाली..

"हो का.. बर बर.. ए चल आता तू निघ!!! तुला घरी न पाहून तुझ्या घराचे चिंतेत पडतील."

"हो.. पण सांग आता परत कधी भेटणार मला?"

"नाही माहिती ग... पण तू मस्त राहा! अजिबात उदास होऊ नकोस आणि माझी आठवण काढून रडायचं तर अजिबात नाही नेहा.. मला जाणवत तू रडायला लागलीस के..मग मी पण दुःखी होईन!!"

"नाही रे रडत..पण सांग तुझी आठवण येणार नाही अस होईल का? आणि तुझी आठवण झाली की रडू तर येणारच ना?"

"मी आहेच ना तुझ्या मनात मग तरी माझी आठवण का येईल?" हसत अमोल बोलला. खर तर त्याचा हेतू होता नेहाचा मूड लाईट करायचा.. आणि नेहा ला आंनदी ठेवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता.

"ठीके अमोल... पण तू सुद्धा माझी आठवण काढून दुःखी व्हायचं नाहीस. मला तस वचन दे.. तू खुश राहा! माझ्यासाठी ते खूप महत्वाच असेल."

"हो हो.." अमोल म्हणला, "ए चल.. तू आता घरी जा.. उद्या लग्न.." अमोल ह्यावेळी मात्र स्वतःचे अश्रू थांबवू शकला नाही.. आणि त्यानी मन वळवली..

"काय झाल? मान का वळावलीस? कर की मला फेस.. रड की माझ्यासमोर!! होत नाही न सहन दूर जाण? मलाही असाच होतंय पण मला मात्र किती ऐकवलस.. ए, आपण घरी जायलाच नको.. इथूनच कुठेतरी लांब निघून जाऊ! म्हणजे काहीच प्रश्न येणार नाहीत."

"नाही नाही नेहा.. अस वागू शकत नाही आपण.. तू घरी जा! आता एकही मिनिट माझ्या समोर थांबू नकोस!! जा.. इथून लगेचच जा... तू अजून माझ्या नजरेसमोर राहिलीस तर मात्र माझी हिम्मत संपेल.. आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही!"

"जाते जाते अमोल... एकदा शेवटच मिठीत सामावून घेशील?"

"हो.." अमोल इतक बोलाल आणि त्याने नेहाला घट्ट मिठी मारली आणि नंतर मात्र नेहा तिथे एकही मिनिट थांबली नाही.. ती धावत धावत तिथून दूर निघून गेली.. जातांना तिने मागे वळून पाहिलं सुद्धा नाही.

अनुजा कुलकर्णी.

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Verified icon

Kanchan Mahajan 1 वर्ष पूर्वी

Verified icon

Vaish 1 वर्ष पूर्वी

Verified icon

Pranita Nikam 1 वर्ष पूर्वी

Verified icon

Sagar Bhosale 1 वर्ष पूर्वी

Verified icon

Dipika 1 वर्ष पूर्वी