जिद्दीची कहाणी

जिद्दीची कहाणी

दीप्ती मिठे

सीमेवर सांडूनी रक्त, आम्ही सांभाळतो देशाचे तख्त.

आम्हां मोह नाही दुसरा, सदा राहो देश अमुचा हसरा.

जयगीत निनादत राहो, आम्हां आठवणीत स्मरा हो.

ही सलामी आमुची शान, हा तिरंगा आमुचा मान.

गेली जरी ही जान,वाहेल नसानसांत 'जयहिंद' जयगान.

आपल्या घरापासून आणि प्रियजनांपासून दूर भारताचे हे नायक देशातील सामान्य नागरिकांना शांत तसेच निर्धास्त झोप मिळावी याकरिता ऊन, वारा, पाऊस, हिम वर्षाव कोणत्याही मोसमात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जात सतत सजग असतात. हे देशप्रेमी प्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासही कचरत नाहीत. त्यांच्या ध्येयाची आणि धाडसाची कथा त्यांच्या छोट्याशा आयुष्यापेक्षाही खूप मौल्यवान आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या अशा या अभूतपूर्व महान नायकांची कहाणी वाचा आणि अभिमानाने मनोमनी त्यांचे आभार मानुया कारण केवळ असे लढवय्ये सीमेवर अहोरात्र जागत असतात म्हणून आपण निःसंकोचपणे आपल्या दिनचर्येत मग्न राहू शकतो. आपल्या लोखंडी बाहूंनी ते ना केवळ सीमेचे रक्षण करीत आहेत, तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ते तटस्थपणे उभे आहेत. रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीची त्यांना पर्वा नाही तर कधी भाजून होरपळून टाकणारा उष्मा त्यांच्या धाडसी आणि एकाग्र बुद्धिमत्तेला मोडू शकला नाही. आपल्या देशाशी त्यांची एकनिष्ठता कायम दुणावत गेली. हिम्मत वाढवत गेली. कुणीतरी असे म्हटले आहे की, आपला तिरंगा हवेमुळे फडकत नसून त्याचे रक्षण करताना शहीद होणाऱ्या त्या प्रत्येक सैनिकाच्या शेवटच्या श्वासामुळे फडकत आहे. निसर्गही ज्यांच्यापुढे मानाने झुकला असावा असे हे भारताचे सुपुत्र, निडर लढवय्ये भारताच्या मुकुटातील प्रभावशाली तेजस्वी हिरेच आहेत जणू. तसे पाहता सीमेवर लढणारे एकूणएक सैनिक हे नायक च आहेत. पण त्यापैकी काहींची कहाणी आख्यायिका बनली. जी वाचताना आपले डोळे पाणावल्याशिवाय रहाणार नाहीत. अशी कहाणी जी प्रत्येक नागरिकाने एकमेकांना सांगावी, वारंवार ती चर्चिली जावी. अशा धाडसाच्या सत्यकथा युवा पिढी तील अनेकांसाठी प्रेरणा बनाव्या. हाच यामागील सद् हेतू.

शेर शाह ऑफ कारगिल - कॅप्टन विक्रम बत्रा :

26 जुलै 1999 रोजी, भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तान विरूद्ध मोठ्या हिंमतीने निर्णायक युद्ध जिंकले. या क्रूर, घातकी लढाईत, अनेक बहादूर तरुण सैनिकांनी देशाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची बाजी लावली. कारगिलच्या दुर्दैवी, असुरक्षित युद्धभूमीवर भारतीय वीर जवानांनी मोलाची कामगिरी बजावली. तेव्हापासून आज जवळपास अठरा वर्षांहून अधिक कालावधी लोटला असला तरीही कारगिल युद्धातील वीर आपल्या अतुलनीय धैर्य आणि त्यागामुळे अजूनही देशाच्या स्मृतीत टिकून आहेत. या लढाईत बऱ्याच धाडसी सैनिकांपैकी एक असा तरुण होता जो आज प्रत्येक तरुण भारतीय सैनिकाचा चेहरा असावा. जे देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत भयंकर क्रूरपणे लढतात आणि अगदी निर्भयपणे मरण पावतात. ही कहाणी आहे परमवीर चक्र विक्रम बत्रा यांची. अविश्वसनीय धाडसी जवान ज्याची रणांगणातील निर्णायक भूमिका एखाद्या हिरोपेक्षा कैक पटीने अधिक साहसी होती, वाखाणण्याजोगी होती.

9 सप्टेंबर 1974 रोजी जन्मलेल्या हिमाचल प्रदेशातील विक्रम बत्रा यांनी त्यांचे बालपण पालमपूरच्या सुंदर डोंगरी भागात घालवले. जुळ्या मुलांमध्ये ते त्यांचा भाऊ वियालहुन केवळ14 मिनिटांनी मोठे होते. शासकीय शाळेचे प्रमुख गिरधारी लाल बत्रा, आणि शाळा शिक्षिका कमल कांत यांचे हे तिसरे अपत्य. आपले वर्गमित्र व शिक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला विक्रम शाळेत अष्टपैलू व्यक्तमत्वाचा होता. अभ्यासात तर उत्तम होताच परंतु तो उत्कृष्ट खेळाडू देखील होता आणि सह-अभ्यासकांच्या उपक्रमांमध्ये तो उत्साहाने सहभागी होत असे. उत्तर भारतातील सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेटचे प्रतिपादन केले, तर कराटेचा हिरवा पट्टाही मिळवला आणि राष्ट्रीय स्तरावर टेबल टेनिस देखील खेळला. लहान वयापासूनच तीव्र देशभक्तीने विक्रमला संमोहित केले होते. त्याचे ध्येय एकच होते आणि त्यानुसार त्याची वाटचाल लष्करी अभ्यासक्रमाकडे वळली. 1995 मध्ये त्यांनी बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर संयुक्तरीत्या डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना काहीच आश्चर्य वाटले नाही. विशेष म्हणजे हॉंगकॉंग च्या एका फर्मद्वारे त्यांना तेथिल नौदलाने नोकरीसाठी निवडले होते. शेवटी त्याने त्याचे विचार बदलले, आपल्या आईला सांगितले, "पैसा हेच काही जीवनातील सर्वकाही नाही; मला आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे, काहीतरी महान, काहीतरी असाधारण, माझ्या देशासाठी." साधारणपणे एक दशकानंतर विक्रम यांचा हा निर्णय इंडियन ऑइल प्रिंट मोहिमेत प्रशंसीला गेला. कारण त्याने देशाच्या सेवेसाठी एक आकर्षक करिअर नाकारले होते.

1996 साली त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले जेव्हा त्यांनी सीडीएसची परीक्षा उत्तीर्ण केली व इंडियन मिलिटरी अॅकॅडेमी मध्ये प्रवेश मिळवला आणि लेफ्टनंट म्हणून त्यांना नेमणूक मिळाली. त्यांचे पहिले पोस्ट जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सिपोर गावात होते. 1999 मध्ये जेव्हा कारगिल युद्धाची सुरुवात झाली, तेव्हा विक्रमने नुकतेच बेळगाव येथे आपला कमांडो कोर्स पूर्ण केला होता आणि आपल्या कुटुंबासह होळी साजरी करण्याकरिता पालमपूर येथे रजा घेऊन आला होता. घरी परतल्यावर तो नेहमीच न्यूगल कॅफे मध्ये आपल्या दोस्तांसोबत कॉफी पिण्यासाठी जायचा. त्यावेळी आपल्या मित्रांच्या काळजीपूर्वक शब्दांना उत्तर देताना विक्रम म्हणाला होता की, "काळजी करू नकोस. मी भारताचा विजयी ध्वज हातात फडकवत घेऊन येईन अन्यथा त्याच ध्वजात लपेटून येईन. पण मी निश्चित परत येईन."

त्यानंतर विक्रमच्या युनिटला कारगिलकडे जाण्याचे आदेश दिले गेले आणि 1 जून 1999 रोजी त्यांना ड्युटी जॉईन केली. अठरा दिवसांनंतर 19 जून 1999 रोजी त्यांना पॉईंट 5140 ला पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. ही लढत या युद्धातील प्रमुख लढाई ठरली. उंचीचा फायदा घेत असलेल्या शत्रुच्या विरोधातही विक्रम आणि त्याच्या सोबत असलेल्या जवानांनी शत्रुंवर हुशार गनिमिकाव्याने लढा दिला. शत्रूच्या छावणीला सामोरे जात तोंड द्यावे लागले, त्यांचे सैनिक मारले गेले आणि 13 जम्मू आणि काश्मिर रायफल्स यांनी भारताला निर्णायक विजय मिळवून दिला. हा भाग पुन्हा भारताच्या ताब्यात आला. आणि नंतर टायगर हिलच्या पायथ्याशी भारताची विजयी वाटचाल मजबूत झाली.

आपले सर्व जवान सुरक्षित असलेले पाहून आनंदाने त्यावेळी आपल्या बेस कमांडर यांना विक्रम म्हणाले, "ये दिल मांगे मोअर.." पेप्सीचे हे प्रसिद्ध घोषवाक्य म्हणत त्यांनी शत्रूला पुन्हा पुन्हा परास्त करण्याची आपली तीव्र भावना व्यक्त केली. पाकिस्तानी सैनिकांकडून हस्तगत केलेल्या अँटी-एअर क्राफ्ट गन्स सोबत या तरुण कॅप्टनचे हसरे छायाचित्र या युद्धाचे दूरदर्शनवर चिरकाल टिकलेले अस्तित्व दर्शविते. विक्रम चे वडील 20 जून ची ती सकाळ कधीच विसरणार नाहीत ज्यावेळी विक्रमने त्यांना कॉल करून सांगितले.की, 'आम्ही शत्रूंच्या ठिकाणावर विजय प्राप्त केला असून मी बरा आहे.' डोळ्यांतली आसवे तशीच रोखून धरत वडिलांनी अभिमानाने प्रत्त्युत्तर दिले की, 'बेटा..! मला तुझ्यावर गर्व आहे. युद्धातील तुझे पुढील लक्ष गाठण्याकरिता देव तुझे रक्षण करो.' त्यानंतर नऊ दिवसांनी अजून एका खडतर कामगिरीवर निघण्याआधी विक्रम ने आपल्या बेस कॅम्प मधून घरच्यांना शेवटचा कॉल केला, 'मी एकदम फिट आहे. माझी अजिबात काळजी करू नका.'

कारगिल मधील या युद्धा दरम्यान विक्रमच्या हाती पुढील सर्वात कठीण पर्वत युद्ध मोहीम देण्यात आली होती ती म्हणजे - 17000 फिट हाय पॉईंट 4875 वर कब्जा करण्याची. या शिखरावरील हिमाच्छादित उतार 80 डिग्री सखोल होता. शिवाय चारीबाजूला असणाऱ्या दात धुक्यामुळे तो मार्ग अधिकच धोकादायक होता. त्यात पाकिस्तानी सैन्य 16000 फूट उंचीवर दबा धरून बसले होते.

7 जुलै च्या रात्री विक्रमनी आपल्या सैन्यासोबत त्यांचे मनोबल वाढवीत ती असामान्य चढाई सुरू केली. कारण आता त्यांना 16000 फुटापर्यंत चढून आक्रमक करायचे होते. वाऱ्यासारखी बातमी शत्रूपर्यंत पोहोचली की, 'शेर-शाह' येत आहे. विक्रम यांना सैन्यात मिळालेले हे गौरवशाली टोपण नाव होते. शत्रूला हे कळताच त्यांनी आक्रमण वाढविले. मोर्टार आणि ऑटोमॅटिक फायर चा वर्षाव सुरू केला. त्यांना ठाऊक होते शेर-शाह कोण आहे..? कारण तोपर्यंत या तरुण धडाडीच्या मिलिटरी ऑफिसर व त्याच्या साथीदारांच्या पराक्रमाची गाथा चहूकडे पसरली होती. विक्रम शत्रूवर भयानक क्रूरपणे हल्ला करीत होते सोबतीला त्यांचे मित्र आणि सहकारी अधिकारी अनुज नय्यर होते. या दोन्ही शूरवीरांनी आपल्या हाताने ताकदीनिशी लढत देत शत्रूंकडे असलेले बंकर काबीज केले. आणि आपल्या सैन्यास मार्ग मोकळा करून देत पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. या दोन बहादूर शूरांनी मागे वळून न पहाता केवळ शस्त्राने शत्रूस माघार घेण्यास भाग पाडले. हे मिशन जवळपास संपुष्टात येऊ लागले होते परंतु एक स्फोटात विक्रम यांच्या एका ज्युनिअर ऑफिसरचे पाय घायाळ झाले. ताबडतोब कोणताही विचार न करता त्याला वाचविण्यासाठी विक्रम आपल्या बंकरमधून बाहेर आले. त्यांच्या सुभेदार नी विक्रमना विनवणी केली की, त्यांच्या ऐवजी तो बाहेर जाऊ शकतो पण आपण बाहेर जाऊ नका. पण विक्रम त्याला म्हणाले की, 'तू बालबच्चेदार आहेस. मागे हट.' जखमी लेफ्टनंटच्या दिशेने जात असताना त्यांनी पाच शत्रू सैनिकांची ना केवळ हत्या केली तर शत्रूच्या मशीन गन पोस्टवर ग्रेनेड फेकले. ज्यामुळे जबरदस्त आग लागली होती. अशा परिस्थितीत विक्रम आपल्या घायाळ साथीदाराला उचलून घेण्यात यशस्वी झाले परंतु त्यांच्या छातीला गोळी लागली. आणि ते गंभीररित्या घायाळ झाले. असे असले तरीही मिशन पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी आपला देह त्यागला. त्यांच्या या साहसी कामगिरीमुळेच भारतातील काही महान लष्करी नायकांच्या बरोबरीने त्यांचे नाव आज घेतले जाते. शत्रुच्या बंकरांना साफ करताना त्यांचे साथीदार कॅप्टन अनुज नय्यर यांचेही निधन झाले. सकाळ उजाडताना भारताने 4875 शिखर काबीज केले. परंतु आपल्या थोर पराक्रमी पुत्रांना गमावले. आज या शिखराला विक्रम बत्रा टॉप असे संबोधण्यात येते. विक्रम यांच्या अंत्येष्टी च्या क्षणी त्यांच्या आईच्या तोंडून उद्गार बाहेर पडले की, 'कदाचित म्हणूनच देवाने मला जुळी मुले दिली असावीत एक देशासाठी व एक माझ्यासाठी.' शत्रुच्या चेहऱ्यावरील भीती. सर्वांगीण पराक्रम दाखवत यशस्वीपणे मोहीम पार पाडण्याकरिता कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र - युद्धातील शौर्यासाठी भारताचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला तर कॅप्टन अनुज नय्यर यांना महावीर चक्र देण्यात आले. जे देशातील दुसरे सन्मान चिन्ह आहे.

एकीकडे कॅप्टन विक्रम बत्रा यांसारखे कैक शूरवीर आपल्या प्राणांची बाजी लावून पराक्रमाने देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर लढत आहेत. तर दुसरीकडे बलात्कारी, चाईल्ड अब्युझर्स किंवा अॅसिड अॅटॅकर्स यासारखे देशातीलच आंतरिक शत्रू मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. यांच्याशी दोन हात करताना मात्र कायद्याच्या बंधनात राहून संयमाने आणि जिद्दीने झुंज देताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तरीही समाजातील या घातक नराधमांना वठणीवर आणणाऱ्या व हिंमतीने लढणाऱ्या स्त्रिया आज राणी लक्ष्मीबाई किंवा जिजाऊंच्या रूपात आपल्या ध्येयावर ठाम उभ्या राहून शर्थीने लढा देत आहेत. जगभरात भारताची मान उंचावेल असे कार्य करीत आहेत. केवळ भारतातील जनते पुरते मर्यादित रहाता जगाच्या कल्याणार्थ ज्यांनी एक पाऊल उचलले त्यांच्या मागे आज जगभरातून पाठिंबा देणारे हात भारतातील मातीत जन्मलेल्या या मूर्तिमंत जिद्दीचे प्रतीक असणाऱ्या प्रतिभाशाली नायक-नायिकांसाठी कौतुकाची थाप देत आहेत. हे आपणां सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. एक स्त्री म्हणून आपल्या बाबतीत जे झाले त्यामुळे शरमेने हार मानता समाजात ताठ मानेने उभे राहणे हेही वाखाणण्याजोगे आहे. नाही का..?

लक्ष्मी अगरवाल दिक्षित : (अॅसिड अॅटॅक मोहीम)

'सत्यमेव जयते' या आमिर खानच्या लोकप्रिय कार्यक्रमात आपण साऱ्यांनीच लक्ष्मीला पाहिले आहे. अॅसिड अॅटॅक थांबविण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभागी असणारी लक्ष्मी आज छांव फाउंडेशन ची डायरेक्टर आहे. ही एनजीओ अॅसिड अॅटॅक झालेल्या व त्यातून वाचलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी तत्पर आहे. 2014 साली इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज हे पारितोषिक यु.एस. फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या हस्ते लक्ष्मीला देण्यात आले. शिवाय तिला एनडिटीव्ही द्वारे 'इंडियन ऑफ द ईयर' म्हणून निवडण्यात आले. तसेच न्यू एक्सप्रेस वर जून 2014 साली 'उडान' नावाचा टीव्ही शो होस्ट करण्याची संधी तिला मिळाली. असे कैक सन्मान व पारितोषिके तिने आजवरच्या तिच्या कारकिर्दीत मिळविली. भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील आज जगभरातील अॅसिड अॅटॅकचे बळी ठरलेल्यांसाठी ती आश्रय स्थान आहे. तिने स्थापित केलेल्या संस्थेद्वारे ना केवळ अशा स्त्रियांना पुन्हा नव्याने जगण्याची उमेद ती देत आहे तर अॅसिड विक्रीवर देखील बंदी आणण्यासाठी ती सतत प्रयत्नशील आहे. तिच्याच सोबत या मोहिमे अंतर्गत काम करणारा आपला सरकारी मित्र आलोक दीक्षित याच्यासोबत लक्ष्मी 2014 साली विवाहबद्ध झाली असून तिला पिहू नावाची मुलगी देखील आहे.

केवळ पंधरा वर्षांची असताना 2006 साली, तुगलक रोड, नवी दिल्ली येथे लग्नास नकार दिल्याने 32 वर्षाच्या संतप्त नराधमाने तिच्यावर अॅसिड अॅटॅक केला ज्यात तिचा चेहराच नव्हे तर शरीराच्या इतर भागांतही व्यंग निर्माण झाले. त्यावेळी संपूर्णपणे हार न मानता जिद्दीने तिने आलेल्या प्रसंगाला तोंड दिले व 27000 स्वाक्षऱ्या मिळवून इंडियन सुप्रीम कोर्टात अॅसिड च्या विक्रीवर आळा बसविण्यासाठी एक पेटीशन दिली. ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना एसिडच्या विक्रीचे नियमन करण्याचे आदेश दिले आणि संसदेला ऍसिड हल्ल्याची कार्यवाही करणे सोपे झाले. मानसिक आणि शारीरिक पातळीवर संपूर्णपणे उध्वस्त झालेल्या महिलांसाठी ती आज एक आशेचा किरण बनली आहे. भारतासाठी ही खरोखरच गौरवाची बाब आहे.

सोहेला अब्दूलली : (महिला शोषण विरोधी)

फारच थोड्या लोकांना सोहेला विषयी ठाऊक असेल. पण तिने लिहिलेले पुस्तक 'व्हॉट वुई टॉक अबाउट व्हेन वुई टॉक अबाउट रेप' - हे वाचनात आले आणि तिचा अत्यंत अपमानास्पद अशा दुखद वेदनेतून सुरू झालेला प्रवास तिच्यासाठी कशाप्रकारे जगण्याची दिशा बनला हे पाहता अनेक बलात्कार पिडीत व्यक्तींसाठी ती प्रेरणादायी ठरते असे मला वाटते. मी व्यक्तींसाठी असे ईथे मुद्दाम लिहीत आहे कारण सध्याच्या काळात स्त्रीया, तान्ही बालके, लहान मुले-मुलीच नव्हे तर पुरुषांवरही बलात्कार होत आहेत. आणि हे दारुण सत्य देशाच्या हितासाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तींसाठी लज्जास्पद आहे.

1980 साली, वयाच्या 17व्या वर्षी चेंबूर, मुंबई येथील डोंगराळ भागात आपल्या मित्रासोबत फिरायला गेली असताना हातात कोयत्यासारखी धारदार वस्तू असणाऱ्या चार अज्ञात ईसमांद्वारे तिच्यावर गँग रेप झाला. पोलिसांकडून मदतीपेक्षा सल्ले ऐकायला मिळाले व जे झाले त्याला तीच दोषी असल्याचे ठामपणे सांगितले व ते निघून गेले. या घटनेनंतर गळ्यात स्कार्फ गुंडाळण्याची देखील तिला भीती वाटू लागली वाटायचे की जणूकाही पुन्हा ते लोक तिचा गळा दाबत आहेत, प्रत्येक क्षण असुरक्षितता, भीती, लोकांच्या नजरा आणि लाज या भावना स्वस्थ बसू देत नव्हत्या. बलात्कार हा केवळ शारीरिक हानी करीत नाही तर मानसिक पातळीवर देखील तो आघात असतो.

यानंतर तब्बल तीन वर्षांनी तिने स्वतः बाबत घडलेला सारा प्रकार मनुषी या भारतीय मॅगझीन साठी लेख म्हणून लिहिला. भारतात आजही सुशिक्षित मध्यम वर्गीय परिवारात बलात्कार ही मुलींसाठी लज्जास्पद बाब मानली जाते. त्यामुळे पोलिसांत तक्रार नोंदवणे तर दूरची गोष्ट आहे. भारतातील प्रसार माध्यमे वा मंचावर बोलताना सोहेला म्हणते की, अत्यंत क्रूरपणे तिच्यावर कित्येक तास बलात्कार करणाऱ्या त्या राक्षसी प्रवृत्ती बद्दल आजही आपल्याकडे कठोर न्यायालयीन कार्यवाही होत नाही. कारण बलात्कार पीडित महिला जेंव्हा पोलिसांकडे मदतीसाठी जाते तेंव्हा त्यांच्या प्रश्नांनी आणि चौकशी दरम्यान वारंवार तिच्या मनावर बलात्कार होत रहातो. ज्यामुळे महिलांना आत्महत्या करावी लागत आहे. परंतु खरे तर ही त्या पुरुषांसाठी शरमेची बाब आहे. मग स्त्रियांनी हार का मानावी..? कौमार्यापेक्षा जीवन खरे लाख मोलाचे आहे. हा विचार करून सोहेलाने जगण्याचा निर्णय घेतला. सकारात्मक दृष्टिकोन ढळू दिला नाही. जगण्यासाठी तिने स्वतःशीच संघर्ष केला. कारण, स्वतःच्याच नजरेत जो पडतो तो कधीही सावरू शकत नाही. म्हणून स्त्रियांचे शोषण करणाऱ्यांच्या विरोधात काम करण्याचे तिने ठरवले. आपल्या लेखणीतून तिने आपले विचार, आपल्या तीक्ष्ण भावना जगासमोर मांडल्या. त्या काळात तिच्या स्पष्टवक्तेपणा वर समाजाकडून बरीच टिकास्त्रे ही सोडण्यात आली. पण ती शांत बसून सारे सहन करणाऱ्यातली नव्हती. एकंदरीत यौन शोषण विरोधात जगभरात ती कार्यरत आहे.

सोहेलाचा जन्म मुंबईत झाला असून तिने बीए ची पदवी मिळवली ब्रॅण्डेईस युनिव्हर्सिटी ईन इकॉनॉमिक्स अँड सोशीओलॉजी मधून तर स्टेनफर्ड युनिव्हर्सिटी ईन कम्युनिकेशन मधून एमए ची पदवी प्राप्त केली. सोहेला एक उत्कृष्ट लेखिका व संपादिका म्हणून जगभरात नावारूपाला आली आहे. विविध विषयांवरील तिचे लिखाण व वर्गीकरण ईतके विलक्षण गुंफलेले असते की वाचक त्यात हरवून जातो. ऑक्सफॅम, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, सेसमे वर्कशॉप इंटरनॅशनल आणि युनायटेड वुई ड्रीम साठी तिने लिहिले आहे. तसेच अनुदान, वार्षिक अहवाल, वेब कॉपी, ऑप-एड्स, ब्लॉग आणि लेख इत्यादी ती लिहिते आणि संपादित करते. तिच्या जानेवारी 2013 सलातील न्यू यॉर्क टाइम्समधील ऑप-एडने वाचकवर्ग रेकॉर्डस् मोडला.

कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर सोहेलाने बोस्टन एरिया रेप क्राइसेस साठी दोन वर्षे काम केले. एक पत्रकार म्हणून तिने फिलाडेल्फिया, बोस्टन तसेच भारतात काम केले. तिने अशा बऱ्याच क्षेत्रात काम केले जसे की, मानसिक रुग्णालयात झोपेत संशोधन करणे, औद्योगिक गुप्तचर यंत्रणेचे काम करणे, घोस्टरायटिंग करणे असे कैक अनुभव गाठीशी बांधले. अखेर 1998 साली, हार्परकॉलिन्स इंडियाने तीची कादंबरी 'द मॅडवूमन ऑफ जोगेर' प्रकाशित केली. तसेच 2010 साली, पेंग्विन इंडियाने 'ईयर ऑफ द टायगर' प्रकाशित केली. ज्यामुळे जागतिक पातळीवर लेखिका म्हणून ती नावारूपाला आली. तिने दोन फोर्ड फाउंडेशन अनुदान मिळविली. स्त्रियांच्या हक्कासाठी ती लिहिते, उभी राहते, सोहेलाने लिहिलेली पुस्तके भारत, अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडामध्ये प्रकाशित झाली आहेत. ती पॉईंट ऑफ व्ह्यू ची संस्थापक व सदस्य आहे. जो मुंबईतील वुमन मीडिया ग्रुप आहे. ती सध्या आपल्या कुटुंबासह मॅनहॅटनच्या लोअर ईस्ट साइडमध्ये राहत असून देखील मुंबईशी तिचे नाते अतूट आहे. ती उबंटू एज्युकेशन फ़ंड साठी सिनियर एडिटर म्हणून काम पहाते. जे साऊथ आफ्रिकेतील मुलांसाठी चालविले जाणारे एक इंटरनॅशनल एनजीओ आहे. तिची स्वतःची वेबसाईट आहे - www.sohailaink.com ज्यावर तिचे आजपर्यंतचे सर्व सामाजिक कार्य प्रसिध्द झाले आहे.

माझ्या दृष्टीने विचार करता नकारात्मकतेला देखील सकारात्मकतेने आपल्या जगण्याचे ध्येय मानणाऱ्या अशा व्यक्ती भारतासाठी शान आहेत. ज्या हार न मानता दुसऱ्यांना प्रेरणा देत तिरंग्या प्रमाणे कोणत्याही ऋतूत कणखरपणे उभ्या आहेत. मग तो हल्ला देशाच्या सीमेवर असो वा व्यक्तिशः सामाजिक पातळीवर असो. झुंज देत जगणे ज्याला आले व ज्याने अनेकांना आपल्या सारखे बनविले त्या साऱ्या नायकांचे स्थान भारताच्या विजयी मुकुटातील रत्नां मध्ये आहे. भारताच्या यशस्विततेची, संयमाची, संस्कारांची, जिद्दीची, मानाची, गौरवाची जगभर ओळख करून देणाऱ्या या व्यक्तींचे जितके कौतुक करावे तितके थोडे.

By

Dip methe

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Yogesh Bilange 11 महिना पूर्वी

Shyam Dasre Dasre 11 महिना पूर्वी

Pravin Akkiwate 11 महिना पूर्वी

Surekha 11 महिना पूर्वी

Ganesh Naiknavare 11 महिना पूर्वी

शेअर करा