Alvani - 11 books and stories free download online pdf in Marathi

अलवणी - ११

रामुकाका दोघांना घेऊन खोलीत गेले. शाल्मली आणि मोहीत गप्पा मारत बसले होते. त्या तिघांना आत येताना पहाताच दोघंही उठुन उभे राहीले.

रामुकाका खोलीच्या मध्यभागी उभे राहीले आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्या भोवती कोंडाळे केले. रामुकाकांनी आपल्या कपाळाचा गंध शाल्मली सोडुन आकाश, मोहीत आणि जयंताला लावला आणि म्हणाले.. “उद्या आंघोळीला सुट्टी द्या, आपण इथुन जाईपर्यंत हा गंधच आपले रक्षण करणार आहे, तो पुसुन देऊ नका..”

तिघांनीही गुणी बाळासारख्या माना डोलावल्या.

“रामुकाका मी राहीले…”, शाल्मली निरागसपणे म्हणाली.

“तुला पण लावणार, पण आत्ता नाही, वेळ आली की नक्की लावीन..” असं म्हणुन रामुकाका आकाशकडे वळले आणि म्हणाले, “आकाश, तु इथे शाल्मली आणि मोहीतपाशीच थांब. मला आणि जयंताला बाहेर थोडं काम आहे, ते उरकुन येतो”

“काय, कसलं कामं?” हे विचारण्याच्या भानगडीत आकाश पडला नाही, योग्य वेळ येताच ते एक तर कळेलच किंवा रामुकाका स्वतःहुन सांगतील ह्याची त्याला खात्री होती.

रामुकाका खोलीच्या बाहेर पडले आणि कसलेही प्रश्न न विचारता जयंताही त्यांच्या मागोमाग बाहेर पडला.


रामुकाका बंगल्याचे कुंपण ओलांडुन झपझप चालत बाहेर पडले. वाटेत कुणीच कुणाशी बोलले नाही.

काही मिनीटं चालल्यावर रामुकाका एका पडक्या, जुनाट कौलारु झोपडीवजा घरापाशी येऊन थांबले, क्षणभर इकडे तिकडे बघुन मग त्यांनी डोळे मिटले आणि

’ ॐ श्री विष्णवे नमः ।’
’ ॐ श्री विष्णवे नमः ।’
’ ॐ श्री विष्णवे नमः ॥’


असा ३ वेळा जप केला व मग जयंताला म्हणाले, “जयंता, दाराचे हे कुलुप तोड..”

जयंताने कुलुप निरखुन बघीतले. कुलुप जरी मजबुत असले तरीही बरेच जुने असल्याने दरवाज्याची कडी खिळखीळी झाली होती. जयंताने अंगणातुन एक मोठ्ठा दगड आणला आणि दोन-तीन घावातच त्याने कडी तोडुन काढली.

करकर आवाज करत दरवाजा आतल्या बाजुने उघडला गेला.

रामुकाका आणि जयंता आतमध्ये आले. जयंताने लगेच घराच्या खिडक्या उघडल्या त्यामुळे अंधारात बुडालेले ते घर स्वच्छ सुर्यप्रकाशाने उजळुन निघाले.

“रामुकाका… कुणाचे घर आहे हे?”, अत्यंत हळु आवाजात जयंताने विचारले..
“नेत्रा!!”, रामुकाका म्हणाले… तसे जयंता दोन पावलं मागे सरकला.

रामुकाकांची वेधक नजर त्या खोलीत कश्याचा तरी शोध घेत होती. बराच वेळ शोधल्यावर ते एका कॉटपाशी येऊन थांबले आणि त्यांनी जयंताला खुण केली.

“जयंता, ती खालची पेटी ओढ बरं जरा बाहेर…”, रामुकाका एका लाकडी ट्रंककडे बोट दाखवत म्हणाले.

जयंता खाली वाकला आणि त्याने ती जड पेटी बाहेर ओढली. पेटी नुसती कडी घालुन बंद केली होती, त्याला कुलुप वगैरे काही लावलेले नव्हते ह्यावरुन त्या पेटीत काही मौल्यवान असेल असे वाटत नव्हते.

रामुकाकांनी वरवरची धुळ हाताने झटकली आणि कडी काढून ती पेटी उघडली.

वरतीच एका निरागस १२ एक वर्षाच्या मुलीचा आणि साधारण एका पस्तीशीतल्या स्त्रीचा फोटो होता. रामुकाकांनी तो फोटो निरखुन पाहीला आणि कडेला ठेवुन दिला.

त्या फोटोच्या खाली लहान मुलीचे फ्रॉक्स, गळ्यातले, कानातले साधे दागीने, बिट्याच्या बिया, मोडलेल्या ४-५ बाहुल्या असेच काही बाही सामान होते.

“हे….. हे सर्व नेत्राचे आहे का?”, जयंताने विचारले.
“हो.. नेत्राचेच आहे हे.. चल आपल्याला ही ट्रंक घेउन बंगल्यावर जायचे आहे..”, असं म्हणुन रामुकाकांनी ती पेटी बंद करुन टाकली.

जयंताने ती पेटी उचलुन खांद्यावर घेतली आणि दोघंजण पुन्हा बंगल्याच्या दिशेने चालु लागले.

दोघंजणं बंगल्यात परत आले तेंव्हा दुपारची जेवणाची वेळ टळुन गेली होती. शाल्मलीने सर्वांसाठी जमेल तेवढा, जमेल तसा थोडाफार स्वयंपाक बनवुन ठेवला होता. रामुकाका आणि जयंता येताच सर्वांनी प्रथम जेवुन घेतले.

जेवण झाल्यावर रामुकाका ती पेटी घेऊन दिवाणखान्यात आले जेथे सर्वजण त्यांची वाट बघत बसले होते. रामुकाकांनी ती पेटी सर्वांच्या मधोमध झाकण उघडुन ठेवली. सर्वजण आतील वस्तु निरखुन बघत होते.

“आजची रात्र.. आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आजवर जे वार आपल्यावर झाले ते आज आपण पलटवुन लावणार आहोत.”, रामुकाका निर्धाराने म्हणाले.. “शमु बेटा, ह्या लढ्यात सर्वात जास्त सहभाग तुझाच असणार आहे. त्या अघोरी शक्तीने तुझ्या शरीराची निवड केली होती, तेंव्हा त्या लढ्यात आपण तुझाच वापर त्या शक्ती विरुध्द लढण्यासाठी करणार आहोत”, शाल्मलीकडे बघत रामुकाका म्हणाले.

शाल्मलीची अस्वस्थता तिच्या हालचालीतुन दिसुन येत होती.

“घाबरु नकोस बेटा, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत… तुला काही होऊ देणार नाही..”, शाल्मलीच्या डोक्यावर हात ठेवत रामुकाका म्हणाले.. “फक्त एक लक्षात ठेव तु मनाने खंबीर रहा, कुणालाही स्वतःवर आधीक्य गाजवु देवु नकोस, स्वतःचे अस्तीत्व जागृत ठेव, आमच्या बोलण्याकडे लक्ष ठेव. अशी वेळ येईल जेंव्हा तुला तुझ्याशीच लढुन आम्ही सांगीतलेल्या काही गोष्टी कराव्या लागतील…” रामुकाका शाल्मलीला सुचना देत होते आणि शाल्मली प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकत होती.

“रामुकाका, नेत्राचा शेवट झाला म्हणजे आपण सुटलो असे समजायचे का?”, आकाशने विचारले.

“नाही…”, थोड्यावेळ विचार करुन रामुकाका म्हणाले..”नेत्रा खरं तर ह्या खेळातील एक प्यादं आहे, आपल्याला नेत्रापेक्षा जास्त शक्तीमान, जास्त भयानक विकृतीविरुध्द लढा द्यायचा आहे.. आज रात्री आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या आपल्याला आपल्याच शास्त्राने, आपल्याच संस्काराने शिकवलेल्या आहेत. पिढ्या-दर-पिढ्या आपण त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवला त्या गोष्टी आज आपल्याला आचरणात आणायच्या आहेत. तेंव्हा अशी आशा करुयात कि आपल्या धर्माने जे आपल्याला, आपल्या पुर्वजांना शिकवलं, ते सर्व सत्य आहे..”

“पण रामुकाका, जर ते बोगस ठरलं तर? आपण सामान्य माणसं आहोत, कोणी ज्ञानी, तपस्वी, साधु नाही की ह्या अनिष्ठ प्रवृत्तीविरुध्द यशस्वी होऊ”, जयंता म्हणाला.

“बरोबर आहे जयंता, अगदी बरोबर आहे. आपण सामान्य माणसंच आहोत. परंतु आपल्या सामान्यत्वाला सत्यतेची धार आहे. जशी आगीची एक छोटीशी ठिणगी दारुगोळ्याने भरलेल्या कारखान्याला सुध्दा उडवुन लावु शकते तसेच आपणही आहोत. आपण एक छोटीशी ठिणगीच आहोत, जी योग्य जागी पडली तर अपप्रवृत्तीला परतवुन लावु शकु…”, रामुकाका म्हणाले.

सुर्य मावळतीकडे झुकला तसे रामुकाका उठुन उभे राहीले. सगळ्यांनी एकमेकांकडे एकवार पाहीले आणि मग ती पेटी घेऊन आपल्या खोलीत परतले.


खोलीमध्ये आल्यावर रामुकाकांनी आपल्या सदर्‍याच्या खिश्यातुन विटेचा एक तुकडा काढला जो बहुदा त्यांनी नेत्राच्या घरातुन परतताना वाटेतुन उचलुन आणला होता.

रामुकाकांनी समोरासमोर अशी ४ मंडलं त्या विटेच्या तुकड्याच्या सहाह्याने आखली. मग ते थोडेसे दुर गेले आणि गवताच्या काड्यांच्या सहाय्याने पाचवे मंडल थोडेसे तयार केले.

“कोणतेही शुभ काम करताना आपण मंडल आखल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही. बरोबर?”, रामुकाकांनी विचारले.

सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या.

“असं म्हणतात की मंडल हे ब्रम्हा, विष्णू, रुद्र, लक्ष्मी आणि अग्नी देवतांसाठी स्थान निर्माण करते. त्याच्या अस्तीत्वाने ह्या देवतांचा त्या जागी वास होतो असंच आपला धर्म आपल्याला सांगतो. जेंव्हा आपण आपलं काम सुरु करु तेंव्हा शाल्मली सोडुन आपण सर्वजणं ह्या मंडलामध्येच बसणार आहोत जेणेकरुन कुठलीही वाईट शक्ती आपल्याला हात लावु शकणार नाही.”, रामुकाका म्हणाले

“पण शाल्मली का नाही?”, आकाशने विचारले.

“जसं मी मगाशी म्हणालो, आपण शाल्मलीचाच उपयोग नेत्राचा शेवट करण्यासाठी करणार आहोत आणि त्यासाठी नेत्रा शाल्मलीच्या शरीरात प्रवेश करणं महत्वाचं आहे. शाल्मली जर मंडलाच्या आतमध्ये असेल तर नेत्रा तिच्या शरीरात प्रवेश करु शकणार नाही..”, रामुकाका म्हणाले..

मग शाल्मलीकडे वळुन ते म्हणाले, “योग्य वेळ येताच मी तुला त्या मंडलाच्या आतमध्ये प्रवेश करायला सांगेन. अर्थात तुला तुझ्याच शरीराकडुन विरोध होईल कारण तुझ्या शरीरावर त्या वेळी फक्त तुझाच नाही तर नेत्राचाही ताबा असेल. पण तु तुझी सर्व शक्ती पणाला लाव आणि ह्या मंडलामध्ये प्रवेश करं”

“रामुकाका, केवळ उत्सुकतेपोटी विचारतो, पण तसं केल्यानंतर काय होईल?”, जयंता

“जयंता, गरुड पुराण सांगते, मंडलशिवाय प्राण त्याग केला तर त्या आत्म्याला पुढील जन्मासाठी योनी प्राप्त होत नाही, त्याचां आत्मा हवेबरोबर इतरत्र भटकत रहातो. एकदा का नेत्रा ह्या मंडलात आली की जे काही करायचं आहे ते मी करीनच, पण जर आपला विजय झाला तर त्यावेळी नेत्राच्या आत्म्याला मुक्ती मिळणं आवश्यक आहे आणि हे मंडल, आणि ह्या भोजपत्रात लिहिलेले काही मंत्र तिला त्याकामी मदत करतील..”, रामुकाका म्हणाले.

रामुकाकंनी त्यानंतर करावयाच्या क्रिया आणि त्यामधील प्रत्येकाची भुमीका सगळ्यांना समजावुन सांगीतली. मोहीतला पुन्हा पुन्हा त्या मंडलाबाहेर काहीही झालं तरी यायच्ं नाही हे सांगुन झालं.

पोर्णीमेसाठी अवघ्या काही तासांची प्रतिक्षा असणारा चंद्र डोक्यावर आला तसे रामुकाकांनी सर्वांना हाताने खुण केली आणि सर्वजण आप-आपल्या आखलेल्या मंडलात जाऊन बसले, तर शाल्मली बेडवरच बसुन राहीली.

रामुकाकांनी हात जोडले आणि डोळे मिटुन ते म्हणाले…

“य्प्रज्ञानमुक्त चेतो धृतीश्च य्ज्जोन्तिरान्त्मृत प्रजासु |
यस्मात्र हृते किं चन कर्म क्रियते तन्मे मनः शिवासंकाल्प्नमास्तु: ||”

रामुकाकांचे बोलणे झाल्यावर इतरांनीही तो मंत्र पुटपुटला.

मग रामुकाका म्हणाले, “ह्याचा अर्थ जो ज्ञानी आहे, जो धैर्यरूप आहे, जो मानवजातीच्या हृदयात राहून सर्व इंद्रियांना शक्ती प्रदान करतो, जो स्थूल शरीराच्या मृत्यू नंतरही अमर रहतो. ज्याच्याशिवाय कोणतेही कर्म करणे कठीण आहे असे माझे मन, माझा आत्म्याचे भगवंताच्या कृपेने कल्याण होवो.”

स्थिरपाण्यामध्ये एखादा दगड मारावा आणि तो छोट्टास्सा दगड त्या घनगंभीर पाण्याच्या पृष्ठभागावर असंख्य लहरी उमटवुन जातात. पाण्यावर उमटलेल्या लहरी, समुद्रात निर्माण होणार्‍या लाटा ह्या मनुष्याच्या नजरेस दिसणार्‍या भौतीक गोष्टी असतात, पण त्या निर्माण करणार्‍या अदृष्य शक्ती फक्त जाणवतात, त्या दिसत नाहीत, तसंच काहीसं तेथे घडलं. शांत असलेल्या त्या वातावरणात अचानक खळबळ उडाली. वार्‍याचा एक तुफानी झोत खोलीतल्या वस्तु हलवुन गेला.

सर्वजण ह्या अनपेक्षीत घटनेने दचकुन गेले आणि मग त्यांची नजर शाल्मलीकडे गेली.

आपण आपली मान अवघडल्यावर जशी मान गोलाकार फिरवतो, तसाच काहीसा प्रकार डोळे मिटलेल्या शाल्मलीच्या बाबतीत होत होता. ती स्वतःशीच असंबध्दपणे तोंडातल्या तोंडात ’हम्म… हम्म..’ असा सुर काढत होती.

रामुकाकांनी सर्वांना हातानेच शांत रहायची खूण केली.

“का रं म्हातार्‍या, गोड बोलुन तुला कळेना झालंय का? आज तुजा मुडदा पाडल्याबिगर म्या शांत नाय बसनार..”, असं म्हणुन शाल्मली उठुन उभी राहीली. खरं तर त्याला उभी राहीली म्हणणं चुकीच ठरेल कारण तिची पावलं जमीनीपासुन काही इंच वरच होती, तिचे हात पाय कडक झाले होते, विस्कटलेले केस तिचा चेहरा जणु काही झाकुनच टाकत होते.

शाल्मली रामुकाकांच्या दिशेने येत होती.

[क्रमशः]


[समाप्त]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED