तरुणाई आणि कन्फ्युजन

           सगळेच म्हणतात अकरावी ईज रेस्ट ईयर... पण आई म्हणते सगळे गेले मसणात अकरावी ईज टेस्ट ईयर...शाळेत नसते एवढी मोकळीक आणि सूट देऊन सुद्धा तुम्ही किती स्वतःवर कंट्रोल ठेवता याची ही टेस्ट असते...म्हणून हे टेस्ट ईयर..! यावर्षीच नविन चकचकीत ब्रँड न्यू मोबाईल दिला बाबाने. शाळेत कसा घरात कोणीतरी वापरलेला जुना मोबाईल हातात असायचा तो पण क्वार्टी कीपॅड वाला. दहावीत चांगले मार्क्स आणल्याचे फळ म्हणून हा स्मार्ट फोन. आई दहावेळा न चुकता सतर्कतेने सांगायची,
"मोबाईल सांभाळ..!"- सांभाळण्यासाठी मोबाईल हाती घेतला तर म्हणायची, "सतत काय रे हातात मोबाईल घेऊन बसलेला असतोस..?"
"अग तूच तर म्हणालीस ना सांभाळ मग तेच करतोय.."
"जास्त डोकं चालवू नकोस. मुर्ख समजलास का मला..? बघावं तेंव्हा त्या मोबाईल मध्ये...डोळे जातील ना गाढवा..!!"
"चष्मा घातलाय ना मी..?"
"मग काय आता दुर्बिणीच्या लेन्स लावून घ्यायच्या आहेत का चष्म्याला..?"
"आई..! तू जा गं... ठेवतो मी एवढा गेम झाला की.."
"जरा शरीराची हालचाल नाही का मैदानी खेळ नाहीत. सतत मोबाईल नाहीतर तो लॅपटॉप. अरे..! ढेरी बघ केवढी वाढत चालली आहे तुझी..?"
"असू दे गं..!"
"असू दे काय..? एक पोरगी वळून बघायची नाही अशाने तुझ्याकडे.."
"मग दे जिम साठी पैसे...गेल्या वर्षी पासून बोंबलतोय जातो जिमला.."
"पैसा खर्च करूनच फिटनेस मिळतो असा कोणता गाढव बोलला तुला ते सांग आधी. रोज एक तासभर ब्रिस्क वॉक केलास तरी पुष्कळ. सकाळी पार्क मध्ये फुकट योगा शिकवतात तिकडे जा..पण नाही..! ते जमायचं नाही तुला.."
हे असं घरात असलं की, आई हात धुवून मागे लागलेली असते. नुसती किरकिर...बरं झालं..! फोन वाजला वाटत हिचा..! आता निदान तासभर तरी शांती...पण नाहीच..एवढ्यात..!
"अंगद..! ए अंगद..! अरे कोण बोलतंय बघ.." आई हसत होती फार म्हणजे कोणीतरी खासच असणार. उगाच हळूहळू खुसरफुसर करत बोलत होती जसं काही मला ऐकायला येऊच नये पण एवढ्या मोठ्याने कुणी हळू बोलत का..?
"गप गं..! नाही सांगत मी त्याला कोण आहे ते...बघू ओळखतो का तुला..?" माझ्या हातात मोबाईल सोपवून आई अगदी उत्सुकतेने माझ्याकडे पहात बाजूला उभी राहिली. मला काहीच सुचत नव्हतं. आयला..! आत्ता कुठे गेम सुरू केला आणि हा कॉल यायचाच होता का..? चू...चुकीचं नाही का..?
"हॅलो..! हां.. कोण..? आता कसं ओळखणार..? नाही..करतो गेस पण काही क्लू दे ना..हम्म..! अं..?? ओह तेरी..! आयला... रेषा तू..? कान्ट बिलिव्ह ईट..? आहेस कुठे..? आणि नंबर कसा मिळाला आईचा..? ओके..! हम्म..! ओके कुल..! गुड आयडिया.. चालेल..हो येतो ना.. पक्का..यप..! डन..हो माझा नंबर सेंड करतो तुला.. ओके.. बाय..भेटू उद्या.."
"अरे..! कट पण केलास मला बोलायचं होतं वैशाली शी.."
"काकींचा नंबर व्हाट्सऍप करेल ती तुला तेंव्हा बोल ना.."
"कित्ती वर्षांनी बोलणं झालं नाही रेशु शी..? एकदम मॅच्युअर झाल्या सारखी बोलत होती..पाचवीत असताना शाळा सोडून गेली होती ना रे ?"
"हो..!
"कित्ती काळजी घ्यायची तुझी लहान असताना."
"हम्म..!"
"तू तर घरी गेलास त्यांच्या की वैशु म्हणायची बघा आला आमचा जावई..." आई मला चिडवत होती ते कळत होतं मला.
"कायतरीच काय आई..?"
"अरे..! खरंच..! ज्युनिअर ला होतात तेंव्हा तुम्ही. रेषु पण सतत तुझ्यासोबत असायची आणि तिच्या घरच्यांनाही तू खूप आवडायचास."
"असेल...फिफथला तिने शाळा सोडली तेव्हा पासून गेली पाच सहा वर्षं नो कॉन्टॅक्ट..एफ बी वर पण नाही ती. आता ती कशी दिसत असेल तेही माहीत नाही. आणि तू कुठे हा असला विचार करतेस.."
पण आई दिवसभर चिडवत राहिली आणि का कुणास ठाऊक मला तिचं चिडवणं आवडत होतं. रेषा उद्या भेटणार होती. व्हाट्सएपवर तिचा फोटो पाहून मी फूल टू फिदा झालो. छान दिसत होती. एकदम साधी सिम्पल नो मेकअप. जीन्स न व्हाईट टी शर्ट. मॉडर्न टॉम्बॉईश लूक. लहानपणी होती तशीच स्पोर्ट्स न फिटनेसची जाम आवड. त्यामुळे फिगर पण सही होती. लहानपणी तिला मी खूप आवडायचो अजूनही आवडत असलो तर...? काय धम्माल..! विचारानेच थोडासा कॉन्फिडन्स वाढला. उद्या कॉलेज सुटल्यावर शिवाजी पार्कला ती भेटणार आहे. म्हणजे साला बांद्रा हुन दादर गाठायचं. ट्रेनचा प्रवास..? संध्याकाळची गर्दी लोटालोट...! विचारानेच जीवावर येत होतं पण काय करणार प्यासे को ही कुवे के पास जाना भाग पडताय.. कुवा स्वतःहून कायको आयेगा..? दादर तक आ रहा हैं तेच खूप..नायतर ती रहायला नवी मुंबईला. पण कॉलेज दादरला असल्याने भेटतेय तरी. उद्या मला कॉलेज मधुन लवकर निघावं लागेल. माझे प्लॅनिंग्स सुरू झाले. रात्रभर या विचारांनी झोपच येईना.
"अंगद..! उठ..! उठ रे..! बघ कॉलेजला जायला उशीर झाला तर नंतर माझ्यावर राग काढत बसू नको. रात्रभर ते फालतू पबजी खेळत बसायचं आणि मग हे असं...उठ रे बाबा..!"
उठायची अजिबात ईच्छा नव्हती पण घड्याळा कडे लक्ष गेलं आणि झोपच उडाली. आज रेषा भेटणार आहे. मी पटापट आवरलं. तयार झालो आणि थेट कॉलेज गाठलं.
कॉलेजच्या कट्टा गँगकडे मुद्दाम दुर्लक्ष करत मी गेटमधून आत शिरलो तर एवढ्यात रिमा धावत माझ्या दिशेने येताना दिसली. आयला..! हिला काय झालं अचानक..? काल पर्यंत मी हिच्या मागे मागे धावायचो. साला अख्या कॉलेजला वाटत होतं की रिमा माझी जीएफ आहे. सगळे चिडवायचे हिच्या नावाने मला. पण हिचा टाका आधीच कुणाशी तरी भिडलेला. हिच्या बॉय फ्रेंड ने मला येऊन जेंव्हा आमचा काय लफडा चाललाय याचा जाब विचारला तेंव्हा मला समजलं की, भें....! भेंडी ही तर आधीच एंगेज आहे आणि मला कशाला मग झुलवत होती. जाम भडकलो होतो तेंव्हा रडत-रडत बोलायला लागली, मी आता ब्रेकअप करतेय त्याच्याशी तो खूप बॉसिंग करतो. तो असाच आहे, तो तसाच आहे. आणि मी विचारलं मग माझं काय तर म्हणते, 'यु आर माय बेस्ट फ्रेंड अंगद..' मी तुझ्याबद्दल कधी तसा विचार केलाच नाही. बेस्ट फ्रेंड माय फूट..! च्यायला..! कॉलेज चालू झाल्या दिवसापास्नं एक मिनिट मला सोडायची नाही. रात्री तीन वाजेपर्यंत व्हाट्सएपवर चॅट करायची. कॉलेजात भेटल्यावर रोज जाताना येताना हग करायची. मी कल्चरल च्या कामात बिझी असलो की माझ्या खाण्या जेवणाची हिला चिंता असायची. मग मीच काय माझ्या ग्रुपला पण वाटत होतं हिचं माझ्याशी सूत जुळलंय पण हिने तर बॉम्बच टाकला. 'अंगद..! मी आता कधीच रिलेशनशिप मध्ये येणार. "नाऊ आय वॉना फोकस ऑन माय करिअर.." मी तर उडालोच त्यावेळी हे सगळं ऐकून. काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडायची. आनंद झाला की पहिले मला येऊन मिठी मारायची. सिनेमाला हातात हात घालून बसायची आणि आता म्हणते, 'यु आर जस्ट माय फ्रेंड अंगद..' आयची कटकट साला दुधातून माशी बाजूला काढावी तशी मला फेकून गेली. आई नसती तर या धक्क्यातून सावरलो नसतो पट्कन. तरी आठवडाभर कॉलेजला गेलो नाही. आईने खूप समजावलं म्हणून आता डायरेक्ट लव्ह बिव्हचा विचार सोडून दिलाय मी. रिमाला तर कधीच ब्लॉकलिस्ट मध्ये टाकला. पण आता आज काय झालं हिला ? एवढी धापा टाकत येतेय.
"हे..हाय..!! अंगद..!"
"हाय..!" मी चालतच राहिलो. तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही.
"मला अव्हॉइड का करतोयस..? व्हॉट हॅपन..?"
"नथिंग..!" मी बोलायच्या मूड मध्ये नव्हतो.
"अंगद..! माझं काही चुकलं असेल तर सांग यार, पण असं नको ना वागू.." रिमा माझ्या सोबत माझा चालण्याचा स्पीड कॅपचर करत होती. मला जाम राग येत होता.
"लिसन..! रिमा..! मला नाही तुझ्याशी बोलायचं. ओके..? तुझा बीएफ, तुझे प्रॉब्लेम्स नाही ऐकायचंय हे सगळं मला."
"पण तू माझा फ्रेंड......"
"नो..!! फ्रेंड झोन नाही बनायचं मला. नाऊ लिव्ह मी..प्लिज."
मला आज खूप हलकं हलकं फील होत होतं. आई म्हणाली तसं क्लियर सांगून टाक मनातलं...सांगितलं सगळं आणि झालो मोकळा. शाळेत असल्यापासूनच पोरी फक्त माझ्या खांद्यासाठी जवळ यायच्या. आपली रडगाणी गायच्या आणि दूर व्हायच्या मी आपले स्वतःचे सोडून यांचे प्रॉब्लेम्स सोडवत बसायचो. आणि या मात्र आपल्या बॉय फ्रेंड सोबत मजा मारायच्या. पण आता असं नाही होणार. गेले ते दिवस जेंव्हा अंगद भाळून जायचा. ईझीली..! चू×× बनायचा.
संध्याकाळी माझ्या आधीच रेषा आली होती. आणि व्हॉट द हेल..? शाळेतले सगळे फ्रेंड्स तिच्या भोवती जमले होते. म्हणजे हिने मला एकट्याला बोलावलं नव्हतं. सगळ्यांनाच बोलावलं होतं. आमचा तेरा जणांचा ग्रुप होता शाळेत ज्युनिअर पासून टेंथ पर्यंत पण रेषाने तिच्या वडिलांच्या ट्रान्सफर मुळे फिफथला शाळा सोडली. बाकीचे आम्ही सगळे होतो कॉन्टॅक्ट मध्ये पण आज रेषा ने आम्हाला सगळ्यांनाच बोलावलंय ते कोणीच कसं बोललं नाही..?
"अरे..! मी मुद्दाम तुम्हाला बोलले की फक्त आपण भेटू. म्हणजे बघा तुम्हाला सगळ्यांनाच सरप्राईज मिळालं की नाही..?" रेषु जाम हसत होती. निरागसपणे. कित्ती छान...! अगदी...!!!! नो..नो..होल्ड.. अंगद जस्ट होल्ड...!!! तू परत तीच चूक करतोयस. कुल..! शी इज जस्ट युअर फ्रेंड...गॉट ईट..? यस..!
एकंदरीत ती संध्याकाळ खूप छान मजेत गेली एरव्ही आपापल्या कॉलेजमुळे न भेटणारे सगळे फ्रेंड्स एकत्र आलो. खूप गप्पा आणि शाळेतल्या आठवणींनी गल्ला केला. एकमेकांना बाय करताना जीवावर आलेलं. पण नेक्स्ट विक भेटण्याचा प्लॅन फिक्स करून आम्ही सारे आपापल्या वाटेने परतलो.
रेषुशी आता रोजच चॅटिंग सुरू झालं. आमचे स्वभाव एव्हाना खूपच बदलले होते. लहानपणीची निरागसता आताच्या मैत्रीत उरली नव्हती. हे मात्र फार जाणवत होतं. प्रत्येक वाक्याला तिची टिपिकल शिवीने सुरुवात व्हायची. मग मलापण तिच्याशी चॅट करताना ऑकवर्ड वाटेनासं झालं. हल्ली तिचं आमच्या घरी येणं देखिल वाढलं. आईची ती लाडकी होती म्हणून मग हळूहळू माझ्याही मनात चलबिचल सुरू झाली. आमच्या भेटी ग्रुपशिवाय होऊ लागल्या. मग समजलं की तिचाही बीएफ होता. रेषुनेच ब्रेकअप केलं कारण तो लॉयल नव्हता. ती तशी फटकळ आहे हे मला माहित होतंच. मनात येईल ते फटकन बोलून मोकळी होते. कधीकधी मला असं काही बोलली की इन्सलटिंग वाटत पण मग वाटत की मनात ठेवून वरवर छान छान वागणाऱ्यांपेक्षा तरी रेषा बरी.
आज मरिन्सला फिरताना तिनेच माझा हात हातात घेतला. आम्ही गप्पा मारत चालत होतो आणि नकळत माझा हात तिच्या कमरेभोवती गेला तिनेही तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. अगदी सहजपणे ती वावरत होती. माझी लहानपणीची बेस्ट फ्रेंड. जी मला लहानपणापासून ओळखते. माझ्या आवडी निवडी माहीत असणारी. मला कोणी त्रास दिला तर त्याच्या दोन थोबाडात लगावून देणारी माझी सुरक्षाकवच. कुणालाही न घाबरणारी. सतत बडबड करणारी माझी मैत्रीण रेषा. जर माझी जीएफ झाली तर..? स्पष्ट बोलणं तिला आवडत होतं आणि ती माझ्या खूप जवळ होती. वातावरण तसं पहाता माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने रोमँटिक होतं, म्हणून मग मी धीर करून मनात जे होत तिच्याबद्दल ते बोलून मोकळा झालो. तिला काही शॉक बिक बसला नाही. ती उलट म्हणाली,"अरे..! थांब की, जरा करिअर वगैरे होऊ देत. काय घाई आहे..? तोपर्यंत तुला कोणीतरी आवडेल किंवा मला पण कोणी आवडू शकतं उगाच कमिटमेंट देऊन कशाला अडकवायच स्वतःला..? जे जसं आहे तसं चालू दे की..!"
मी थोडासा हिरमुसलो पण मग तीच बोलणं पटतही होतं. पण तिला कोणी दुसरा आवडला तर..? हा विचार सहन होणारा नव्हता. तरी मी माझ्या इमोशन्सवर कसाबसा कंट्रोल केला. मनात म्हटलं अॅटलिस्ट ही माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत तर नाहीय.
म्हणता म्हणता दोन वर्ष गेली आणि डिग्री कॉलेजात पदार्पण झालं. अजूनही माझा ऑलवेज अव्हेलेबल हा स्वभाव माझ्या इमोशन्सची मारत होता. आईने कित्तीवेळा सांगून सुद्धा पोरींचे कॉल्स आले की मी पट्कन धावायचो. जागून रात्रभर चॅटिंग करून एखादा चॅप्टर त्यांना समजला नसेल तर समजवायचो. प्रोजेक्ट वर्क करून द्यायचो. जमेल तितकी मदत करायचो. आई जाम शिव्या घालायची पण माझं समाजकार्य चालू होतं. डिग्रीला आल्यावर सिद्धी तशी मला खूप आवडायला लागली. मी रेषा शी देखील हे शेअर केलं ती आधी थोडी रागावली पण मग म्हणाली कर तुला जे करायचं आहे ते मग जी वर लात बसली की रडत येऊ नकोस. आई पण तिचाच सूर धरून बोलायला लागली.
"एकदा फटके बसून सुधारणा नाही झाली का तुझ्यात..? दरवेळी एवढा उत्साह कुठून आणतोस रे बाबा..? कठीण आहे तुझं सुधारणं.."
"काही नाही काकी...! खाऊ देत लाथा मग येईल आपोआप अक्कल." इति रेषा उवाच. दोघींनी नाट लावली मग जुळेलच कसं कुणाचं सूत माझ्याशी..?
सिद्धी तशी खूप चांगली मुलगी होती. तिच्यासोबत वेळ कसा जायचा ते कळतच नव्हतं कधीकधी. शिवाय माझ्या नि तिच्या आवडी निवडी सारख्याच तिला देखील म्युझिकमध्ये इंटरेस्ट होता. मी बनवलेल्या ट्युन्स तिला जाम आवडायच्या. आमच्या मग तासंतास त्याच्यावर गप्पा चालायच्या. मुव्हीज बघायला तिलाही आवडायचं. त्यामुळे मामी फिल्म फेस्टिव्हलला सिद्धी देखील माझ्यासोबत यायची. तिने स्वतःबद्दल माझ्यापासून कधीच काही लपवून ठेवलं नव्हतं. होता ना तिचाही बॉय फ्रेंड होता. पण ती कधी स्वतःचे प्रोब्लेम्स डिस्कस करत नव्हती. इन्फॅक्ट..! ती लवकरच त्याच्याशी ब्रेकअप पण करणार होती कारण तो खूपच पझेसिव्ह होता तिच्या बाबतीत. कसलंच फ्रीडम नव्हतं तिला. कपडे पण त्याच्या आवडीचे तो सांगेल ते घालायचे अगदी आतले सुद्धा..!!! कमाल आहे..? पण ती कधी त्याचं फारसं ऐकत नसल्याने सतत भांडणं व्हायची त्यांच्यात. त्यामुळे होप्स होते मला. गर्ल फ्रेंड लेके घूमेगा, अपना टाईम आयेगा..!!!
त्यादिवशी रविवार असल्याने आरामात उठलो. उठल्यावर सवयीप्रमाणे सिद्दीला गुड मॉर्निंग मॅसेज पोस्ट केला. रिप्लाय मध्ये आलं की, "अंगद..! प्लिज आज मला डिस्टर्ब करू नकोस. माझा मूड ठीक नाहीय."
काय झालं असेल अचानक असं..? मला रहावत नव्हतं म्हणून मी चॅट पुढे नेलं.
"सिद्धी आर यु ओके..? काय झालंय काही सांगशील का..?"
"नो, पर्सनल इश्यू आहे. मी कारेन नंतर कॉन्टॅक्ट तुला."
असा काय पर्सनल इश्यू आहे की, हिला मला सांगायचा नाही...? मी काही परका नाही ना..! काय झालं असेल..? मी दिवसभर तिच्याच विचारांत गढून गेलो. मला आत्ताच्या आत्ता तिला भेटायचं होतं. मी आईला म्हटलं,
"आई मी मालाड ला जाऊन येतो."
"मालाड..? तेही एवढ्या उन्हाचं..? का रे..?"
"सिद्दीला भेटून येतो."
आईला तशी सकाळपासून कुणकुण लागली होतीच की कुछ तो गडबड है...सारखी विचारत होती,
"अंगद..! काय झालंय..? काही सांगशील का..?"
पण मीच तिला टाळत होतो. आणि आता नाही रहावलं म्हणून मग मी म्हटलं भेतूनच येतो ना सिद्दीला.
"अंग्या..! तिने बोलावलंय का तुला..?"
"नाही गं.." मी आईला व्हाट्सअॅप वरचे आमचे चॅट दाखवले.
"असेल तिचा काही प्रॉब्लेम. तुला सॉल्व्ह करायला नाही ना सांगत आहे ती मग कशाला काळजी करतोयस..?"
"पण आई काय झालं असेल..?"
"तू ना आता मूर्खासारखा वागतो आहेस हां. गुपचूप घरात बस कुठे जायचं नाही. आणि तिचे प्रॉब्लेम्स तिला सोडवू देत. बघ..! बाबा घरात आहे उगाच तमाशा नको."
तो दिवस मी अक्षरशः झोपून काढला. कशात मनच लागत नव्हतं. मी न रहाऊन संध्याकाळी तिला मॅसेज टाकला.
"काशी आहेस..?"
"एम ओके नाऊ..!"
"झाला का इश्यु सॉल्व्ह..? आता नाही ना टेन्शन कसलं."
"अरे..! टेन्शन को मार गोली."
"ओह... दॅट्स लाईक माय सिद्धी..!" मला बरं वाटलं.
"ओ.. हॅलो..! आय एम नॉट युअर सिद्धी आय एम निशांतस् सिद्धी...ओके..?"
"व्हॉट..?"
"निशांत घरी आला होता. त्याने प्रॉपर लग्नासाठी बोलणी केली. अँड यु नो व्हॉट..? पप्पांनी होकार दिला."
"काय..?" माझी पायाखालची जमीन सरकली.
"तुला पण झटका लागला ना ? माझं कॉलेज झालं की लग्न करू. निशांत तर आधीच चांगल्या पोस्टवर आहे. सेटल आहे."
"ओह..! ओके..! काँग्रॅट्स..!" माझ्याकडे शब्दच नव्हते पुढे काही बोलायला. मी बाल्कनीत मावळता सूर्य बघत राहिलो. एवढ्यात आई आली कॉफ़ी घेऊन.
"हम्म..! हे घे. बरं वाटेल तुला. सिद्धीचा रिप्लाय ?" मी मोबाईलच तिच्या हातात ठेवला. तिने चॅटस् वाचले आणि मोठा उसासा टाकत मोबाईल बंद केला.
"अंगद..! मुलींकडे बघण्याचा ना मुळात तुझा दृष्टिकोन चुकीचा आहे. कोणतीही मुलगी फ्रँकली बोलते आपल्याशी म्हणजे प्रत्येकवेळी तिला आपल्यात इंटरेस्ट असेलच असं नसतं रे... तू जसा मित्रांच्या बाबतीत वागतोस तसाच या मैत्रिणींच्या बाबतीत राहिलास तर तुला ही असली फालतू टेंशन येणारच नाहीत."
"पण आई ती मैत्रिणीसारखी नव्हती वागत. तिला हवं नको ते सारं मी घेऊन द्यायचो. आणि शॉपिंग नंतर ती किस पण करायची. मग ते सगळं काय होतं."
"अरे..! बावळटा सारखं तू तिच्यात गुंतत चाललायस हे तिलाही कळत होतं पण मग थोडा फायदा तुझ्याकडून करून घेतला तर कुठे बिघडतंय अशाही विचार करणाऱ्या मुली असतात. तुझं कसं असतं बघावं तेव्हा आम्ही 'ऑलवेज अव्हेलेबल'. वेळीच नाही म्हणायला शिकला असतास तर ही वेळ आलीच नसती. काही सेल्फ रिस्पेक्ट म्हणून आहे की नाही..? आणि काय रे गर्ल फ्रेंड हवीच हे खूळ तुला कुठून लागलं ? सिंगल असण्याचे फायदे विचार तुझ्या मित्रांना म्हणजे कळेल तुला. बॉय फ्रेंड असताना जी मुलगी तुझ्याशी अशी वागते तिने बॉय फ्रेंड सोडला जरी तरी ती तुझ्याशी लॉयल राहील याची काय गॅरेंटी..?"
"पण आई ती बोलली होती की निशांतशी तिचं पटत नाही आणि आता तरीही....?"
"हे बघ..! फिझिकली जवळ आले की सोडणं कठीण असतं. तसं काहीसं झालंही असेल पण तू एक लक्षात ठेव थोडा आपल्या अॅटिट्युडमध्ये रहायला शिक आता. मुलीच नव्हे तर मित्रांचा कॉल आला तरी लगेच रिकामटेकडा असल्यासारखा ते बोलतील तसं अव्हेलेबल व्हायचं नाही. तेही आपला वेळ अभ्यास सारं सांभाळून मजा करतात. तुलाच बुद्धी नसल्यासारखं तू वागतोस. आता तरी शिक यातून काही.."
एवढ्यात मोबाईल थरथरला. रेषु चा कॉल. आई आणि मी एकमेकांकडे पहात राहिलो. कॉल पूर्ण झाला. पुन्हा वाजला.
"अरे..! कॉल का नाही रिसिव्ह करत रेषुचा आहे." आई आत जाता जाता बोलली.
"मी आता बिझी आहे. नॉट अव्हेलेबल.." मी फारच अॅटिट्युडमध्ये बोललो. आई तर सॉलिड हसत आत निघून गेली. पाच सहा कॉल नंतर रेषा चा मॅसेज आला.
"दात आलेत का तुला. कॉल का नाही घेत..?"
"मी बिझी आहे."
"येऊ का तिकडे..? बघते किती बिझी आहेस ते.."
"अग खरंच बिझी आहे."
"चल दार उघड नालायका..! मी लिफ्टमध्ये आहे. येतेय तिकडे."
"व्हॉट..?"
"एवढा शॉक लागायला काय झालं..? दार उघड जाड्या.."
रेषा आली तीच माझ्यावर खवळली. गेला आठवडाभर तिच्याशी बोललोच नव्हतो. व्हाट्सअॅपवर तिच्या मॅसेजेसना सुध्दा रिप्लाय दिला नव्हता. बाबाला समोर बघून अगदी संस्कारी मुली प्रमाणे पाया वगैरे पडली. आईशी तिचं जुळायचं दोघी मैत्रिणीसारख्याच वागायच्या. कधी कधी वाटायचं ही माझ्यासाठी ईथे येते की आई साठी..? पण रेषु आल्याने सकाळपासूनचं सगळं टेन्शन एका फटक्यात गायब झालं. खूप गप्पा आणि मस्ती झाली. मग मी तिला सोडायला स्टेशनवर गेलो.
"अंग्या..! जाड्या..! परत माझ्या मॅसेज ला रिप्लाय नाही दिलास ना तर याद राख.."
"काय करशील..?"
"आज खाल्लास तेवढा मार पुरे नाही का झाला तुला." म्हणत तिने पाठीत एक गुद्दा हाणला.
"आई गं..! होय गं माझे बाई..देईन रिप्लाय."
"आणि माझ्यासाठी तू ऑलवेज अव्हेलेबल असशील प्रॉमिस कर."
"का..? तू काय माझी जीएफ आहेस..?"
"काय माहिती..?" ती हसत हसत बोलली आणि ट्रेन आली म्हणून पळून गेली. डोळा मारत मला बाय करत निघून गेली. अशी मैत्रीण सर्वांना लाभो. आठवडाभर रिप्लाय दिला नाही म्हणून तेवढ्यासाठी मला भेटायला घरी आली. हक्काने आपले हट्ट पुरे करून घेत असते. या मैत्रीत मिलावट नाही हे मात्र नक्की. काय गरज आहे गर्ल फ्रेंड ची..? माझ्या सगळ्या फ्रेंड्स च्या गर्लफ्रेंडस् आहेत म्हणून माझीही असावी हा अट्टाहास का माझा..? हे मला आधी का कळलं नाही..? उलट सिंगल राहण्यात किती मजा असते..? आपण आपल्या मर्जीचे मालक. आता फुल फोकस करिअरवर. पण ही रेषु जाता जाता असं का म्हणाली, म्हणजे ही माझी जीएफ आहे की नाही..? या पोरीचं काही कळत नाही यार..! सगळाच लोचा. कसं समजायचं यांच्या मनात काय चाललंय ते..? पण काही झालं तरी आता पट्कन कुणाहीसाठी अव्हेलेबल नाही व्हायचं. मग तो मित्र असो वा मैत्रीण. पण रेषुचं काय..? बदडून काढेल मला रिप्लाय नाही दिला तर. एनीवे ती एक्सेप्शनल केस आहे माझ्यासाठी.

 ***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Verified icon

From Turkey 5 महिना पूर्वी

Verified icon

Akash Bhalekar 8 महिना पूर्वी

Verified icon

Surekha 8 महिना पूर्वी

Verified icon

Vedant Vedpathak 8 महिना पूर्वी