हृदयाची हाक तू

छत्री असून देखील पावसाने चिंब भिजलेली ती घाईघाईने आत येऊन त्याच्या शेजारी बाकड्यावर बसली. तो आपल्याच विचारांत गढून गेला होता. थोडासा गंभीर. तिने रिक्वेस्ट केली म्हणून ए.सी. कमी करण्यात आला. हळूहळू माथ्यावर घामाचे थेंब गर्दी करू लागले तसे त्याच्या लक्षात आले की, ए.सी चे कुलिंग कमी झालेय, तो वैतागला. तसे रिसेप्शनिस्ट ने तिच्याकडे बोट दाखवले. ती थंडीने थरथरत होती. त्याला हलकेच सॉरी म्हणत तिने दिलगिरी व्यक्त केली. तिच्याकडे पाहून आता मात्र त्याला अपराध्यासारखं वाटू लागलं. त्याने पलीकडच्या मशीनमधून चहा आणला. तिने देखील हसत पट्कन तो घेतला कारण त्याची तिला फार गरज होती. एक घोट आत जाताच तिला ऊब जाणवली. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता. पॅथॉलॉजी सेंटर मध्ये गर्दी वाढत होती त्यात भर म्हणजे लाईट्स गेले. आता रिपोर्ट्स वेळेत मिळणार नाहीत. मग काय..! वेळ घालवण्यासाठी तिनेच बोलायला सुरुवात केली. तिचे नाव केतकी होते आणि त्याचे निखिल. तिने डोक्यावरचा दुपट्टा काढला आणि काय बोलावं तेच निखिलला सुचेना. संपुर्ण टक्कल पडलेली केतकी सारखी बोलकी मुलगी कॅन्सरने ग्रस्त होती. केतकीच्या चेहऱ्यावर लोभस स्मित पाहून निखिलच्या हृदयात गलबलून आले. ती तिच्या रुटीन टेस्टसाठी तिथे आली होती पण निखिल तिथे कशासाठी आला होता..? केतकीच्या प्रश्नाने तो थोडा चपापला. गेल्या तीन चार महिन्यांपासून थकवा जाणवत होता त्याला अधूनमधून येणारा ताप अस्वस्थ करून जात होता. आय.टी. इंजिनिअर, भक्कम पगार आणि मिळालेले प्रमोशन यशाच्या धुंदीत निखिल हुरळून गेला होता. मित्रांसोबत सहज मजा म्हणून घालवलेली त्या बाजारू बाई सोबतची ती रात्र आज त्याला स्वस्थ झोपू देत नव्हती. केतकी पासून काही लपवण्यासारखे असे त्यांचे कोणतेही नाते नव्हते किंवा मैत्रीही नव्हती. उलट तिच्याशी मोकळेपणाने बोलल्याने निखिलला देखिल थोडे हलके वाटले. आता परिणामांची वाट पहात तो तिथे थांबला होता. केतकीचे ब्लड रिपोर्ट्स हाती आले. ती कॅन्सरच्या थर्ड स्टेजला होती. ल्युकेमिया. पावसाने अंधारून आले होते. ती जायला निघाली पण का कुणास ठाऊक आपल्याला सोडून तिने जाऊ नये अशी काहीशी फिलिंग निखिलच्या मनात येऊन गेली. एवढ्यात त्याचे नाव पुकारले गेले. ती थांबली. निखिलला पाहताच तिच्या डोळ्यांत प्रश्नांनी गर्दी केली. एका परक्या, काही तासांपूर्वी भेटलेल्या माणसाबद्दल आपल्याला एवढी आपुलकी का वाटावी असे एकवार तिलाही वाटून गेले. निखिलने हताशपणे रिपोर्ट तिच्या हाती दिला. एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह. त्यादिवशी मृत्यूचे मृत्यूशी अशा रीतीने मैत्रीचे धागे जुळले. दोघांकडे मर्यादित आयुष्य उरले होते आणि ईच्छा-आकांक्षा मात्र दाटून येत होत्या.
दिवसेंदिवस ही मैत्री द्विगुणित होत गेली. गप्पा, भेटीगाठी, आणि बकेट लिस्ट पूर्ण करण्याची धडपड. या साऱ्यात दोघे एकमेकांना साथ देत होते. केतकीला असे आनंदी पाहून तिच्या घरातले खुश होते तर निखिलच्या घरी मुंबईला त्याच्या आजारपणाची बातमी जाताच घरातल्यांनी जवळपास संबंधच तोडले. मित्रपरिवार साऱ्यांपासून तुटलेला निखिल एकटा पडून खचून गेला असता जर केतकीने त्याला वेळीच सावरले नसते.
दोघे ईतके आनंदी राहू लागले की, मरण केव्हाही आपल्या दारी येईल हे ते विसरून गेले. वर्षं होत आले दोघांच्या ओळखीला निखिल अगदी निरोगी, सुदृढ वाटू लागला. त्याच्या डॉक्टरांच्या मनात शंका येऊ लागली म्हणून पुन्हा एकदा त्याचे रक्त तपासले गेले. रिपोर्ट्स पाहून सारेच चकित झाले कारण ते निगेटिव्ह होते. कसे शक्य आहे..? डॉक्टरांची शंका अखेर खरी ठरली बहुतेक आधीचा रिपोर्ट चुकीचा असावा. निखिल मुळात कधी एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह नव्हताच. आनंदाने तो जणू बेभान झाला. वर्षभर मरणाच्या भीतीने जो मानसिक ताण सहन करावा लागला त्यातून अखेर सुटका झाली खरी पण ज्या मृत्यूने त्याला केतकीशी भेट घडवून दिली ती भावना मात्र एकाएकी लोप पावताना केतकीला जाणवली. आपण आपल्या स्वार्थासाठी निखिलला अडकवून ठेवणे चुकीचे आहे. तिने जाणीवपूर्वक त्याला टाळायचे ठरवले. त्याला भेटणे, त्याचे कॉल्स घेणे बंद केले. निखिलने देखिल तिला भेटण्याचा काही फारसा आग्रह धरला नाही.
थोड्याच दिवसांत निखिलला चांगली नोकरी लागली. जीवनाची गाडी पुन्हा रूळावर धावू लागली. गेल्या वर्षभरात मात्र त्याला माणसांचे खरे चेहरे दिसले. सारी सुखे पुन्हा पायाशी रुंजी घालू लागली पण केतकीची कमतरता, तिचा सहवास, तिच्या आठवणींनी लवकरच त्याला तिची उणीव भासू लागली कारण ते केवळ आकर्षण नव्हतंच कधी. ते प्रेम होतं ज्याच्या जाणीवेने त्याचे पाय नकळत तिच्या घराच्या दिशेने वळले. त्याच्या हृदयाने अखेर तिला हाक दिली.
मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये जेंव्हा हे जोडपे भेटले तेंव्हा त्यांच्या लग्नाला दहा वर्ष होत आली होती. त्यांना चार वर्षांचा गोंडस मुलगा देखील होता. एव्हाना केतकीची बकेट लिस्ट पूर्ण झाली होती. केवळ दोन ते तीन वर्षं केतकी जगेल असे म्हणणारे डॉक्टर्स आज आश्चर्यचकीत झाले आहेत. खरंच प्रेमात केवढे सामर्थ्य असते...नाही का..??

दीप्ती मेथे

***

रेट करा आणि तुमची मतं मांडा.

Archana 3 महिना पूर्वी

Savita Desai 3 महिना पूर्वी

Surekha 3 महिना पूर्वी

Nandkishor Karlekar 3 महिना पूर्वी

Aruna Yemde 3 महिना पूर्वी

शेअर करा