Shouryamaan - The Superhero books and stories free download online pdf in Marathi

शौर्यमान - 1





शिवरुद्रा : शौर्यमान



त्रिकालगडाच्या गुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं. एका विशिष्ट अशा मूल्यवान आणि मजबूत धातू पासून बनवलेल्या पाच तलवारी त्रिकाल गडाच्या गुहेत लपवून ठेवल्या होत्या, जेणेकरून त्या शत्रूच्या हाती पडू नयेत. पण गेल्या महिन्याभरात त्यातील तीन तलवारी चोरीला गेल्या. एवढा मोठा सशस्त्र पहारा असूनही तलवारीची चोरी होईलच कशी ? या चिंतेने आचार्य मेंत्तानंद स्वामी चिंतित झाले होते. गुहेत आता फक्त शेवटच्या दोनच तलवारी शिल्लक राहिल्या होत्या. त्या दोन तलवारी सुरक्षित राहाव्यात म्हणून आचार्य मेंत्तानंद स्वतः सैनिकांसोबत रात्रभर जागे होते.
त्रिकाल गड हा जयवंतपुरच्या जंगलात स्थित असलेला एक गिरिदुर्ग किल्ला. तो इतका भव्य आणि दिव्य होता की त्याला बघताक्षणी कोणीही त्याच्या भव्यतेच्या प्रेमात पडत असे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीवर कोणाची हैवाणी नजर पडली हे समजेना. त्रिकाल गडाभोवती असलेल्या घनदाट जंगलामुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नसे. जर कोणी या गडावर आलेच तर ते दिवस असेपर्यंतच गडावर फिरत, संध्याकाळ होताच कोणाचीही हिंमत होत नव्हती त्या जंगलात फिरण्याची. त्रिकाल गडाच्या पायथ्याला शिवकालीन पाच मोठ्या गुहा होत्या. सामान्य माणसांना त्या दिसू नयेत अशी त्यांची रचना केली होती. बाहेरुन जरी या गुहा दिसत नव्हत्या तरी पण आतून त्या खूप मोठ्या होत्या. जयवंतपुरच्या नागरिकांना सुद्धा माहिती नव्हते की त्रिकाल गडाच्या मागील बाजूस गुप्त अशा रहस्यमयी गुहा आहेत.
मध्यरात्रीची वेळ होती. गुहेत मुख्य द्वारापासून ते सिंहासना पर्यंत प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देत उभा होता. आचार्य मेंत्तानंद स्वामी सिंहासनावर गंभीर मुद्रा करून बसले . स्वामींनी सैनिकांना मोठ्या अशा तिजोरी सारख्या दिसणाऱ्या एका कपाटातून शिल्लक राहिलेल्या दोन्ही तलवारी काढायला सांगितल्या. सैनिकांनी तिजोरीतून एक लांबलचक पेटी काढली. लांबलचक अशा छोट्या पेटीमध्ये दोन्ही तलवारी बंदिस्त होत्या. कोणत्याही व्यक्तीला ती पेटी उघडणे सहजासहजी शक्य नव्हते. आचार्य ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करु लागले, त्यांनी आपल्या कानातील कुंडल्यांमध्ये असलेला एक चौकोनी मणी काढला. तो मणी त्यांनी करंगळीचा नखांमध्ये धरला. पेटीवर चावी लावण्याच्या ठिकाणी त्यांनी करंगळी लावून तो मणी आत ढकलला. पेटीच्या चारही बाजूला असलेले कुलपाचे भाग मोकळे झाले. आचार्यांनी पेटीचे झाकण उघडताच एक तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरला. ती तलवार इतकी चमकत होती की पूर्ण गुहा प्रकाशमय झाली .

आचार्य मेत्तानंद स्वामींनी ती तलवार आपल्या
मस्तकाला लावली. तलवार अनंतेश्वरी देवीच्या पायाशी
ठेवत आचार्यांनी एका जळजळीत नजरेने आपल्या सैनिकांकडे पाहिले. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. ते आपल्या सैनिकांना उद्देशून बोलू लागले. त्यांच्या आवाजात गंभीरता आणि कर्कश पणा होता.
" माझ्या शुर सैनिकांनो, आपण शूर वीरांचे वंशज आहोत. आपल्या पूर्वजांची ही विरासत सुरक्षित रहावी म्हणून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी गुरुवर्य विश्वजीत स्वामींनी आपल्यावर सोपवली आहे. पण शत्रूच्या चतुराई मुळे किंवा आपल्या हलगर्जीपणामुळे त्यातील तीन तलवारी आपण गमावून बसलो आहोत. जर आपल्याला त्या तीनही तलवारी पुन्हा मिळवायचे असतील तर राहिलेल्या दोन्ही तलवारी सुरक्षित ठेवावे लागतील. जय अनंतेश्वरी...!"
सैनिकांनी मागून घोषणा दिल्या
""जय अनंतेश्वरी..,जय अनंतेश्वरी..!""
आचार्य मेत्तानंद देवीच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसले. आचार्यांना ध्यानस्थ बसलेले पाहून त्यांच्या शिष्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. ते पाचही शिष्य एकमेकांमध्ये चर्चा करू लागले.
एक शिष्य आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला,
" मला वाटतं ही तीच वेळ आहे, गुरुवर्य विश्वजीत यांनी केलेले भाकीत खरे ठरण्याची. आपण याआधी कधीही मेत्तानंद स्वामींना एवढं क्रोधित होऊन देवीची उपासना करताना पाहिलेले नाही."
"पण गुरुवर्य विश्वजीतांनी कोणतं भाकित केलं होतं?" दुसरा शिष्य त्याला विचारू लागला.
'काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,'' तो शिष्य खूप गंभीर होऊन आपल्या सहकाऱ्यांना सांगू लागला.
" गुरुवर्य विश्वजीत हे खूप वृद्ध झाल्यामुळे त्यांनी त्रिकाल गडाच्या सुरक्षेची जबाबदारी आचार्य मेत्तानंद स्वामींना देण्याचे ठरवले. त्यावेळेस त्यांनी मेत्तानंद स्वामींना उपदेश केला की,
' प्रिय मेत्तानंद, मी तुला या किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी देत आहे. मला खात्री आहे तू तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या किल्ल्याचं आणि त्या तलवारींचे रक्षण करशील. पण नियतीच्या निर्णया पुढे कोणाचेही चालत नाही. तुला सांगण्यास मला अत्यंत वाईट वाटत आहे की काही दिवसानंतर आपल्या या पवित्र विरासतीवर एक मोठे संकट येणार आहे. पण नियती आपल्या पुढे जसे संकट निर्माण करते तसेच त्या संकटातून वाचण्याचा मार्गही निर्माण करते. जेव्हा या गुहेतील कंथक धातूच्या तलवारी शत्रूच्या हाती पडतील, तेव्हा नियती स्वतः एक योद्धा आपल्या रक्षणासाठी तुझ्यासमोर उभा करेल. फक्त तुला त्या योद्ध्याला तुझ्या दूरदृष्टीने आणि विवेकबुद्धीने ओळखायचा आहे. तू जेव्हा त्या योद्ध्याला ओळखशील तेव्हा तुला माहीतच आहे तुला काय करायचं आहे ते."
" पण तो योद्धा कोण आहे? " एकाने त्या शिष्याला विचारले.
" तो कोणीही असू शकतो तो योद्धा आपल्यातील एक जण असेल किंवा बाहेरील सुद्धा असू शकतो शेवटी आचार्य मेत्तानंदच त्या योद्ध्याला ओळखू शकतील."

इतक्यात गुहेच्या तोंडावर मोठा स्फोट झाला. "बूम¿¿"
सर्व सैनिक आवाजाच्या दिशेने पळू लागले. त्यांना एक मोठी सावली गुहेत येत असल्याचे दिसले. ती सावली एखाद्या राक्षसा सारखी दिसत होती. त्याचे अंग वेडेवाकडे दिसत होते. त्याचे पाय भक्कम आणि जाड होते. डोक्यावर दोन शिंगे असलेला मुकुट होता. त्याचे दोन्ही दंड एखाद्या बाहुबली सारखे फुगीर होते. त्याच्या चेहर्‍यावर एक राक्षसाचा मुखवटा होता. तो मुखवटा त्याच्या चेहऱ्याला एवढा चिकटून बसला होता की तो त्याचा खरा चेहरा असल्याचा भास होत होता. जो कोणी त्याला बघेल तो भीतीने थरथर कापेल अशीच त्यांची देहयष्टी होती.
तो दैत्याकार जसाजसा पुढे येऊ लागला तसे गुहेतील सैनिक घाबरू लागले. त्यांनी घाबरत घाबरत या राक्षसावर हल्ला चढवला. चार पाच सैनिक त्या राक्षसाच्या अंगावर धावून आले, पण त्या राक्षसाने एका फटक्यात त्या सैनिकांना जमीनदोस्त केले. बाकीच्या सैनिकांनी त्याच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या पण त्याचा काहीच परिणाम त्या राक्षसावर झाला नाही. त्याच्या रस्त्यात जो कोणी येईल त्याला तो मारू लागला. हे पाहून गुहेतील शिष्य घाबरून दुसऱ्या गुहेत पळून जाऊ लागले. तो राक्षस गुहेतील तिजोरीकडे जाऊ लागला.मेत्तानंद स्वामींनी त्याच्यावर मंत्रशक्ती चा प्रयोग केला. तो राक्षस जागेवरून उडून खूप वेगाने गुहेच्या भिंतीवर जाऊन आदळला. त्या राक्षसाला राग आला, संतापलेल्या अवस्थेत तो अजूनच भयानक होऊ लागला. त्याने आपली सर्व शक्ती एकवटून मेत्तानंद स्वामींवर जोराचा प्रहार केला.मेत्तानंद स्वामी अंनंतेश्वरी देवीच्या मूर्ती पाशी जाऊन बेशुद्ध पडले. त्या राक्षसाने मूर्ती जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला शक्य झाले नाही. तो पुन्हा तिजोरीकडे वळला. तिजोरी खोलून त्याने त्यातील पेटी बाहेर काढली. पेटी उघडीच होती. पेटीत फक्त एकच तलवार असल्याने तो आश्चर्यचकित झाला. त्याने आपल्या मनगटावरील घड्याळा सारख्या असलेल्या एका गॅझेट वरून बोट फिरवून कोणालातरी संपर्क केला.
तो मनगट तोंडापुढे घेऊन बोलू लागला.
" मालिक, इथे फक्त एकच तलवार आहे. दुसरी तलवार कोणीतरी आधीच चोरी केली असं वाटतंय."
' हे काय बोलतोयस तू?' त्या गॅझेट मधून समोरची व्यक्ती बोलू लागली.
" अरे मुर्खा नीट शोध तिथेच असेल. आपल्या शिवाय कोणीही ती तलवार चोरी करू शकत नाही. नीट बघ त्या स्वामीकडे असेल."
" मालिक, मी त्या स्वामी कडे जाण्याचा प्रयत्न केला, पण तो देवीच्या मूर्ती जवळ पडलेला आहे आणि तिथे मला जाता येत नाही."
" ठीक आहे ती तलवार घेऊन लगेच माझ्याकडे ये"
असं म्हणत या व्यक्तीने संपर्क तोडला.
तो राक्षस तलवार घेऊन गुहेतून निघून गेला.
थोड्या वेळानंतर आचार्य मेत्तानंद शुद्धीवर आले. त्यांनी देवीच्या पायाशी ठेवलेली तलवार उचलली व ते थेट गडाच्या माथ्यावर गेले. तलवार गुहेत ठेवणं आता खूप धोकादायक बनलं होतं त्यामुळे त्यांनी ती तलवार गडावरच असणार्या एका इमारतीच्या तळघरात ठेवण्याचे ठरवले.
त्या भयावह संकटाची रात्र सरून हळूहळू पहाट होऊ लागली. आचार्य धापा टाकत त्रिकाल गडावर पोहचले. त्रिकाल गडावरील मोठ्या इमारतीवर उभे राहून त्यांनी सुर्याची कोवळी किरणे आपल्या शरीरावर झेलली. आचार्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि नागांतक राजाला हाका मारू लागले. त्यांचा कर्कश आवाज दऱ्याखोऱ्यात घुमू लागला. जंगलाच्या कोणत्यातरी भागातून नागांतक आपले मोठे पंख वाऱ्यावर पसरवित त्रिकाल गडाकडे येऊ लागला.
नागांतक हा जयवंतपूरच्या जंगलातील एक राज गरुड. तो जंगलातील पक्षांचा राजा होता. जंगलावर किंवा त्रिकाल गडावर येणाऱ्या संकटात नेहमीच नागांतकने आचार्य मेत्तानंद यांना मदत केली होती. आचार्य यांचाही त्याच्यावर पुर्ण विश्वास होता. नागांतक आचार्यांच्या समोर येऊन उभा राहिला. आपले पंख फडफडवत व मान झटकत नागांतक ने आचार्यांना आदेश करण्याचा इशारा दिला. आचार्य त्याला म्हणाले,
" हे नागांतका , तू नेहमीच आमच्या विरासतीवर येणाऱ्या संकटसमयी धावून आला आहेस . आताही मी तुला यासाठीच बोलावलं आहे. आपल्या या सुंदर अशा पवित्र वीरा सती वर एका दुष्ट हैवानाची नजर पडली आहे . आणि तो त्याचा क्रूरपणा सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकतो. त्या राक्षसाशी आपल्याला दोन हात करणे शक्य नाही. त्यासाठी अशा एका योद्ध्यची गरज आहे जो या कंथक धातूची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सामावून घेऊ शकेल. ज्याचे ह्रदय एखाद्या लहान बाळासारखे निरागस असेल. ज्याच्या मनात कोणाविषयी तिरस्कार नसेल किंवा स्वार्थ नसेल. हे नागांतका मला खात्री आहे तुझ्या तीक्ष्ण नजरेने तू त्या योद्ध्याला शोधून काढशील. तुझ्या कार्यात तू यशस्वी होवो..."
नागांतक ने आपली डौलदार मान हलवली आणि आचार्य मेत्तानंद स्वामींचा निरोप घेत त्याने उंच आकाशात झेप घेतली. तो आता अशा योद्ध्याच्या शोधात होता जो सिंहासारखा शूर, सूर्यप्रकाशा सारखा तेजस्वि, चंडोल पक्षासारखा उत्साही, विजेसारखा चपळ, बाणासारखा वेगवान, हवे सारखा निरंकुश आणि सोन्यासारखा अस्सल मनाचा असेल.
◆◆◆
क्रमशः

© संदीप विजया काकडे


इतर रसदार पर्याय