दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 10 Pranali Salunke द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 10


घरी आल्यावर साधिका आधी फ्रेश होते आणि ध्यानाला बसते. तिने सकाळपासून काहीच न खाल्ल्याने उल्का तिला बोलवायला तिच्या खोलीत येते आणि साधीकाच्या भोवताली डोळे दिपवणारा प्रकाश पाहून ती स्तब्ध होते. तिचे डोळे भरून येतात. आजी आणि आई सतत ताईची काळजी का करायच्या हे तिला आता उमगले होते. ताईजवळ काही तरी खास आहे हे तिला सतत जाणवत होतं आणि त्याविषयी ती नेहमी आजीला विचारायची सुद्धा पण अपेक्षित असं उत्तर तिला मिळालंच नाही. ती तशीच किती तरी वेळ उभी होती. तेवढ्यात साधिकाला तिच्या आसपास कुणाच्या तरी असण्याची चाहूल लागताच ती ध्यानातून बाहेर येते. 


साधिका : काय ग उल्के काय झालं? 


उल्का : काही नाही ताई…तुझी ऊर्जा पाहून थक्क झाले… 


साधिका : काहीही, तू कशी काय आलीस इथे? 


उल्का : अग तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस…म्हणून तुला बोलवायला आले…


साधिका : हो ग…तू आता बोललीस तेव्हा मला जाणवलं की मला भूक लागली आहे…


उल्का : चल, आधी खाली…तुला जेवायलाच वाढते..


साधिका : ऐक ना… आज शिरा बनवशिल का? 


उल्का : हो…बनवते…


त्या एकमेकींशी बोलत स्वयंपाकघरात येतात. उल्का जेवण गरम करून साधिकाला जेवायला वाढते आणि तिच्यासोबत बोलत बसते. 


उल्का : ताई, रात्री मी येऊ का सोबत तुझ्या? 


साधिका : कुठे ? 


उल्का : जिथे तू जाणार आहेस तिथे… 


साधिका : मी कुठे जाणार आहे…मी तर घरीच राहणार आहे आज….काही कोडी सोडवायची आहेत मला…


उल्का : म्हणजे ? 


साधिका : एक काम कर…रात्री सगळं आवरून तू खोलीत जाशील ना तेव्हा मी दिलेला एक रुद्राक्ष गळयात घाल म्हणजे तू माझ्यासोबत आहेस असा अनुभव येईल…


उल्का : कुठे जाणार आहेस ते तरी सांग…का एवढी उत्सुकता लावून ठेवली आहेस? 


साधिका : पण तुला कसं समजलं की मी रात्री बाहेर जाणार आहे… 


उल्का : तू इथे आलीस की रात्रीची गुरूंकडेच जातेस…मग पहाटे किंवा मध्यरात्री घरी येतेस… आणि आज जरा जास्तच अस्वस्थ वाटते आहेस…


साधिका : हो आहे खरी…कारण काही लोकांच्या हव्यासामुळे सामान्य लोकांचे नुकसान होत आहे…


उल्का : ताई काय झालंय सांगशील… 


साधिका : सांगणार नाही तर रात्री दाखवते…तोवर धीर धर… आणि मी डायरेक्ट पहाटे येणार आहे…बाबांना सांग तस…माझी तर हल्ली त्यांच्याशी भेट होतच नाहीयेय…


उल्का : हो…बाबांना कळतंय की तू सध्या तुझ्या कामगिरीत व्यस्त आहेस ते… 


साधिका : बर, मी तयारी करायला घेते…तू शिरा बनव आणि तो डब्यात भरून ठेव…


उल्का : हो…


खोलीत आल्यावर साधिका तयारी करायला घेते. कारंडे तिला फोन करणार याची तिला पूर्ण खात्री होती. ती तयार होऊन तिच्याजवळील लाकडी पेटीत असलेल्या रुद्राक्षांपैकी एक रुद्राक्ष ती काढते व हातात धरून एक मंत्र म्हणते. नंतर त्याला लाल फडक्यात गुंडाळून ठेवते. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज येतो. तो पाहून ती गालातल्या गालात हसते. लागलीच बॅग कमरेला अडकवून ती खोलीच्या बाहेर येते. 


साधिका : उल्के, आवरलं का तुझं…. 


उल्का : हा घे डबा… 


साधिका : हे घे…साधारण अर्ध्या तासाने हे हातात धर आणि डोळे बंद कर…तू बोलशील तेही मला ऐकू येईल… 


उल्का : तू सावध रहा…


साधिका : हो… 


घरातून निघाल्यावर साधिका तोंडाला स्कार्फ बांधते आणि बुलेटने वाऱ्याच्या वेगात कारंडेच्या घराजवळ पोहोचते. घराची टेहळणी करताना कारंडेच्या घरावर कोणीतरी पाळत ठेवून असल्याचे तिच्या लक्षात येते. सगळीकडे नजर फिरवताना तिच्या लक्षात येतं की कारंडेला इथे भेटणे धोक्याचे आहे. ती लागलीच त्याला एक पत्ता मेसेज करते आणि तिथे जायला निघते. 


—----------------------------------------------------


अभिमन्यू त्याचा मित्र, आशयसोबत शतपावली करायला येतो. त्याला अस्वस्थ पाहून आशय त्याला त्याविषयी विचारतो आणि अभिमन्यू त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो. 


आशय : बापरे, अभि तू त्या मुलीपासून लांब रहा हा…आणि त्या साधिकाकडूनच स्व रक्षणाचे धडे शिकून घे…


अभिमन्यू : अरे, ती काही मोकळी नाही आपल्यासारखी काही ना काही सुरूच असतं तिचं…


आशय : अरे पण तिला विचारून तर पहा… आधीच तू तुझे तर्क कशाला लावतो आहेस…


अभिमन्यू : हो विचारतो…श्रेयाची काळजी वाटते रे…काय झालं असेल तिच्यासोबत? फोन करतोय तर ती उचलत नाही… 


आशय : अभि मी तुला गेल्या वेळेसच बोललो होतो की तू तिच्या प्रेमात आहेस…पण तू ते मान्य करायला तयार नाहीस… 


अभिमन्यू : मी तुला गेल्यावेळी काय पण नेहमीच सांगतो की ती माझी फक्त विद्यार्थिनी आहे… हे नात पवित्र असतं…तू पुन्हा हा विषय काढू नकोस…


आशय : बर पण माझ्या बोलण्याचा विचार कर… 


ते दोघे बोलतचं असतात की अचानक त्यांच्यासमोर विनिता येते. तिला असं समोर आलेलं पाहून ते दोघेही घाबरतात.


अभिमन्यू : तू अशी कशी समोर आलीस…? 


विनिता : ते मी नंतर कधीतरी समजावून सांगेन सर तुम्हाला…पण तुम्ही फक्त माझा विचार करायचा नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील… समजलं…पुन्हा त्या श्रेयाचं नाव घेतलं ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा… 


अभिमन्यूला धमकावून ती गायब झाल्याने अभिमन्यू आणि आशय घाबरतात. 


आशय : अभि, तू आता वेळ घालवू नकोस…तू लगेच याविषयी साधिकाला कळव…


अभिमन्यू : हो…कळवतो… आशू मला वाटतं की विनिता माझ्यावर लक्ष ठेवून आहे… 


आशय : हो… चल आपण तुझ्या घरी जाऊ…मी काकूंना भेटायला येतो…


अभिमन्यू : हो चल…


—---------------------------------------------------


एका घरात साधिका कारंडेची वाट पाहते. अर्ध्या तासाने कारंडे त्या घरात पोहोचतो. त्या घरात आल्या आल्या कारंडेला एक वेगळीच अनुभती येते. 


साधिका : या कारंडे…हे पाणी घ्या आणि इथे बसा… माझ्याजवळ फार वेळ नाहीयेय… 


कारंडे : तू तारिणी आहेस का ? 


साधिका : मी कोण आहे यापेक्षा तुम्हाला मदत मिळणे गरजेचे आहे ना…


कारंडे : हो… 


साधिका : मग आपण फक्त तुमच्या अडचणींविषयी बोलू… 


कारंडे : पण तू तुझा चेहरा तर दाखव… असा कसा मी विश्वास ठेवू…


साधिका : हे बघा तुम्हाला मदत हवी आहे ना…मग त्याविषयी बोलू…माझ्याकडे जास्त वेळ नाहीयेय…


कारंडे : मदत तर हवीच आहे… पण विश्वास कसा ठेवू की तू साधक आहेस? 


साधिका : तो आता तुम्हाला ठेवावाच लागेल…


कारंडे : ठीके…मी शाक्त पंथीय आहे आणि गेली अनेक वर्षे मी देवीचे होम, हवन याग आणि यज्ञ करत आलेलो आहे…त्यामुळे माझा अनेक पंडित, ज्योतिष आणि अघोर अशा लोकांशी जास्त संपर्क येत होता…माझ्याजवळ असलेली विद्या मी कधीच वाईट मार्गासाठी वापरली नाही…अशाच एका व्यक्तीच्या घरी मी हवनासाठी गेलो असता तिथे माझी भेट दर्शन राजवाडे नामक व्यक्तीशी ओळख झाली…तो कायम कोणत्या न कोणत्या कार्यक्रमात मला भेटायचा आणि मग आमची मैत्री दाट झाली असं म्हणायला हरकत नाही…पण त्याच्याकडून मैत्री नव्हतीच…त्यांना हवा असलेला मुलगा माझ्या कॉलेजमध्ये शिकवत होता…त्यामुळे त्यांनी ठरवून माझ्याशी मैत्री केली…


साधिका : त्यांनी म्हणजे कोणी? 


कारंडे : दुर्जय भडमकर आणि दर्शन राजवाडे… मला वाटतं हे दोघे फार वर्षांपासून एकत्र आहेत…त्यांच्यात काही तरी आहे पण काय हे मला आजतागायत समजलं नाही…


साधिका : दुर्जय कोण आहे ? आणि त्याला कोणता मुलगा हवा आहे आणि कशासाठी ? 


कारंडे : दुर्जय तस पाहायला गेलं तर एका उद्योजक आहे आणि आमच्या कॉलेजचा ट्रस्टी आहे…त्याचे साखर कारखाने आहेत आणि इथे शहरात एक दोन सोन्याची दुकाने आहेत…मला वाटतं त्याचे पूर्वज फार श्रीमंत असावेत…ही त्याची एक बाजू…काळ्या शक्तींचे जे उपासक आहेत त्यांचा हा प्रमुख आहे…सगळ्यात कुप्रसिद्ध अघोरी दूर्जय…त्याने बऱ्याच सिध्दी प्राप्त केल्या आहेत… राजेवाडे हा सुध्दा ताकदवर अघोरी आहे…त्याने अशी बरीच ताकदवर लोक गोळा केली आहेत… राजाध्यक्ष पण त्यातलाच एक…तर या दुर्जयला एका पिशाच्चाला प्रसन्न करून स्वतःला शापमुक्त करून घ्यायचं आहे… त्यासाठी त्याला विशिष्ट ग्रहमान आणि गोत्र, नक्षत्र असलेला मुलगा हवा आहे…ज्याचं लग्न झालेलं नसेल… आणि तो अगदी सामान्य असेल…असा मुलगा त्यांना सापडला…त्याला भुलवून त्यांच्या जवळ घेऊन येण्यास सांगितलं होतं…मी आधी त्यांच्यात सामील होण्यास नकार दिला होता…त्यानंतर मग त्यांनी माझ्या मुलाला कैद केलं…तो कुठे आहे हे माहिती नाही…पण अगदी माझ्या मुलासारखा दिसणारा एक मुलगा माझ्या घरी येतो, राहतो आणि मला धमकावतो…पण तो माझा मुलगा नाही…माझ्या मुलाचा आत्मा कैद करून त्यांनी त्याच्या शरीरात त्यांच्याकडील वाईट आत्म्याला माझ्या मुलाच्या शरीरात थारा दिला आहे…मी जर त्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिलं नाही तर ते माझ्या मुलाला मारून टाकतील… 


साधिका : त्यांना हव्या असलेल्या मुलाचं नाव काय ? 


कारंडे : अभिमन्यू भोसले…


साधिका : आणि तुमच्या मुलाचं? 


कारंडे : अर्जुन कारंडे… 


साधिका : तुम्हाला यांच्याविषयी अजून काही माहिती आहे का ? जसं की दुर्जय एकटाच आहे की त्याच्यासोबत आणखी कुणी आहे ? 


कारंडे : ते माहिती नाही…तो आम्हाला फार भेटत नाही… पण त्याची ताकद अफाट आहे…


साधिका : असू दे…सुदामाविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? 


कारंडे : हो त्याला या लोकांनी कैद केलं आहे…तो कुठे आहे हे फक्त राजाध्यक्ष सांगू शकेल…


साधिका : आणि अजून काही सांगायचं आहे का ? 


कारंडे : ते आंजनेयच्या आणि तारिणीच्या शोधात आहेत…


साधिका : ठीके… आपण भेटलो हे कोणालाही कळता कामा नये…तेव्हा…शांत रहा आणि तुमच्या मुलाची पत्रिका मला ताबडतोब पाठवा…या कामात उशीर करून चालणार नाही…नाही तर…तुमच्या मुलाचे प्राण जातील… 


कारंडे : हो लगेच पाठवतो…आणि मला पुन्हा भेटायचं असेल तर… 


साधिका : मीच तुमच्याशी संपर्क करेन…


त्यांच्याशी बोलता बोलता साधिकाने भिंतींच्या कोपऱ्यात असलेली पण जमिनीत रुतून ठेवलेली जाडजुड सोनेरी रंगाची काठी उचलताच ज्या घरात ते दोघे बसले होते ते गायब होतं आणि सोबत सधिकाच्या हातातील काठीसुद्धा…हे पाहून कारंडे थक्क होतो. एक क्षण त्याने जे पाहिलं ते खरं होतं का या विचारता तो पडतो आणि त्याला साधिकाच्या ताकदीचा अंदाज येतो.