सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 6 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 6


        घरी गेल्यावर भाऊनी  पिशवी  कपाटात ठेवून कुलुप घातलं. त्या पंच क्रोशीतली काही मंडळी पैसेवाली  होती हे भाऊ ऐकून होते. दादा खोतानी बसल्या बैठकीत इतकी मोठी   रक्कम आपल्या शब्दा सरशी कसलाही बियादा न सांगता  कशी काय  दिली हे भाऊना कोडंच वाटलं.  जेवणं झाल्यावर  भांडी घासायला  आलेल्या काशी  बाणणीला   बाबल्याला  भेटायला  ये असा निरोप सांगायला  पाठवली.  बाबल्या आला. त्याला  सोबत घेवून गोठ्यात जाताना  ते म्हणाले, “ घरात जोकमीची वस्तू हा..... आता मी   सांगासर तू चोवीस तास जेवणा खाण्यासकट  माझ्या घरीच  ऱ्हवायचा...... ”   संध्याकाळी  ते बर्वे मास्तराना भेटायला गेले, त्याना सादिलात काय विषय आहे तो सांगितल्यावर त्यानी रत्नागिरीला जायचा दिवस ठरवला. भाऊ  घरी  गेले तेव्हा बाबल्याचा मुलगा कुत्र्याला घेवून आलेला होता. बाबल्याने त्याला  दिंडी   दरवाजा शेजारच्या  खिडकीच्या गजाला  टांगलवला.  भाऊंची   मुलं  निमा नी    सुरेश कुत्र्याशी  खेळायला  लागली. बाबल्या  राहिल्या मुळे  गोठ्यातल्या   गवतपाणी , दूध काढणं  यातून भाऊना सुटणूक मिळाली. बाबल्या सकाळी दुधाचे रतीब पोचवायला  जाई तेंव्हा  आपल्या  घराकडे  फेरी मारून येई. एरवी दिवसाडी  गोठ्यातलं काम, आगरातल्या माडांचं शिंपण,  पावसाळी   बेगमीसाठी   लाकडं  फोडणं  पाळंद झाडणं  अशी काहीना काही कामं योजून योजून करीत राही. 

                      भाऊ  बर्वे मास्तर आणि धाकूला घेवून रत्नागिरीला रवाना झाले.  भाऊना बघितल्यावर अव्वल कारकून साहेबाना भेटायला गेला. सायबानी त्याला भाऊना घेवून दामल्याच्या वाड्यात जावून आप्पा दामल्यांकडे व्यवहार पुरा करायला सांगितला. व्यवहार पुराकरून आल्यावर पहिल्या हप्त्याच्या रकमेची ऑर्डर मिळाली. ट्रेझरीत जावून रक्कम ताब्यात घेतल्यावर  परटवण्यावर बर्वे मास्तरांच्या बहिणीकडे  वसतीला राहिले. रात्री बर्वे मास्तरांची विचार विनियम करून  दादा महाजनांकडून हातउसनी घेतलेली रक्कम नी त्याबाहेर ५०० रुपये  ठेवून उरलेले  पैसे राजापुरला पोस्टात  ठेवायचे  ठरले.  दुसऱ्या दिवशी सकाळी  लौकर  बाहेर पडल्यामुळे  दुपारी  राजापूर पोस्टात रक्कम  ठेवून झाल्यावर भाऊनी  त्याकाळी प्रसिद्ध असलेली  चार सेलची विंचेस्टरची ब्याटरी आणि  बत्ती  विकत  घेतली. भाऊ बर्वे मास्तरानी केलेल्या मदतीच्या बदल्यात  पाच रुपये देत होते पण मास्तरानी  ठाम नकार दिला. 

                धाकू आणि  बाबल्याच्या भावाला  सोबत घेवून  दोन दिवसानी  भाऊ  चिवारीत दादा खोताना रक्कम द्यायला गेले. भाऊनी  पैसे दिल्यावर ते  मोजूनही न बघता  दादानी उचलून कपाटात ठेवले. मग भाऊनी मान खाली घालीत म्हटलं , “तुम्ही माझ्या शब्दासरशी इतकी मोठी रक्कम तात्काळ काढून दिलीत. तुमचे उपकार मी हयातभर विसरणार नाही. माझं काम झालं . देवदयेने  कधि कल्पनाही केली  नव्हती  मोठी रक्कम आज माझ्या कडे आहे. तुम्ही  काहीना काही  व्याज घ्या. मी आजपावत  व्याजबट्ट्याने  पैसे घेतले नाहीत त्यामूळे मला  दरादामाचा काय अंदाज नाही. पण तुम्ही सांगाल तेवढं व्याज मी देईन.” त्यावर दादा म्हणाले, “ रक्कम मोटी  हुती ही गोष्ट खरीच पन तुमी  म्हयनो पुरो होवच्या आत येवार पुरो क्येलास..... माका व्याज घेवचा आसता तर तुमका रक्कम देताना  अट घतली आस्ती. तुमच्याकडसून कर्जखत लिवून घितला असता. पण तुमच्यार माजो इस्वास हा..... थोडक्यादिसापुरती तुमची नड  हुती.  काम झाल्यार तुमी लगेच एका मुठीन  येवार भागवलास तांच माजा व्याज. ह्येच्या नंतरही गरजेक कदीपन माज्याकडे येवा...... माज्याच्यान होणारी  मदत मी करीन...... ” 

                       खुटवळ आणि सिलीपाटासाठी  इद्रूस कोळसेकर भाऊना भेटायला आला. तो मोठा पैसेवाला असला  तरी जात्या अत्यंत  हिमटा आणि  गिऱ्हायका  पुढे  रडी लावून पडत्या दराने खरेदी  करणारा म्हणून  प्रसिद्ध होता. त्याचे व्यवहार  लोळगे आहेत हे भाऊ ओळखून होते. बसल्या बसल्या दहा रुपयाच्या दोन नोटा नाचवीत तो भाऊना म्हणाला, “ तुमी रस्त्याचा कंट्राट घितलास ह्या काम ब्येस केलास. पन सरकारी काम म्हंज्ये  जादा पैसा मिलणार नाय. म्हनून ह्या काम किती वर्सा  कोन घेयाला तयार नाय. आता तुमाला काय ह्या कामांचा अनभव नाय म्हंताना  तुमी जोकमदारी घितलीव. बरां  लय थोडो खुटवळ आशे. तेच्यात भरयाभरी कोलसो पडेल आशे दांडगे  सगीन नग म्हणशा तर लाय कमती हायत. नी तुमच्या गडयानी ढिगोळ्यो  घतल्यो त्योबी  लय न्हान्यो आशेत.”  इतका वेळ गप्प बसून  ऐकणारा  बाबल्या  एकदम चवताळून म्हणाला, “ काय रे इद्रूसा, तू काय आमका येडझये समाजलं कायरे..... माजो  खुटवळाचू धंदो नाय पन  खुटवळ काडून ढिग़ मारुची कामा करून माज्ये क्यास पिकले. जितकी वर्सां तू कोळसो पाडतस तितकी वर्सा  मी दुकू मजूरी केलेली हा. चार साला मागे  सुंदर  खोताच्या  नवेदरात   सतरा एकरातलो खुटवळ  तूच घितलस ना? त्यो ढिगोळ्यो  काय तुज्या बापसान घतलेल्या  हुत्यो काय रे चोरा?  भाऊंच्या  कामार  बाण्यांचा फैल हुता,  धाकूचा फैल हुता. सगळे गडी  खुटवळाच्या कामात व्हैवाटलेले हत. आमच्या ठपा जवळ  तरक लावन्  भरताड करून बग...... जर भरवान कमी पडला ना तर  तुज्या ढेंगाखालसून जायन्...... ” 

            ओशाळं  हसत  आपला मुद्दा न सोडता इद्रूस म्हणाला, “ ह्यो  बतावन्यो तू माज्यासामनी  केरू नको...... तुमानला मजूरी  भेटली म्हानताना  तुमी गडी लोक  मालकाला खूस करन्यासाटी  लाकडाच्या टवन्या  उडगळ टाकून ढीग  मोटा करून  ठेवनार मी  आमच्या सारक्या  गरीबान्ला  मारून घालनार. बोलना सोपा  हाय कारन  कोन झालो तरी  परतेक ढोगोली  जवल  टरकाचा  भरवन करून  मापून घेनार नाय. तेच्यात मी  कोलशेवाला.   मी  तितेच  खुटवल जालून कोलसा पाडनार. त्ये जावने...... खारी  माती  समजून मी  हाय त्या परस्तीतीत   म्हाल  घ्येतो.  तुमी  सस्कार म्हनून  ह्ये ईस रुपाये ठ्येवा  नी   होयस्कार द्यावा. कोलसा पाडल्यावर  किती उतारा पडतो  त्येच्या  माफक  मी तुमानला  दर देईन. पिराच्या  उरसाच्या  आदी   तुमची  ऱ्हवलेली  रक्कम मी पुरी  करीन, अल्ला कसम माज्या  शब्दात खोट येनार नाय. ”  त्यावर  भाऊनी  बाबुराव देसायांशी  आपलं जुजबी बोलणं  झालेलं असून आपल्याला  पुढच्या कामासाठी मोठी रक्कम लागणार असल्याने  रोख रक्कम घेतल्याशिवाय व्यवहार होणार नाही असं खडसावलं. बराच वेळ घोशाचं मळ घालून भाऊ बधत नाही म्हटल्यावर. “मंग काय नायच म्हंतीव काय तुमी...... आजून इचार करा.... ह्या खुटवळाच्या धंद्यात आता काय अर्ताची बाजू ऱ्हवलेली नाय.   (क्रमश:)