सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 9 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 9

 

पण तीन वाडीतले  मिळून पंचवीसेक  कुत्रे असल्यामुळे त्याना पळ काढता येत नव्हता.वाटेत  आलेल्या  लहान सहान झाळीत घुसून  त्यांचा बचवाचा प्रयत्न सुरू होता. गडी  जवळ गेल्यावर कुत्र्याना  जोर आला. कुत्रे झाळीत घुसल्यावर  एका डुकराला  नाईलाजाने बाहेर पडावे लागले .आता ते गड्यांच्या वेढ्यातच  गावले . दांडे कुऱ्हाडी घेवून गडी तूटून पडले. त्या गडबडीत दांड्याचा अवघाती फटका बसून एक कुत्रा  कमरेतूनच मोडला. दुसरा  डुकर मोहरा फिरवून  पुन्हा राईच्या गचवणात रिगला . त्याच्या पाठोपाठ कुत्रेही रिगले. पण थोडसं आत गेल्यावर घोट्याच्या  वेली , तोरणी  याची गचवड होती  त्यातून कुत्र्याना पुढे जातायेईना.  तासभर रेंगाळून कुत्रे परत आले.शिकार बरीच मिळाली होती. कमरेत मोडलेला कुत्रा वेदनानी तळमळत भीषण केकाटत होता. त्याला अती तळमळत ठेवण्यापेक्षा मारून टाकायचा सल्ला  जाणत्यानी दिला.

               सव्वा महिन्यात  लेव्हल उठवायला पुरेशी  वळीवं काढून झाली होती. भर टाकायला लहान मोठ्या साईझचा बोल्डर प्रतवारी  प्रमाणे थप मारून डाळून झाला. कामाला प्रत्यक्ष  सुरवात केल्यावर भर घालण्यासाठी  दरडी  खणल्या की पोटात  लहान मोठे  दगड धोंडी मिळणार होत्या. पुरेसं  मटेरियलजमलं याची खात्री  झाल्यावर काम बंद करण्यात आलं. त्याच दरम्याने बानघाटीतून रस्ता गावदरीत उतरायचा होता तिथे कुंभारांपैकी  बारा  एकर मळे जमीन , त्याला  कुंभाराच भाटलं म्हणत , ते  जठाराकडे गहाण होतं.  येरमांकडे  तिर्दलीने ( तीन चतुर्थांशा उत्पन्न कसणारालाआणि एकचतुर्थांश मूळ मालकाला)  कसायला दिलेले होते.  गेली तीन चार वर्ष बळीची नी त्यांची सवगव होती. त्या संबंधातून  त्यानी ते बळीला विकलं.  निर्धारित  रस्त्यासाठी त्यातली काही जमिन जायची होती. याचा बकवा करून बळीने बेताबातात व्यवहार मिटवला. ते खरेदीखत झालं आणि बळीने कोर्टात केस घालून रस्त्याचा कामाला  मनाई ची ऑर्डर मिळवली. त्याचे  नेवऱ्यातले पाहुणे सुदाम परकर त्यावेळी जिल्हा बोर्डाचे मेंबर होते . त्याना मध्यस्त घालून बळीने नियोजीत रस्ता बान घाटीतून गावदरीत उतरण्या ऐवजी  तीन चार फर्लांग पुढे  नेवून येरम वाडी जवळच्या घाटीतून भाऊ घाट्यांच्या  ठिकाणाजवळून  मुळवसा कडच्या व्हाळाकडे  न्यायचा प्रस्ताव दिला.यामुळे येरम, मुळम आणि   गुरववाडकरांची सोय होईल. येरमाच्या घाटीला घसारीही  कमी असल्यामुळे  फार खर्च न होता  काम होणार आहे अशीही मल्लीनाथी केली.

                   मुंबई पर्यंत खेप घालून  शानूकाका देसायाना भेटून बळीने  हा प्रस्ताव त्यांच्याही गळी उतरवला . वरून फेरदुरुस्तीचे आदेश आल्यावरअगदी  युद्ध पातळीवर सर्वे करूनताबडतोब  रिपोर्टिंग करण्यात आलं.महिनाभरात  दुरुस्त प्रस्ताव मंजूर होवून आला. यादुरुस्ती मुळे मूळ सहा मैल तीन फर्लांग रस्ता सात मैल चार फर्लांग झाला.ही  बातमी फुटल्यावर बळीची मखलाशी  कोणाच्या लक्षात्च आली नाही . उलट  येरम, गुरव, मुळम वाडकराना  आपली सोय होणार म्हणून भलताच आनंद झाला.भाऊही  आपली सोय झाली म्हणून सुखावलेले होते. बानघाटी संपल्यानंतर  गावदरीतलं  उतरण ही खाईच होती. तिथलं काम करताना  सडावळी वरून ट्रक लावून भर नी दगड वाहतूक करावी लागणार होती  तोअव्वाच्या  सव्वा खर्च वाचला असता.कारण  येरमाच्या  घाटीत  घसारी   अगदी   सामसुमार असल्यामुळे पाचसहा टोणे  मारून सिंगल   दगडाचं बांधकाम करून  भागणारं होतं. बानघाटीवरून पुढे राईच्या  बाजूने न्यायच्या रस्त्याला  मोठमोठे कांदळ, सारिवले  नी  आवळदोडीचे वृक्ष होते, तिथे मजबूत सिलीपाट गवणार होता.

                    लक्ष्मी पूजनापूर्वी  भाऊनी गाडांचं पूर्ण बील  भागवलं.  दगडाचं फ़ोडकाम करतानाची मजूरी भागवून गड्याना  समजदिली की  पुढचा  टप्पा मोठ्या खर्चाचा  आहे . शिमग्यापर्यंत   निम्मे मजूरी मिळेल नी उरलेली   चतुर्थीला .तोपर्यंत  कोणी गडबड  बियादे लावायचे नाहीत.  गडी तयार झाले.  बारस झाली आणि रस्त्याचं काम सुरू झालं. खणकाम मोठं असल्यामुळे नवीन पिकावं, लोखंडी  धुमस , दगड वहाण्या साठी  लोखंडी साखळ्या  नी घमेली नव्याने खरेदी करून आणावी लागली. भरीसाठी   सकेर नी  पृष्टभागावर माती  घालायची यासाठी  वाहतूक  करायला बायका माणसं  वाढवली. धूम धडाक्यात काम सुरू झालं. हा टप्पा  जोखमीचा होता.बांधकाम केल्यावर  गाडणी  खबरदार होणं गरजेचं होतं. काही ठिकाणी कमरभर  तर कुठे कुठे छाती अगळ  बांधकाम उठवायचं होतं. तिथे गाडणी  कच्ची झाली असती तर पावसात सडावळीचं पाणीनी  दरडींमधून  उमळं फुटून  पाण्याच्या व्हावट्या  सुरू झाल्या की   बांधकाम  ढगळलं असतं. या गोष्टीची  साहेबानाही पूर्ण कल्पना होती. शेवटी पापाचा धनी वाल्या कोळी या न्यायाने  रस्ता ढासळून काही अपघात वगैरे झाला असता तर त्याचं खापर सायबांच्या डोक्यावर फुटून  त्याना  बडतर्फ़  होवून घरी बसायची वेळ आलीअसती. म्हणून दर आठक्ड्यात जिल्ह्यावरून कुणी ना कुणी  अधिकारी येवून कामाची कसून तपासणी  केली जायची.

             बाबल्या नी धाकू यानी  ऐन व्हाळात पाण्याचा मारा  होतो अशा ठिकाणी  बांधकामं केलेली होती. सुरू असलेल्या  कामाच्या ठिकाणी  पावसाळी पाण्याच्या  व्हावट्या लक्षात घेवून त्या ठिकाणी पावसाळी  पाणी साठून भर घातलेलीमाती फुगून  बांधकामाला तडे जाऊ नयेत म्हणून  टीचभर , वीत भर रुंद आरपार मुशी  सोडलेल्या होत्या. साधारण हातभर उंचकाम उठलं  की  पहिल्या मुशींच्या   मध्यभागात पुन्हा आरपार मुशी  सोडून काम उटवीत असत. खालची बाजू मारणीची तिथे प्रत्येक थपाला  कैची  टाकलेली असे. पाण्याचा निचरा होण्यासाठी खालच्या बाजूला  तिरके तासलेले दगड बसवूनफटी सोडलेल्या होत्या .  भर घातल्यावरती  लोखंडी धुमसाने पक्की ठोकूम शाबूत करायच्या कामावर खास गडी  नेमलेले होते.बांधकामासाठी  काढलेली  वळीवं एवढी जडशीळ होती की  तिकाटणी नीलोखंडी  साखळीची लवंगणं   वापरून दोन दोन तीन तीन गड्याना  वाहू न्यावी लागत. अगदी सुरुवातीला समक्ष साहेब पहाणी करायला आले होते तेंव्हा  त्यानी वळिवं  पहारीने परतून पाहिल्यावर ते निर्धास्त झाले होते.   फार उलाल (उंच) बांधकाम असेल  तिथे हयगय न करता असला माल वापरायची सक्त ताकीद त्यानी दिलेली होती.  याकामातले  म्होरके बाबल्या, धाकू नी  गाडणी करणारे गडी  यांची पाठ थोपटून  तारीफ केली होती. कंत्राटात ठरलेलं नव्हतं तरीही  कधी काळी मुसळधार पावसात  व्हावटीला जोरदार पाणी आलं की ते तुंबून बांधकामाला धोका होवू नये म्हणून वरच्या अंगाला मारलेल्या गटातलं पाणी पलिकडच्या  अंगाने वाहून जावं या साठी दर पंधरावीस हात अंतरावर बांधकामाच्या तळी आरपार हातभर रुंद मोठी  मूस राखून त्यावर रुंद पाथरी  टाकून झाकण घातलेलं होतं. (क्रमश:)