Periods – नैसर्गिक प्रक्रिया की समाजाचा लाजेचा विषय?
तुम्ही कधी periods बद्दल बोलताना आवाज खाली करता? किंवा शब्द उच्चारताना जिभेला अडथळा येतो? का? जी प्रक्रिया प्रत्येक नवीन जीवनाची सुरुवात करते, तीच प्रक्रिया का लपवली जाते? का आपण तिला “त्या दिवस”, “महिन्याचा त्रास” किंवा फक्त “पीरियड्स” असं नाव देतो, पण त्याबद्दल खुलं बोलत नाही?
हे प्रश्न आजही लाखो मुलींना, स्त्रियांना आणि पुरुषांना भेडसावतात. कारण periods ही फक्त शारीरिक गोष्ट नाही; ती समाजाच्या मानसिकतेला आरसा आहे. आज आपण या आरशात नजर टाकणार आहोत. कोणावर दोष ठेवण्यासाठी नाही, तर स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्यासाठी. कारण जेव्हा आपण periods ला लाजेचा विषय बनवतो, तेव्हा नकळत आपण स्त्रीच्या अस्तित्वालाच लाजेचा विषय बनवतो. आणि हे बदलणं आवश्यक आहे.
Periods ही पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात गर्भधारणेची तयारी होते. जर गर्भधारणा झाली नाही, तर गर्भाशयाचा आतील थर रक्तासह बाहेर पडतो. हा संपूर्ण चक्र साधारणतः २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान चालतो आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सद्वारे नियंत्रित केला जातो. या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात—पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, मूड स्विंग्स, चिडचिड, भूक कमी-जास्त होणं, डोकेदुखी. काही वेळा रक्तातील लोह कमी झाल्याने अशक्तपणाही जाणवतो. तरीही स्त्री तिची दैनंदिन जबाबदारी पार पाडत राहते. या सहनशीलतेकडे आपण क्वचितच लक्ष देतो.
समाजाने मात्र या नैसर्गिक प्रक्रियेभोवती लाज आणि गैरसमजांचा एक आवरण तयार केलं आहे. “त्या दिवसांत मंदिरात जाऊ नको”, “देवघरात प्रवेश नको”, “वेगळं बस”—अशा अनेक समजुती अजूनही अस्तित्वात आहेत. sanitary pad घेताना तो लपवून नेण्याची सवय जणू आपोआप लागलेली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एखाद्या मुलीच्या कपड्यांवर डाग पडला, तर ती लाजते आणि इतर हसतात. pad दिसला, तर त्यावर विनोद केला जातो. सोशल मीडियावर तर periods बद्दलचे गैरसमज आणि चेष्टा अधिकच पसरतात. हे केवळ अज्ञानाचं लक्षण आहे.
अशा अनुभवांमुळे अनेक मुलींच्या मनात असुरक्षितता निर्माण होते. शाळेत एखादी मुलगी फक्त एका डागामुळे हसवली जाते, आणि त्या एका घटनेमुळे तिचा आत्मविश्वास ढासळतो. कॉलेजमध्ये मित्रांच्या एका विनोदामागे तिच्या भावना दुखावल्या जातात. ती बाहेरून हसते, पण आतून तुटत जाते. घरातही काही जुन्या समजुतींमुळे तिला वेगळं बसवलं जातं, काही गोष्टींना स्पर्श करू दिला जात नाही. अशा वागणुकीचा परिणाम तिच्या मनावर खोलवर होतो.
Periods दरम्यान स्त्रियांच्या समस्या केवळ शारीरिक नसतात; त्या भावनिक पातळीवरही तीव्र असतात. वेदना सहन करताना, अशक्तपणाशी लढताना आणि मूड स्विंग्स अनुभवताना तिला सतत स्वतःला सावरावं लागतं. पण समाज तिच्या या अवस्थेला “overreacting” म्हणून नाकारतो. त्यामुळे “माझ्या भावना कोणी समजून घेत नाहीत” ही भावना अधिक बळकट होते.
या संदर्भात पुरुषांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक स्त्री ही कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात महत्त्वाची असते. तिच्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर विनोद करणं किंवा तिला लाजवणं चुकीचं आहे. त्या काळात तिच्या भावना समजून घेणं, तिची काळजी घेणं, आणि आवश्यक तेवढी साथ देणं ही एक साधी, पण महत्त्वाची जबाबदारी आहे. समजूतदारपणा आणि आदर हीच खरी गरज आहे.
आई-वडिलांची, विशेषतः आईची भूमिका येथे निर्णायक ठरते. मुलांना लहानपणापासूनच periods बद्दल योग्य माहिती दिली, तर त्यांच्या मनात या विषयाबद्दल सहजता निर्माण होईल. “ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, यात लाज कसली?” हा साधा संदेश पुढील पिढीला अधिक संवेदनशील बनवू शकतो.
स्त्रियांनीही या विषयाबद्दल लाज बाळगणं थांबवलं पाहिजे. periods ही कमजोरी नसून शरीराची एक आवश्यक प्रक्रिया आहे. याबद्दल खुलेपणाने बोलल्याने इतरांनाही धाडस मिळेल. एक स्त्री बोलली, तर दुसरीही बोलायला पुढे येईल, आणि हळूहळू हा विषय सामान्य होईल.
शिक्षक आणि शिक्षिका यांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे. शाळांमध्ये योग्य शिक्षण दिलं गेलं, तर विद्यार्थ्यांमधील गैरसमज दूर होऊ शकतात. एका संवेदनशील शिक्षकाच्या एका वाक्यानेही विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो. आदर शिकवला, तर तो पुढील आयुष्यातही टिकून राहतो.
समाजात अजूनही काही अंधश्रद्धा पाळल्या जातात, ज्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अशा प्रथा केवळ स्त्रीच्या आत्मसन्मानाला धक्का देतात. म्हणूनच तर्कशुद्ध विचार आणि विज्ञानाची समज आवश्यक आहे.
आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य sanitary products वापरणं, ते वेळेवर बदलणं आणि स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. अजूनही काही भागांत असुरक्षित पद्धती वापरल्या जातात, ज्यामुळे इन्फेक्शन आणि गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे जागरूकता निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे.
जगातील अनेक देशांनी या विषयाकडे प्रगत दृष्टिकोन स्वीकारला आहे. काही ठिकाणी sanitary products मोफत उपलब्ध करून दिले जातात, शाळांमध्ये खुल्या चर्चा केल्या जातात आणि कामाच्या ठिकाणी विशेष रजा दिली जाते. यावरून आपणही शिकण्याची गरज आहे—खुलं बोलणं, योग्य शिक्षण आणि परस्पर आदर.
समाजात बदल घडवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; सुरुवात छोट्या विचारांपासून होते. घरातला एक संवाद, शाळेतली एक चर्चा, किंवा एखाद्या व्यक्तीचा बदललेला दृष्टिकोन—हेच पुढे मोठा बदल घडवू शकतात.
Periods लाजेचा विषय नाही. तो समजून घेण्याचा विषय आहे. तो आदर करण्याचा विषय आहे. जी प्रक्रिया जीवन निर्माण करते, ती कधीच लाजेची असू शकत नाही.
आज एक निर्णय घ्या—लाज नको, समजून घ्या. मजाक नको, आदर द्या. कारण जेव्हा आपण periods ला स्वीकारतो, तेव्हा आपण स्त्रीला स्वीकारतो. आणि स्त्रीचा स्वीकार म्हणजे संपूर्ण समाजाचा स्वीकार.
प्रत्येक मुलीला हक्क आहे—डोकं उंच ठेवून, लाज न बाळगता जगण्याचा. आणि तो हक्क आपण सर्वांनी मिळून दिला पाहिजे.
मी एक लेखक म्हणून हा विषय समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लेखनात कुठे काही कमी-जास्त झालं असेल, तर भाऊ म्हणून समजून माफ करा. तुमचे विचार आणि प्रतिक्रिया मला नक्की कळवा. लेख आवडला असेल तर जरूर follow करा, तुमचा पाठिंबा मला पुढे आणखी चांगलं लिहायला प्रेरणा देईल.