अतृप्त आत्म्यांच्या दुनियेतून - 2 Ashish Devrukhkar द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतृप्त आत्म्यांच्या दुनियेतून - 2

चला तर मग जाऊया आपल्या पहिल्या कथेकडे. ही कथा आहे सुयशची ज्याचा बारावीचा निकाल लागला आणि पुढच्या शिक्षणाची तयारी करताना त्याची झालेली धावपळ आणि अतृप्त आत्म्याशी झालेला सामना हा तो स्वतःच सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया सुयशीची कहाणी हॉस्टेलची पांढऱ्या साडीची बाई आणि प्लँचेट भाग -१

Hi..... वरती वाचून कळले असेलच माझं नाव सुयश आहे ते. माझा बारावीचा निकाल होता आणि मला खात्री होती मला ८०% पेक्षा जास्त गूण मिळतील आणि CET होतीच त्यामुळं माझ्याच शहरात मला सहज इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल याच भ्रमात मस्त जगत होतो. तो दिवस उजाडला आणि सकाळीच सायकल घेऊन मी माझ्या कॉलेजवर गेलो. अजून कॉलेज उघडले नव्हते, पण गेटवर खूप गर्दी होती. आतमध्ये result चिकटवायचे काम सुरू होते. धाकधुक वाढत होती पण वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. 

रिझल्ट चिकटवून झाला आणि गेट उघडला. आम्ही सगळे धावत तिकडे गेलो. माझा नंबर शोधला आणि सरळ टक्केवारीकडे वळलो. मला मिळालेले टक्के बघून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. मला फक्त ६९.७६% होते. पुन्हा पुन्हा बघितले मी पण तेवढेच होते. मला खूप वाईट वाटले. तसाच तोंड पाडून घरी आलो. घरच्यांनी ओळखले काय ते. त्यांनाही वाईट वाटले पण अजून CET आहे तिथे चांगले पडले तर मिळेल इकडेच कुठे तरी ऍडमिशन या भरवश्यावर होतो आणि CET चा निकाल लागला. मला पडले होते फक्त ८१ मार्क्स. आता तर स्वप्नाचा चुराडा झाला होता. घरात आरती झाली ती वेगळीच. इंजिनियरिंग साठी एकदा प्रयत्न म्हणून शहरातल्या काही कॉलेजमध्ये गेलो. एवढे कमी मार्क बघून एका कॉलेजने लाखोत डोनेशन मागितले आणि दुसऱ्या कॉलेजने मेकॅनिकल मिळणार नाही सांगितले. पुन्हा पदरी निराशा.

शेवटी काळजावर दगड ठेवून ज्या कॉलेजमध्ये बारावी झाली त्याच कॉलेजमध्ये BSc साठी फॉर्म भरला. तिथे बरेच लोक पॅम्पलेट वाटत होते. त्यातली काही माझ्याही हातात आली. घरी पोहचल्यावर हातातली पॅम्पलेट वाचताना अचानक एक नव्या कॉलेजचे पॅम्पलेट होते. शेवटचा प्रयत्न म्हणून कॉल कर असे पप्पांनी सांगितले आणि केला कॉल. 

एका फोनवर सगळ काम झाले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडे जाऊन ऍडमिशन घेतले. अर्थात घरापासून लांब होते ते कॉलेज त्यामुळे त्यांच्याच हॉस्टेलमध्ये रहावे लागणार होते. हॉस्टेल रूम बुकिंग झाले. आता काही दिवसांनी तिकडे राहायला जायचे होते पण मी प्रचंड भित्रा. एवढा भित्रा की रात्री घरी येताना आमच्या जिन्यात लाईट नसायची तर मी मोठ्यामोठ्याने गाणी म्हणत यायचो. इतकेच काय रात्री घरात washroom जाताना सुद्धा शिट्टी मारत जायचो. त्यात भरिसभर मी झोपेत उठून चालायचो. हे सगळ आठवून माझी जाम टरकत होती. त्यात कॉलेजही मुख्य डेपो पासून ७ किमी लांब डोंगरात होते. रस्त्याच्या या बाजूला गाव आणि त्या बाजूला कॉलेज. हॉस्टेलच्या मागे सगळ दाट जंगल. जाणे तर जरुरी होते म्हणून गेलो. 

जुलै मध्ये कॉलेज सुरू झाले. माझी रूम होती दुसऱ्या मजल्यावर ३३ नंबरची. सगळ्यात शेवटची खोली. खोलीच्या बाजूला कॉमन संडास बाथरूम. समोरची खोली ३४ नंबर. नशिबाने माझे दोन्ही रूम मेट माझ्याच शहरातले निघाले आणि ३४ मध्ये राहणारे दोघेही. आमची पाच जणांची चांगली गट्टी जमली होती. आम्हा फर्स्ट इयरच्या मुलांसाठी ते हॉस्टेल होते, डी हॉटेल. त्यामुळे रात्री १० वाजता सिक्युरिटी त्याला कुलूप लाऊन बंद करायचे. 

सगळ सुरळीत सुरू होते. गणपतीला आठ दिवस सुट्टी झाल्यावर आम्ही सगळे पुन्हा हॉस्टेलला परतलो होतो. आता म्हाळाचा महिना सुरू झाला होता आणि या महिन्यात भुते खाली येतात असे मी ऐकून होतो. 

सुट्टी संपून कॉलेज सुरू होऊन २ दिवस झाले आणि सिनिअर्समधून एक गोष्ट येऊन धडकली की म्हाळाच्या महिन्यात हॉस्टेलचे दरवाजे रात्री कोणीतरी वाजवते आणि उघडून पाहिले तर कोणी नसते. ऐकून हवा टाईट पण दुर्लक्ष केले. रात्री झोप यायची बंद झाली, कुठे खट्ट झाले की वाटायचे कोणीतरी दार वाजवले. तिसऱ्या रात्री दीड वाजयच्या सुमारास दार वाजवल्याचा आवाज आला पण दरवाजा आमचा नव्हता, थोड्यावेळाने आणखी एक दरवाजा वाजला. मग मात्र धडधडू लागले आणि आमचा दरवाजा वाजला पण अतिशय जोरजोरात. बाहेरून हाक मारत होते दोघे "सुयश दार उघड, लवकर उघड". भूत कोणाच्याही आवाजात ओरडते असे आहट मध्ये पाहिले होते त्यामुळे आणखीच टरकली. शेवटी अर्वाच्य शिव्या ऐकल्या तेव्हा खात्री पटली की हे मित्रच आहेत. दार उघडलं आणि त्यांना आत घेतले. ३४ मध्ये राहायचे ते. दरवाजा वाजल्यावर त्यांनी उघडून पाहिले होते पण दिसत कोणी नव्हते म्हणून घाबरून ते आमच्याकडे आले होते. 

रात्रभर आमची खलबत चालू होती की शोध लावायचा का की कोण वाजवत दार. मग एकाच खोलीत आम्ही ५ जण राहिलो. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा शेजारचे दार वाजले, मग समोरचे आणि मग आमचे. आम्ही पटकन दार उघडले. कोणीच नव्हते. आम्ही पूर्ण तयारीत हातात बॅटरी लाईट गेलीच तर उपाय म्हणून आणि हातात काठ्या. शेजारच्या बाथरूममध्ये पाहिले कोणीच नाही, व्हरांड्यात कोणी नाही का जिन्यात कोणी नाही. आता मात्र घाम फुटायची वेळ आली. गुपचूप खोलीत आलो आणि दार उघडे ठेवून बसून राहिलो. 

सकाळी पूर्ण हॉस्टेलला चर्चा रात्री दार वाजवले कोणीतरी. बर बाहेरचे कोणी येऊ शकत नाही कारण गेटला कुलूप असते. पुढच्या रात्री असे काही घडले नाही पण काय तो निकाल लावायचा म्हणून आम्ही चौघांनी जागरण केलेच. थोडे दिवस गेले आणि नवीनच घडलं पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरच्या खोल्यांना बाहेरून कडी लावली होती कोणीतरी. त्यावेळी मोबाईल नव्हते. खिडकीतून हाका मारून दुसऱ्यांना बोलावून कड्या काढायला लावल्या. ही कोणीतरी मस्करी केली म्हणून दुर्लक्ष केले.

मग एक विचित्र घटना घडली. माझ्या खोलीच्या बाजूला ३ संडास आणि २ स्नानगृह होते. तर एक संडास खूप वेळ बंद असल्याची कुणकुण लागली आणि आतमध्ये पाण्याची बादली भरून वाहत होती. दार ढकललं तर आतून कडी होती. हाका मारल्या उत्तर नाही, गार पाणी ओतले वरच्या फटीतून तरी उत्तर नाही. जोरात धक्का दिल्यावर दार उघडले. कोणीतरी टवाळकी करायला कडी लावली असेल असे समजून सगळे निघून गेलो. पण रात्री ११.३० च्या सुमारास एक मुलगा आला आणि बोलला की तिन्ही संडास आणि दोन्ही स्नानगृह आतून बंद आहेत. आम्ही पुन्हा पाणी ओतले पण उत्तर नाही. एव्हाना बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पूर्ण हॉस्टेलमधली मुले वरती जमा झाली. एकाने धाडस करून खुर्चीवर चढून बॅटरी घेऊन आत डोकावण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी दिसले म्हणून जोरात किंचाळला. 

तो जसा किंचाळला तसे सगळे जीव मुठीत धरून धावत सुटले आणि जो वर चढला होता तो खाली फरशीवर पडला आणि एकटाच राहिला. तो मोठ्यामोठ्याने ओरडत होता, "वाचवा, वाचवा". पण कोणाचेच धाडस होईना. तो ओरडतच राहिला आणि इकडे बाहेर आम्ही सगळे बोंबलत होतो. अचानक एकजण ओरडला, "सिक्युरिटी काका आमच्या कमल ला भूताने पकडले आहे, लवकर या." रात्रीचा एवढा गोंधळ ऐकून security धावतच आले. कुलूप उघडून वरती आले. तो अजूनही आतून ओरडत होता. ते तिकडे गेले आणि त्याला घेऊन आले. त्यानं जेव्हा सगळा किस्सा समजला तेव्हा आमचा तमाशा पाहून खूप हसले. ओरडाही खूप खाल्ला. 

ती रात्र तशीच निघून गेली. रविवार उजाडला आणि आमच्या मजल्यावर लगबग दिसली. उठून बाहेर आलो तर खोली क्रमांक ३६ समोर गर्दी दिसली. तिथे गेल्यावर कळले आमच्या बिल्डरला म्हणजे आमच्या पूर्ण हॉस्टेलमध्ये तो एकमेव मजबूत शरीरयष्टी असलेला मुलगा होता, त्याला रात्री माझ्या खोलीच्या बाजूला असलेल्या खिडकीत पांढरी साडी घातलेली बाई दिसली होती. 

त्याला सगळे जण विचारत होते पण तो काहीच बोलत नव्हता. त्याला थरथर भरले होते.

"असाच करतोय रात्रीपासून, काहीच बोलत नाही." त्याचा रूम मेट गणेश बोलला.

"ए परेश, काय झालंय खरे सांग. काय बघितले तू तिथे?" एकाने विचारले त्याला.

परेश काहीच बोलत नव्हता. नुसता वर मान करून बघायचा आणि परत थरथर.

गणेशला राग अनावर झाला आणि तो जोरात ओरडला,"रां@च्या, आता सांगतोस की घालू डोक्यात काहीतरी."

त्याच्या त्या रुद्र अवताराला पाहून परेश आणखी घाबरला आणि बोलू लागला.

परेश : "त्या त्या त्या..."

गणेश : "अरे @वड्या सांगतोस की...."

"सांगतो सांगतो, मारू नकोस. त्या बाजूच्या खिडकीला ग्रील आहे ना त्याला ती बाई बाहेरून त्या ग्रीलला पकडून त्या खिडकीत बसली होती."

"आणि काय करत होती? गोट्या खेळत होती का?"

सगळे हसले.

"नाही."

"मग?"

"ती बाहेरून तिथे उठाबशा काढत होती."

सगळ्यांची हसून पुरे वाट लागली.

"मग तू काय ती किती उठाबशा काढते मोजत होतास का?" आता गणेशच्या या प्रश्नाने हसून मरायचे बाकी होते. 

"नाही. मी मुतायला निघालो होतो तर तिथेच ती होती आणि मला पाहिल्यावर त्या बाईने सी हॉस्टेलवर उडी मारली. मग ती अचानक उडत उडत गर्ल्स हॉस्टेलवर गेली."

"गप येड@व्या आम्हाला @तीया समजतो का?"

खरेतर ऐकून हसायला आले होते पण त्याचा भेदरलेला चेहरा पाहून तो मस्करी करत असावा वाटत नव्हतं.

आम्ही नाश्त्याला निघून गेलो पण त्याचा तो भेदरलेला चेहरा समोरून जात नव्हता. त्या रात्री १२ वाजता पुन्हा लगबग दिसली आणि अँब्युलन्सचा आवाज आला. आम्ही धावत बाहेर आलो. कळले की परेशला खूप ताप भरला होता आणि त्याला आकडी आली होती. याचा अर्थ

तो खोट बोलत नव्हता.


(क्रमशः)