श्यामची आई - प्रारंभ

(66)
  • 40.7k
  • 14
  • 26.3k

पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही.