श्यामची आई - 16

  • 8.7k
  • 1
  • 2.6k

सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुध्दा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू हा महाराष्ट्रीय व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो! परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत.