श्यामची आई - 30

  • 10.3k
  • 1
  • 2.1k

मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे! नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको धरू हट्ट. मित्रांनो! माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे.