श्यामची आई - 35

  • 6.4k
  • 2
  • 1.7k

मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल, तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वांत धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला, असे आम्हां सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हांला सोडून गेला! दत्तगुरू, दत्तगुरू म्हणत गेला. ते पाहा मला बोलावीत आहेत, मी जातो! असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो, तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा तेथेही प्लेग आहे, हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे, तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली.