श्यामची आई - 37

  • 7k
  • 2
  • 1.7k

शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा, असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती! आईला दोन दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे! शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची! माझे प्राण ने ना ग आई! नको हा जीव! अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी नऊ वाजायची वेळ होती.