फार दिवसांपूर्वीची गोष्ट. त्या काळात मोठमोठे यज्ञ होत असत. बाराबारा वर्षेही चालत. यज्ञप्रसंग म्हणजे उत्सवाचे. जणू जत्राच तेथे भरे. हजारो लोक यायचे-जायचे. परस्परांस भेटायचे. तेथे बसलेल्या दुकानांतून माल न्यायचे. तेथे होणाऱ्या कथाकीर्तनांतून, पुराणप्रवचनांतून धर्म शिकायचे. तेथे खेळ असत, कुस्त्या असत. नवीन नवीन नाटके व्हायची व चांगली ठरतील त्यांना बक्षिसे मिळावयाची. अशी त्या काळातील गंमत. एकदा देवांच्या मनात आले की, कधी झाला नाही एवढा मोठा यज्ञ करावयाचा. त्यांनी दानवांना विचारलं की, याल का यज्ञाला? दानव हो म्हणाले. मानवांनाही निरोप आला. मानवांनीही जायचे ठरविले. देव, दानव, मानव सारे एकत्र जमणार? कधी झाली नव्हती अशी गोष्ट होणार होती.