सोनसाखळी - 4

  • 12.7k
  • 4.6k

एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. पाहि मां पाहि मां म्हणत असे. राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा! किती सांगावा? सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई. असा त्याचा कार्यक्रम असे.