जन्मभूमीचा त्याग

  • 9k
  • 2.6k

बहुळा नदीच्या तीरावर सायगाव म्हणून एक गाव होता. गाव मोठा सुखी व समृद्ध होता. गावात नाना प्रकारचे धंदे चालत. शेतकरी, विणकरी, रंगारी, पिंजारी, सोनार, सुतार, लोहार, कुंभार- सर्व प्रकारचे लोक होते. गावात भांडण बहुधा होत नसे. मारामारी होत नसे कोणी कोणाचा हेवादावा करीत नसे. सारे गुण्यागोविंदाने नांदत. सायगावची एक विशिष्ट परंपरा होती. त्या गावचे लोक कधी राजाकडे न्याय मागायला जात नसत. ‘पाप करणारा असेल त्याला देव शिक्षा करीलच’ असे ते म्हणत. ‘पाप करणार्‍याचे मन त्याला खातच असते, आणखी त्याला शिक्षा कशाला?’ असेही कोणी म्हणत. जर गावात अपराध झालाच, तर सारे लोक देवळात जमत. कोणी अपराध केला त्याची चौकशी होई. अपराध करणार्‍याचे नाव देवासमोर सांगण्यात येई. त्याला दुसरी शिक्षा नसे. गावातील सर्व लहान-थोरांना अपराध करणार्‍याचे नाव कळे. त्याच्याकडे सारे लोक ‘हा तो अपराधी’ अशा दृष्टीने बघत. हीच शिक्षा.