काहीवेळ चेष्टामस्करी झाल्यानंतर सई आणि मनालीला अचानक सेल्फी काढायची आठवण झाली. मग छानछान पोज देत त्या कट्ट्यावरच सईच्या नवीन मोबाईलमधून सेल्फीही काढायला लागल्या. मात्र या बाईसाहेब आपल्याच तंद्रीत. एव्हाना ऋचाची नजर भिरभिरायला लागलेली. त्याच्या ग्रुपमधंल कोणी दिसतंय का, याचा शोध ती कावरीबावरी नजर घेत होती. त्याच्यासोबत रोज असणारा एखादा मित्र किंवा मैत्रीण जरी दिसली असते तरी तिच्या जीवात जीव आला असता. मात्र जवळपास १ तास होत आला तरी कोणाचाच थांगपत्ता नाही. सेल्फी काढणाऱ्या या मैत्रीणांचा तिला कधी नव्हे तो राग यायला लागला होता. एरवी त्यांच्यात रमणाऱ्या हसून-खिदळून मज्जा करणाऱ्या ऋचाला त्या काही वेळासाठी का होईना पण अचानक नकोशा वाटायला लागल्या होत्या.