माझं चिंकीशी लग्न होऊन जेमतेम वर्ष झालं असावं; पण एव्हाना आम्ही दोघे अगदी एकमेकांना ओचकारून-बोचकारून जीव नकोसा करायला लागलो होतो, तशी चूक जेवढी चिंकीची होती, तेवढी माझी तसली तरी थोडीफार होती, हे मला मान्य होतंच ! कारण चिंकी पडली एकुलती एक श्रीमतं बापाची लाडावलेली मुलगी. आणि मी पडलो जरा मॉडर्न विचारांचा अन् फारसा श्रीमंत नसलो तरी हाय्यर मिडल क्लासमधला, अन् ज्याचे प्रॉस्पेक्ट अत्यंत ब्राइट्ट आहेत असा एक कूल, जेन-नेक्स्ट तरुण ! त्यामुळं मग आम्ही परस्पर संमतीनं वेगळं व्हायचं ठरवलं. अर्थात विथ म्युच्युअल कन्सेंट ! आणि मग आमच्या रिलेशनशिपमधलं टेन्शन सगळं खलास झालं. पुन्हा आमचं छान जमायला लागलं. भांडणं कमी झाली.