मोक्ष एक रहस्य

(22)
  • 8.3k
  • 4
  • 2.2k

बोचरी थंडी अंगात शिरून अंगभर गारवा मुरवत होती. सुंसुं आवाज करत वारे कानाशी लगट करत होते. सोलापूर मागे पडून आता बराच वेळ झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या हॉटेल्समधील लाईटस बंद झाले होते, काही ठिकाणी बाहेरचे दिवेही मालवलेले होते. एखाद दुसरा ढाबा फिकट पिवळसर उजेडात जाग असल्याची साक्ष पटवून देत होता. लॉंग ड्राईव्हवरील मोठाले ट्रक्स छोट्याशा विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वा अशा ढाब्यात थोड्या वेळासाठी थांबत असल्याने तिथे तुरळक गर्दी दिसत होती. एखाद्या छोट्याशा टपरीवजा चहाच्या ठेल्यावरील भरारा आवाज काढणारा निळ्या पिवळ्या ज्योतीचा स्टोव्ह आणि त्यावर ठेवलेली जर्मनची चहाची किटली उगाच लक्ष वेधून घेत होती. अवती भोवती तोंडाला मफलर गुंडाळून पेंगुळलेल्या झोपेला दूर सारण्याच्या अनिच्छेने दोन चार माणसं हाताची घडी घालून उभी होती.