हे इतके दिवसांचे मोजण्याचे काम माणसाने कसे केले ? याचे सोपे उत्तर आहे - रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करून केले. आपणही असे निरीक्षण केले तर लक्षात येते की रोज सायंकाळी पूर्वेकडून उगवणाऱ्या चांदण्या वेगवेगळ्या असतात. मात्र त्यापैकी बहुतेक सर्वांची एकमेकांच्या तुलनेतील अंतरे व स्थिती बदलत नाहीत. खरे तर सूर्य, चंद्र व इतर ६ चांदण्या, म्हणजे शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध,व ध्रुव एवढ्या गोष्टी सोडल्या तर इतर चांदण्यांची आपापसातील स्थिती सारखीच रहाते. शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध यांना ग्रह असे नाव दिले गेले आणि त्यांच्या भ्रमणाबद्दल माहिती गोळा करून प्रत्येकाचे वेगळे गणित पण मांडले. गणित व खगोलशास्त्रांत पारंगत भारतियांनी हजारो वर्षांपूर्वीच या विषयीचा अभ्यास केला.