श्यामचीं पत्रें - 8

  • 13.5k
  • 2.1k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज सकाळी मी अंगणात फिरत होतों. एक लहानसें फुलपाखरूं पडलें होते ! फारच चिमुकले होतें तें. मी हातांत घेतलें. तें मेलेलें होतें. तरीहि त्याचे ते चिमणें पंख किती तजेलदार दिसत होते. चिवरेबावरें असे ते पंख सौंदर्यानें भरलेलें होते. ते पांखरूं किती दिवस जगलें असेल? कदाचित् चार दिवसहि तें नाचलेंबागडलें नसेल ! इतक्या क्षणभंगुर अशा जीवनांत सुष्टीनें किती सौंदर्य ओतलें होते, किती कला ओतली होती? मग मानवी आत्मा निर्मितांना किती कला ओतली गेली असेल? मानवी आत्म्यांत किती रंग भरलेले असतील?