पुरंदरचा तह झाला. एक भळभळती, सलणारी, बोचणारी जखम घेऊन शिवराय राजगडावर पोहोचले. केलेला तह त्यांच्या जिव्हारी लागला होता. मावळ्यांनी रक्त सांडून, प्राणांची आहुती देऊन जिंकलेले तेवीस किल्ले मिर्झाराजेंना सहजासहजी द्यावे लागले ही बोचणी शिवरायांना सतावत होती. पाठोपाठ संभाजीराजेंना औरंगजेबाने दिलेली सरदारकी स्वीकारण्याची पद्धती ही शिवरायांसाठी क्लेशदायक होती. शिवरायांची परिस्थिती अत्यंत उदासीन झालेली असताना मिर्झाराजेंचे अजून एक फर्मान आले. त्याप्रमाणे आदिलशाहीवर मिर्झाराजे चालून जाणार होते आणि त्या मोहिमेत शिवरायांनी सामील होऊन विजापूरकरांचा पराभव करण्यासाठी सर्व मदत करावी, प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्हावे असा तो आदेश होता. त्याप्रमाणे शिवरायांना स्वतःच्या सैन्यासह मिर्झाराजेंच्या फौजेत समाविष्ट व्हावे लागले. फार मोठी फौज घेऊन मिर्झाराजे आदिलशाहीवर चालून गेले. घनघोर युद्ध पेटले.