मुंबई गोवा मार्गावर बाभुलवाडीकडे असा एक छोटासा बोर्ड लागतो. हायवे सोडून आत वळले की बाभुलवाडीची वाट लागते. वाट कसली हायवेला लाजवेल असा गुळगुळीत रस्ता. गावात कायमची वर्दळ. लोकांना हायवे पर्यंत एक किलोमीटरची सारखी येजा करण्याची सवय. गाव डोंगराच्या पायथ्याला असल्याने वस्ती विरळ. अस असलं तरी गाव सुधारणेच्या बाबतीत अन्य गावापेक्षा कांकणभर पुढचं. याच कारणांमुळे गाववर अधिकारी वर्गाची भलतीच मर्जी. कुठलीपन योजना आली की त्यात या गावचं नाव पहिलं. सरपंच पण अक्टिव्ह. त्यामुळे गाव सतत चर्चेत.गावाला एक सवय चांगली हुती. पहाटेच गावाला जाग यायची. तरणी, म्हातारी, नोकरदार, रिकामटेकडी सारी सुर्यदेवाच दर्शन कधी चुकवत नव्हती. गावाच्या मध्यभागी हनुमानच एक मंदिर हुतं.