सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का? किती झाले तरी आई ती आई. सरला आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे? आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते? बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो? बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात? काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे.