नवा प्रयोग... - 1

(12)
  • 48.6k
  • 2
  • 27.4k

भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी दसगावला जायचे. इतरही माणसे जायची. म्हणून स्टेशनात आज रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. केळी, संत्री, चिवडा वगैरे विकणा-यांची गर्दी होती. वर्तमानपत्रे, मासिके, वगैरे विकणारेही दिसत होते. चहाच्या दुकानाजवळ पुष्कळ मंडळी होती. गाडी येताच धावपळ सुरु झाली. चहा हिंदू, चहा मुसलमान, वगैरे आवाज कानावर येऊ लागले. हमाल मजुरी शोधू लागले. कोणाचे सामान आहे का बघत होते. स्टेशनच्या बाहेरुन टांगेवाले स्वारी आहे का, स्वारी आहे का, - विचारीत होते.