नवा प्रयोग... - 3

  • 13k
  • 1
  • 5.3k

“मग येणार ना रोज स्वच्छतासप्ताह पाळायला? आपण रोज सकाळी ६ ते ८ जाऊ. तुमच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही. २६ सप्टेंबरला आपण सुरू करू. २ ऑक्टोबरला समाप्त करू. गांधीसप्ताह स्वच्छतासप्ताहाच्या रूपाने आपण साजरा करू. याल ना सारे?” घनाने विद्यार्थ्यांना विचारले. ते विद्यार्थ्यां त्याच्या वर्गाला येत. तो त्यांना रविवारी दोन तास शिकवीत असे. कधी संस्कृत तर कधी इंग्रजी, कधी गणित तर कधी मराठी असे विषय तो घेई. घना कोणताही विषय शिकवू शकत असे. विद्यार्थ्यांशी संबंध यावा आणि स्वत:चे ज्ञानही जिवंत राहावे म्हणून तो ते दोन तास देत असे. कधी कधी तो त्यांना इंग्रजी वर्तमानपत्रांतले चांगले लेख वाचून दाखवी. कधी त्यांना राजकारण समजावून देई. त्याचा रविवारचा तास म्हणजे मेजवानी असे.