रात्री घना व त्याचे मित्र बसले होते. गिरणीच्या फाटकाजवळ कोणी आत जाऊ लागलेच तर आडवे पाडायचे. मग अंगावरून लॉरी नेवोत की काही करोत, -- असे ठरले. आपणास पकडलेच तर सर्वांनी कसे वागावे ते सांगणारे एक पत्रक घनाने तयार करून ठेवले. “याच्या हजारो प्रती करून वाटा.” तो म्हणाला. “सखाराम येत आहेत ना?” “हो, त्याची बहीणही येत आहे. ती स्त्रियांत जाईल. खूप काम करील.” “छान होईल! कधी येणार दोघे?” “उद्या सकाळी येतील. उद्याच्या सभेत त्यांची भाषणे ठेवू. त्यांची ओळख करून देऊ. सखाराम म्हणजे देवमाणूस! कामाचाही त्याला उरक आहे. मी पकडला गेलो तर काळजी करू नका. शेवटी आपला धीर हाच आपला मार्गदर्शक. आपली हिम्मत हीच मैत्रीण.” घना गंभीरपणे बोलत होता.