१. दिवस बुडायला आला होता. सूर्याचा तांबूस केसरी गोळा हळूहळू डोंगराआड चालला होता. उसाच्या शेतातली हरभरा टोपायची कामं उरकली होती. कालच्याप्रमाणे आजही रंगाने आग्रहाने कामगार बायकांना बैलगाडीत बसायला सांगितलं. दुडक्या चालीनं बैलगाडी फाट्याच्या बाजू बाजूने चालली होती. एखादा खड्डा आलाच तर गाडी एकाबाजूला हिंदकळायची. दोन्ही चांकांच्यामधून गाडीच्या खाली रंगाचा बंड्या कुत्रा बैलांच्या वेगाबरोबर चालत होता. फाट्यातल्या पाण्यावर पाणपक्षी मासे पकडण्यासाठी घिरट्या घालत होते. छग्या बग्याच्या पाठीवर थाप मारत रंगा मजेत एखादी शीळ वाजवत होता. बायकांचं आपापसांत काहीबाही कुजबुजणं चालू होतं. 'हो. ती तसलीच आहे. पैशाचा माज दुसरं काय?' 'व्हय बया. एवढी शिकल्याली हाय पर बोलणं एकदम कुचक्यागत. लई श्यानी असल्यावानी