प्रकरण १४ जेवायच्या सुट्टी नंतर कोर्ट सुरु व्हायच्या आधीच लोकांनी कोर्टात गर्दी केली.वरिष्ठ सरकारी वकील हेरंब खांडेकर अचानक कोर्टात हजर झाले. खांडेकर हे बलदंड शरीराचे आणि रुंद खांदे असलेले व्यक्तिमत्व होते. एखाद्या पिंपासारखे दिसायचे.आवाजही शरीराला साजेसा होता. “ मी तुला म्हणालो होतो ना पाणिनी, त्यांच्याकडे काहीतरी धक्कादायक बातमी आहे आणि त्यासाठीच खांडेकर आलेत. ” कनक ओजस म्हणाला. पाणिनीने काही न बोलता फक्त मान डोलावली.पोलीस रतीला घेऊन कोर्टात आले.पाणिनीने पटकन संधी साधून तिला विचारलं, “ सोमवारी सकाळी तू तुझ्या नवऱ्याच्या घरातून नेमकी कधी बाहेर पडलीस?” “ सकाळी सहाच्या सुमाराला असेल.” रती म्हणाली. “ आणि नंतर दिवसभर कुठे होतीस तू?” पाणिनीने विचारलं