मरणभोग “हा काळ आपला मुर्दाडासारखा पुढे ऽऽ पुढे जातोहे ,पण ह्यानेच घात केलान माझा, ह्याला कुठेतरी आरेखायला हवा.” चंद्रुआक्का दाराच्या उंबऱ्यात बसल्या बसल्या योजीत होती. संध्याकाळचा सुमार. घराखालच्या मळ्यात टोकाला दर्या, दिवसभर घटकापळांनी पुढे पुढे सरकत सरकत हा सूर्य एकदा दर्यात बुडाला की झाली रात्र ! अरेच्या ! इतके दिवसांत हे असे सुचलेनाही? स्वतःच्या कल्पनेचे चंद्रुआक्काला हसायला आले. “आत्ता बघते कसा थांबत नाय काळ तो...” ती एकटक सूर्याकडे बघून त्याला दटावायला लागली. त्याने थोडावेळ चंद्रुआक्काकडे लक्ष नाहीसे केलेन् पण ती नजर खळवीत नाहीसे दिसल्यावर त्याचा नाईलाजा झाला. हाताने खुण करून 'थांब' असा इशारा तिने केला अन् सूर्य थांबला. पाच-दहा मिनिटे