अखेरचा पर्याय क्षुधा – तृष्णा या उर्मीची पर्वाही न करता रुरूची पायपीट अहर्निश सुरू झाली. ईप्सित पूर्ण होईतो अन्य विचारही मनात येऊ द्यायचा नाही असा त्याचा पक्का निर्धार होता. पंचनद प्रांत पार करताच त्याला हिमगिरीचे दर्शन झाले. पार आभाळात विरत गेलेली उत्तुंग हिमिशखरे आणि क्षितिज भेदून त्या पलीकडे पोचणाऱ्या पर्वत मालिका, पार्श्वभूमीवर हे दृष्य अधिकच गूढ करणारे अवकाशातील सप्तरंगांचे विभ्रम. नजरेतही न सामावणारी ती अनंतता पाहिल्यावर आपली मार्गक्रमणा योग्य दिशेने असल्याची खात्री रुरूला पटली.