परीवर्तन

परिवर्तन राजा चंडप्रताप नखशिखांत रक्‍ताने भरत्ला होता. शत्रूला यमसदनास पाठवून, अनेकांना कंठस्नान घालून तो आपल्या राजधानीकडे परतत होता. त्याची सेना मिळालेल्या विजयाने उन्मादित होत विजयघोष करत होती. घोड्यांच्या टापांनी सगळा आसमंत भरून गेला होता. धुळीचे लोट उसळत होते. राजा चंडप्रताप खूष होता. त्याच्या पराक्रमाच्या कथा दूरदूरच्या प्रांतापर्यंत पोहोचल्या होत्या. आपल्या राज्याच्या सीमा चारही दिशांना त्याने वाढविल्या होत्या. आता त्याच्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणाला होणार नव्हती. भाट व कवी त्याच्या पराक्रमावर स्तुतिसुमने उघळणार होते. नव्या उपाध्या, पदव्या त्याला चिकटणार 'होत्या. त्याची राजधानी त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. जागोजागी गुढ्या तोरणे उभारली होती. रांगोळ्यांनी रस्ते सजले होते. मंगलवाद्यांचा नाद सगळीकडे गुंजत होता.