श्यामची आई - 22

  • 7.5k
  • 1
  • 2k

दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती सतरांदा शिवली होती. सतरा ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती, की शिवणे कठीण झाले होते. आम्हां मुलांना त्यांनी नवीन कपडे केले परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत.