कोण राहते त्या घरात? त्या जुन्या पडक्या घरात? त्या भयाण घरात? पहाटेच्या वेळेस पाखरांची किलबिल सुरू होते व त्या घरातून मंगल वेदमंत्र कानांवर येतात. कोण म्हणते ते मंत्र? तेथे भूत तर नाही ना राहत? कोणी ब्रह्मसमंध तर नाही ना? कोण आहे त्या घरात? त्या घरात वेदमूर्ती वामनभटजी राहातात. विद्वान आहेत हो. दशग्रंथी आहेत. वेद म्हणजे त्यांच्या हातचा मळ. सारा ऋग्वेद त्यांच्या ओठांवर जसा खेळतो आहे. वेद म्हणजे त्यांची करमणूक, त्यांचा आनंद. शहरातील लोकांच्या तोंडी बोलपटांतील गोड गाणी असतात. वामनभटजींच्या तोंडी वेदमंत्र असत.