अमोल गोष्टी - 1

(37)
  • 18k
  • 7
  • 8.5k

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुध्दा शूद्र वगैरे ईश्वरानेच निर्माण केले म्हणून ते तसेच गुलाम राहणे युक्त असे समजण्यात येई. इतिहासात त्याच त्याच गोष्टी आपणांस सर्वत्र दिसून येतात. या गुलाम समजले जाणा-या ग्रीक लोकांस काही काही बाबतींत मुळीच अधिकार नसत. आपल्याकडे शूद्रांस वेदाध्ययन किंवा दुसरे चांगले धंदे करण्याची परवानगी नसे. तसेच ग्रीस देशात होते. एकदा तर एक असा कायदा करण्यात आला की, शिल्पशास्त्राचा अभ्यास फक्त स्वतंत्र लोकांनीच करावा. निरनिराळया मूर्ती, पुतळे वगैरे गुलामांनी करता कामा नये. जर त्यांनी शिल्पकलेचे नमुने केले तर त्यास भयंकर शिक्षा कायद्याने ठरविण्यात आली होती.