अमोल गोष्टी - 5

  • 22.9k
  • 2
  • 4.6k

आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाप्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे करून सुखाने दिवस काढीत होते. त्या नगरात सर्वत्र बाईचीच सत्ता होती. तिचे भाग्य मोठे थोर म्हणून तिला 'भाग्यबाई' म्हणत. तिची मुलेही मोठी उद्योगी : कोणी उत्कृष्ट कारागीर, कोणी उत्कृष्ट संगीतज्ञ, कोणी शास्त्रज्ञ, कोणी तत्त्वज्ञ, कोणी चांगले विणकर, कोणी चांगले योध्दे, कोणी मुत्सद्दी, कोणी तपस्वी असे होते. सर्व त्या त्या कामात मोठे वाकबगार, मोठे दर्दी! परस्परांचा हेवादावा त्यांना माहीत नाही. सर्वच धंदे चांगले, ज्याला आवडेल तो त्याने करावा, असे होते. मुलांच्या या प्रेमळपणामुळे, या ऐक्यामुळे भाग्यबाई मोठी सुखी होती. तिचे मुख नेहमी प्रसन्न दिसे.