गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होता. त्याचे नाव रामचरण. रामचरणने आपला देश, घरदार, सर्व स्नेही यांस सोडून दिले होते. जे आपले बांधव हजारो मैलांवर आहेत, त्यांना ज्ञानदान करण्यासाठी तो गेला होता. त्या गरीब मजुरांच्या मनात सीता, सावित्री, रामकृष्ण यांची आठवण राहावी, हिंदु-संस्कृती त्यांच्या मनात जिवंत राहावी म्हणून तो गेला होता.