ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षापूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टींपैकी एक गोष्ट पुढे देतो. एक लहानसा ओढा होता. उन्हाळयात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ. पावसाळयात मात्र त्याची कोण ऐट व मिजास! एकदा खूप मुसळधार पाऊस पडला, जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. आमचा हा लहानसा ओढा पाण्याने फुगून गेला. त्याच्या तीरावर धान्यांची सुंदर शेते होती. त्या नाल्याने आपले पाणी दूरवर पसरिले, ती सुंदर शेते वाहून गेली. त्या उध्दट धटिंगण ओढयाने सामर्थ्यांच्या जोरावर ती सुकुमार व उपकारक शेते वाहवून न्यावी ना? त्या शेतांमुळे या ओढयाचेच सौंदर्य वाढत असे, परंतु दुष्टाला दुस-याचे नुकसान करण्यात स्वतःचेही शेवटी नुकसान होईल हे दिसत नसते.