करुणादेवी - 1

(18)
  • 7.7k
  • 2
  • 6.3k

फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पात्रातून ये-जा करताना दिसत. नदीतीरावर सोमेश्वराचे एक फार प्राचीन मंदीर होते. त्या मंदिरात एके काळी एक गरिब जोडपे राहात होते. त्यांना एक मुलगा होता परंतु तो अकस्मात मरण पावला. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता. तो त्यांचे धन, तो त्यांचा देव. मृतपुत्र मातेच्या मांडीवर होता. ती त्याच्याकडे पाहात होती. मुलांचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुटत होत्या परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही मिटले आणि जवळच बसलेला पिता, त्याचेही प्राण निघून गेले!