अंबर गावी सुखदेव म्हणून एक गृहस्थ राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सावित्री. बरेच दिवस मूलबाळ होईना. सावित्रीने पुष्कळ व्रते-वैकल्ये केली, नवस-सायास केले. ती निराश झाली परंतु आता मूल होणार नाही, असे वाटल्यावर तिला मुलगा झाला. नक्षत्रासारखा मुलगा होता. त्याचे नाव शिरीष ठेवण्यात आले.