शिरीष गेल्यावर करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे, ती घरचे सारे काम करी. सासूसार-यांची सेवा करी. रात्री अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे. करुणा एकटी मळ्यात काम करी परंतु तिच्याने कितीसे काम होणार ? पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजुरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी ना नांगर ना बैल ! कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा ? कसे तरी करुन करुणा गाडी हाकीत होती.