कावळे - 2

  • 6.3k
  • 2
  • 2.8k

मी एका शेतात गेलो. दुपारची वेळ होती. मी माझी भाकर घेऊनच शेतात गेलो. मी झाडाखाली भाकर खात बसलो. आधी चारी दिशांना मी भाकरीचे तुकडे फेकले. फेकले नाही, अर्पण केले! आजूबाजूला किड्या-मुंग्या असतील. अदृश्य योनीही असतील त्यांना नको का थोडेसे द्यायला. एकटे खाणे हे पाप. प्राचीन काळापासून वेद ओरडून सांगत आहे. ‘केवलाघो भवती कैवलादि’ –‘जो केवळ एकटयाने खाईल तो पापरूप होईल.’ परंतु आज ऐकतो कोण? कावळे, चिमण्या, किडा-मुंगी, मांजर, कुत्रे यांनाही आपण जेवताना घास देणे हे तर दूरच राहिले परंतु शेजारी भाऊ उपाशी असेल, घरातील गडीमाणसे उपाशी असतील इकडे तरी आपले लक्ष कोठे असते? थोर हिंदी संस्कृतीचे स्वरूप अजून आपल्या गळी उतरतच नाही. आपण सारे उदरंभर. आपलेच पोट भरणारे झालो आहोत.