दुःखी.. - 1

(11)
  • 13.7k
  • 1
  • 7.8k

नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्‍या वगैरे पुष्कळ होत्या. त्यामुळे नंदगावचे महत्त्व. शिवाय तेथे एक मोठा तुरुंग होता. लांबलांबचे कैदी नंदगावच्या तुरुंगात आणून ठेवण्यात येत. तुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नरक. आज तुरुंग थोडे तरी सुधारलेले आहेत परंतु त्या काळी तुरुंगांत अपरंपार हाल असत. कैद्यांना पशूंहूनही वाईट रीतीने वागवण्यात येई. जरा काही झाले की शिक्षा व्हायच्या. हातापायांत जड साखळदंड पडायचे. फटके केव्हा बसतील त्याचा नेम नसे.