कोण चालला आहे तो मुशाफिर? काठीला अडकवलेले एक गाठोडे त्याच्या पाठीवर आहे. त्याची दाढी वाढलेली आहे. तो का पठाण आहे? तो जरा वाकलेला का दिसतो? वयाने का जरा वाकला? त्याचे डोळे पाहा. जरा पिंगट आहेत, नाही? परंतु त्यांत प्रेमळपणा आहे. आपल्याच तंद्रीत आहे. चालला आहे काही गुणगुणत. संध्याकाळ होत आली. तो जरा झपझप जाऊ लागला परंतु वाटेत अंधाराने त्याला गाठलेच. रात्र झाली. चांदणे नव्हते. आजूबाजूला झाडी होती. आमचा प्रवासी चालला होता. मधूनमधून शीळ घालीत होता. त्याला दूर दिवे दिसले. गावाजवळ आला. त्याला पाहिजे होता तोच गाव होता. ते दिवे दिसताच त्याच्याही डोळयांत जरा प्रकाश आला.