मुंबई शहरात एक सुंदर बंगला बांधून तो जहागिरदार राहात होता. तो आता म्हातारा झाला होता. तरी त्याची तरतरी कायम होती. जुने मजबूत हाडपेर होते. घोडयाच्या गाडीतून तो रोज फिरायला जायचा. अजून मुंबईत मोटारी फार झाल्या नव्हत्या. क्वचित एखादी कोठे नमुना म्हणून असली तर. घोडयांच्या ट्रामगाडया होत्या. श्रीमंत लोक बग्गी ठेवीत. या जहागिरदाराला एक मुलगी होती. एक सरदाराशी त्याने तिचा विवाह केला होता परंतु 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात हा सरदार स्वातंत्र्याच्या बाजूने लढत होता. तो प्रयत्न अपयशी झाला. गुलामगिरी झाली. जहागिरदाराचा जावई नाना कारस्थाने करून वाचला. आयुष्य संपले नव्हते म्हणूनच तो वाचला.