फुलाला राजधानीतील तुरुंगात ठेवणे धोक्याचे होते. केव्हा लोक बिथरतील त्याचा नेम काय? राजाने समुद्रकाठच्या एका दूरच्या तुरुंगात फुलाची रवानगी केली. फुलाची खोली एकान्त होती. त्या खोलीला एकच खिडकी होती. फुला उडी मारी व त्या खिडकीतून उचंबळणारा समुद्र बघे. समुद्राच्या लाटांवरचा फेस बघे. तुरुंगाच्या बागेतील फुले पाहून त्याला आनंद होई. आपल्याला बागेत पाठवतील का कामाला, येतील का फुलांना हात लावता? येतील का प्रयोग करता? असे त्याच्या मनात येई.